आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात : पुणे-नगर महामार्गावर चालकाला डुलकी लागल्याने, ट्रकवर आरामबस धडकली; पाच ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - पुण्याला जाण्यासाठी आरामबस औरंगाबादहून सुटली तेव्हाच चालकाच्या डोळ्यांवर झोपेची झापड होती. वाटेत त्याला प्रवाशांनी चहादेखील पाजला. परंतु अखेर पारनेर फाट्यावर त्याच्या डुलकीने घात केला. रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकवर ही आरामबस वेगात येऊन धडकली. या अपघातात ५ ठार, तर ११ जण जखमी झाले. ही दुर्घटना नगर-पुणे मार्गावरील वाडेगव्हाणजवळील पारनेर फाट्यावर सोमवारी पहाटे ५.३० वाजता झाली. मृतांमध्ये १२ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. औरंगाबादहून पुण्याला निघालेली आरामबस (एमएच १४ बीए - ९३१२) टेम्पोला ओव्हरटेक करत असताना ट्रकवर (एमएच १२ बीजी ४६२०) आदळून हा अपघात झाला. बस वेगात असल्याने चालकाचा ताबा सुटला. बसमध्ये सुमारे ५५ प्रवासी होते. त्यातील चालकासह पाचजण जागीच ठार झाले. दोन जण गंभीर जखमी झाले, तर ११ जणांना किरकोळ जखमा झाल्या. 


मृतांमध्ये प्रमोद उत्तम मोरे (सायगाव, ता. मेहेकर, जि. बुलढाणा), अमजद महंमद युसूफ शेख (४५, जालना, चालक), शेख अल्ताफ अबुबकर (४०, औरंगाबाद), शेख जमीर शेख अल्ताफ (१२, औरंगाबाद) यांचा समावेश अाहे. मृतदेह पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, तर जखमींना शिरूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका मृतदेहाची ओळख रात्रीपर्यंत पटलेली नव्हती. 


जखमींची नावे : सुरज शशिकांत चव्हाण (२३), प्रियंका राजाराम पाटील (२६, न्यू सांगवी, मेथा व्हिला, ब्लॉक नंबर ४, पुणे), आकाश बबन तरफे (२०, कळमनुरी, जि. हिंगोली), रामेश्वर बळीराम वाकचौरे (२९, रमाईनगर, वाळुज, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), अश्विनी सुभाष कुलकर्णी (२८, पन्नालालनगर, औरंगाबाद), सायली सुभाष कुलकर्णी (पन्नालालनगर, औरंगाबाद), मुबशर अहमद शेख (२९, सालीवाडा, पैठण, जि. औरंगाबाद), प्रिया सुनील पाटील (२४, बाणेर, पुणे), मृणाल दिवानजी (२४, औरंगाबाद), प्राची सचिन गोसावी (२१), स्नेहा जयकुमार गोसावी (२३), सायली संजय पवार (२५), अनिश पांडुरंग गुरव (२३) आदी जखमींवर उपचार करून त्यांना पुढे जाऊ देण्यात आले. किशोर धनराज मुरंबे (४५, औसा, जि. लातूर) यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 


बाप-लेकावर काळाचा घाला 
औरंगाबाद येथील शेख अल्ताफ अबुबकर हे पुणे येथे ट्रान्सपोर्ट एजन्सीमध्ये कामाला होते. तेथे ते स्वत:चा टेम्पो चालवत. औरंगाबादेत रहात असलेल्या आईला भेटण्यासाठी ते रविवारी १२ वर्षांचा मुलगा जमीर याच्यासह औरंगाबादला आले होते. पुन्हा पुण्याला जात असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. 


पेंगुळलेल्या चालकाला प्रवाशांनी चहाही पाजला 
चालकाची झोप झाली नसल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी वाटेत बस थांबवून चालकाला चहाही पाजला. अजूनही डुलक्या येत असतील, तर आपण थोडं थांबू असे प्रवाशांचे म्हणणे होते. परंतु चालकाने कोणाचेही ऐकले नाही. त्यातूनच हा अपघात झाल्याचे ड्रायव्हर केबिनमधील एका प्रवाशाने सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...