आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाळधीजवळ शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी निघालेल्या वाहनाला अपघात; चालकासह तिघे ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राष्ट्रीय महामार्गावर पाळधीजवळ स्कूल व्हॅन व दुचाकीची धडक झाली. यात व्हॅनचालकासह दाेघे दुचाकीस्वार ठार झाले. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी १.१५ वाजता घडली. मृतदेह शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात अाणले असताना मृताच्या नातेवाइकांनी अाक्राेश केला. वेगावर नियंत्रण न मिळवता अाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समाेर अाली अाहे. 


व्हॅनचालक दिवाकर साेनवणे (वय ४५, रा. सहयाेग काॅलनी, पिंप्राळा, जळगाव) हे पाळधी येथील इम्पेरियल इंग्लिश मीडियम स्कूलमधून विद्यार्थ्यांना अाणण्यासाठी जात हाेते. याच वेळी खडका तांडा येथून बन्सीलाल राठाेड (वय ३०, रा. हिसाळे, ता. शिरपूर) व अर्जून उत्तम पवार (वय ३३, रा. खडका तांडा, ता. एरंडाेल) हे दुचाकीने (एम.एच. १९ बी.के. ३२६८) जळगावकडे येत हाेते. राष्ट्रीय महामार्गावर पाळधी गावाजवळच्या सुगाेकी हाॅटेलसमाेर त्यांची दुचाकी व व्हॅनची धडक झाली. अपघात एवढा भीषण हाेता की, दुचाकीचे चाक निखडून पडले. जाेरदार अावाज झाल्याने हाॅटेलमधील कर्मचारी व ग्राहकांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. दुचाकीस्वार बन्सीलाल राठाेड याच्या डाेक्याला गंभीर मार लागल्याने रक्तस्त्राव झाला. यात ताे जागीच ठार झाला. व्हॅनचालक दिवाकर साेनवणे यांच्या डाेक्याला मार लागला. डावा हातही वाकला. स्टेअरिंगवर डाेके अादळल्याने ते गंभीर जखमी अवस्थेत पडलेले हाेेते. घटनास्थळी हॉटेल व परिसरात असलेले नागरिक धावत आले. बन्सीलाल राठोड याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. अर्जुन पवार याच्या गुप्तांगाला मार बसला होता. जखमी चालक सोनवणे यांना नागरिकांनी व्हॅनमधून खाली काढले. त्या वेळेस त्यांनी फक्त दोन वेळा श्वास घेतला. त्यानंतर ते गतप्राण झाले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यानंतर मृत दिवाकर सोनवणे, बन्सीलाल राठोड व गंभीर जखमी अर्जुन पवार यांना जैन इरिगेशन कंपनीच्या रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. 


दिवाकर सोनवणे हे व्हॅनमध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करीत होते. जळगाव शहरातील शाळांबरोबर इम्पेरियल स्कूलच्या विद्यार्थ्यांची ते वाहतूक करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जळगाव, एरंडाेल, धरणगाव व पाळधी येथील नागरिकांनी गर्दी केली. पाेलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 


वडील, पत्नीने फाेडला हंबरडा 
बन्सीलाल राठाेड यांच्या पत्नी वैशालीला श्वासनलिकेचा त्रास अााहे. वडील सुभाष राठाेड यांच्या मदतीने उपचारासाठी त्यांनी तिला १६ सप्टेंबर राेजी जळगाव येथील हरिविठ्ठलनगर भागातील डाॅ. माधुरी कासट यांच्याकडे दाखल केले अाहे. उपचारासाठी त्यांना जळगाव येथेच थांबावे लागले. त्यानंतर ते बन्सीलाल यांच्या माेठ्या भावाच्या शालकाच्या खडका तांडा (ता. एरंडाेल) येथील घरून जळगावला ये-जा करीत हाेते. शुक्रवारी काळाने घाला घातल्याने बन्सीलाल यांचा अपघातात मृत्यू झाला. रुग्णालयात उपचार घेणारी पत्नी व वडिलांना ही माहिती मिळताच त्यांनी शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे धाव घेतली. बन्सीलाल यांचा मृतदेह पाहताच त्यांनी अाक्राेश केला. 


व्हॅन-दुचाकी अपघातात हे झाले ठार 
दिवाकर नारायण सोनवणे (वय ४५ रा. सहयोग कॉलनी, पिंप्राळा, जळगाव), अर्जुन उत्तम पवार, (वय ३३ रा. खडका तांडा ता. एरंडोल) व बन्सीलाल सुभाष राठोड (वय ३०, रा. हिसाळे, ता. शिरपूर, जि. धुळे) अशी या भीषण अपघातातील मृतांची नावे अाहेत. 


दुचाकीस्वारांकडील काेंबडीचाही मृत्यू 
प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार बन्सीलाल राठाेड व अर्जुन पवार हे दुचाकीवर येत हाेते. त्यांच्याजवळ हातात एक कोंबडी होती. या अपघातात त्यांच्यासह कोंबडीचाही मृत्यू झाला. दोघे दुचाकीवर जळगाव शहरातील हरिविठ्ठलनगर परिसरातील दवाखान्यात येण्यासाठी निघालेले असताना ही दुर्घटना घडली. बन्सीलाल यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व आई-वडील असा परिवार आहे. 


गंभीर जखमी अर्जुन पवार याचा उपचारादरम्यान मृत्यू 
अपघातानंतर अर्जुन पवार याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तपासले. त्याच्या गुप्तांगाला मार बसलेला होता. प्रचंड वेदना त्याला होत होत्या. डॉक्टर व इतरांनी त्याला पकडून ठेवलेले होते. मात्र, त्याच्या नातेवाइकांना जिल्हा रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला. वेदनेने ग्रासलेले असल्याने त्याची वेगवान हालचाल होत होती. त्याला पकडून ठेवण्यासाठी दोन ते तीन व्यक्तींची आवश्यकता होती. मात्र, त्याच्यासोबत कुणीही नसल्याने तो अक्षरश: इमर्जन्सी वॉर्डमध्ये स्ट्रेचरवरून खाली पडला. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला होता. परंतु, त्याचे नातेवाईक येण्यास विलंब झाला. अपघातानंतर दीड तास तो जिल्हा रुग्णालयातच होता. दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात आलेल्या नातेवाइकांनी त्याला खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात अाला. रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेत असताना रस्त्यावरच त्याचाही मृत्यू झाला. 

बातम्या आणखी आहेत...