• Home
  • Sports
  • Other Sports
  • Accidental death of father and coach three years ago; Lack of trainer, two years rest due to injury; Now the champion

Sports Special / तीन वर्षांपूर्वी वडील व कोचचा अपघाती मृत्यू; ट्रेनरचा अभाव, दुखापतीमुळे दोन वर्षे विश्रांती; आता चॅम्पियन


एशियन चॅम्पियनशिपमध्ये ८०० मी. रेसमधील चॅम्पियन गोमती मरिमुथूचा संघर्षमय प्रवास

वृत्तसंस्था

May 06,2019 09:06:00 AM IST

चेन्नई-दोहा येथील एशियन चॅम्पियनशिपमध्ये भारताची लांब पल्ल्याची धावपटू गोमती मरिमुथू नुकतीच ८०० मीटरच्या रेसमध्ये सुवर्णपदकाची मानकरी ठरली. ती तामिळनाडूची धावपटू आहे. दोहा येथील सोनेरी यशामुळे मला नवीन ओळख मिळाली. मला आता मदत केली जात आहे. यापूर्वी मला असे कधीही अनुभवता आले नाही, अशी प्रतिक्रिया एशियन चॅम्पियन गोमतीने दिली.


विसाव्या वर्षी गोमतीने धावण्यास सुरुवात केली. तीन वर्षांपूर्वी तिने याच खेळात करिअर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, वडील मरिमुथू आणि प्रशिक्षक गांधी यांच्यावर काळाने घाला घातला. या दोघांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे गोमतीला तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणारे कोच आणि आत्मविश्वास उंचावण्यासाठी पाठबळ देणारे वडील राहिले नाही.

रनिंगमध्ये मोठे करिअर करण्याचा किंवा प्रोफेशनल लेव्हलवर धावण्याचे कोणत्याही प्रकारे मी निश्चित केलेले नव्हते. इतर मुला-मुलींसारखे मी धावत होते. मात्र, वयाच्या २० व्या वर्षी मला प्रशिक्षकांनी याच खेळात करिअर करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मी यातच काैशल्य पणास लावले. मी तंत्रशुद्ध प्रशिक्षणातून या खेळात विशेष प्रावीण्य संपादन केले. मला सातत्याने प्रशिक्षक आणि माझे वडील यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणावरच्या वाढत्या खर्चामुळे अनेक वेळा माझ्या वडिलांना उपाशी राहावे लागत होते. आव्हान बरेच होते. मात्र, पदक जिंकण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील होते.

यातूनच मला हे यश मिळाले, असेही तिने सांगितले. याची मला जाण होती. त्यांच्या याच जिद्दीमुळे मला नेहमीच बळ मिळत गेले. याच मेहनतीचे फळ मला त्यांना द्यायचे होते. मात्र, आजच्या घडीला मिळालेले हे सोनेरी यश पाहण्यासाठी ते हयात नाहीत. याचेच मला मोठे दु:ख आहे. त्यांच्यामुळेच मी या ठिकाणी आपले करिअर घडवू शकले. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर मला मोठा धक्का बसला. तसेच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दुर्दैवाने मला दुखापत झाली. यातून मीच दोन वर्षे ट्रॅकपासून दूर राहिले. मात्र, मी पुन्हा नव्या उमेदीने ट्रॅकवर परतले. प्रचंड मेहनत करून मला हा सोनेरी यशाचा पल्ला गाठता आला. मला दोन वर्षांपूर्वी फ्रान्सिस मेरीने पराभूत केले होते. ती वयाने माझ्यापेक्षा मोठी आहे. तसेच तिला मोठा अनुभवही आहे. त्यामुळेच मी तिच्यासमोर वरचढ ठरू शकले नाही. तिने मला एका वर्षाच्या अंतरात दोन इव्हेंटमध्ये पराभूत केले. वयस्कर खेळाडूकडून झालेल्या पराभवानंतर माझ्यावर प्रचंड टीका झाली. चाहत्यांनीही प्रचंड हुटिंग केले. हे सर्व काही माझ्यासाठी कठीण होते. मात्र, यातून मला बरेच काही शिकण्यास मिळाले.


आज हीच फ्रान्सिस मेरी माझी मेंटर म्हणून मार्गदर्शन करत आहे. तिच्याच मार्गदर्शनाखाली मी सराव करत आहे. एशियन चॅम्पियनशिपमधील हे सोनेरी यशही मला तिच्यामुळे मिळाले आहे. आता सोनेरी यशाची हीच लय २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही कायम ठेवण्याचा माझा निर्धार आहे. त्यासाठीच मेहनत घेत आहे.
-गोमती


सलग १४ वर्षे नॅशनल चॅम्प शायनीकडून प्रेरणा
१९८५ पासून सलग १४ वर्षे ८०० मीटरच्या रेसमध्ये राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेली शायनी विल्सन हीच माझी आदर्श आहे. तिच्याकडून मला सातत्याने प्रेरणा मिळत गेली. ‘निराशा आणि अपयशाने खचलेली असताना मी आवर्जून पद्मश्री विजेत्या शायनीची आठवण काढते. त्यांनीही अनेक संकटांचा सामना करत यशाचा हा मोठा पल्ला गाठला. मेहनतीच्या बळावर त्यांना तब्बल १४ वर्षे चॅम्पियनचा किताब राखून ठेवता आला. २०१७ मध्ये उटी येथे प्रशिक्षणादरम्यान माझी त्यांच्याशी भेट झाली. त्याच्याशी बोलल्यानंतर माझा आत्मविश्वास अधिक दुणावला. हे क्षण माझ्यासाठी आजही प्रेरणादायी आहेत, असेही तिने या वेळी सांगितले.


X
COMMENT