आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सीएम’च्या मतदारसंघात बावनकुळेंच्या नावे मते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - भाजपमधील ज्येष्ठ नेते तसेच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अनपेक्षितपणे भाजपने उमेदवारी नाकारली. या निर्णयामुळे बावनकुळे नाराज झाले असले तरी त्यांनी प्रचाराच्या कामावर त्याचा परिणाम दिसू दिलेला नाही. त्यांच्या समर्थकांत मात्र माेठी नाराजी आहे. ती दूर करण्यासाठी, तसेच भाजपची व्हाेटबँक असलेली सामाजिक समीकरणेही बिघडू नयेत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात चक्क बावनकुळे यांना माेठेपणा देऊन, त्यांचे नाव पुढे करून प्रचार करण्याची क्लृप्ती आखली आहे.  

बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला. त्यांच्या जागी पक्षाने तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणारे टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देत सामाजिक परिस्थिती सावरण्याचे प्रयत्न केलेत. मात्र, तरीही बावनकुळे यांना तिकीट नाकारण्याचा मुद्दा समाज पातळीवर अद्यापही बराच चर्चेत आहे. त्यांच्या समर्थकांची नाराजी अद्याप दूर झालेली नाही. या परिस्थितीचा फटका बसण्याचा धोका लक्षात घेऊन भाजपने बावनकुळे यांना सक्रियपणे प्रचारात उतरवले आहे. त्यांच्यावर संपूर्ण पूर्व विदर्भाची जबाबदारी साेपवली आहे. त्यामुळे बावनकुळे कामठीसह काटोल, सावनेर तसेच नागपुरातही भाजपसाठी मतांचे आवाहन करत फिरत आहेत. एवढेच नाही तर नागपुरात आयोजित होणाऱ्या प्रत्येक प्रचारसभेची जाहिरात करताना त्यात ‘असे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी केले आहे...” अशा वाक्याचा आवर्जून वापर होत आहे. 

बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात एकमेव प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेत बावनकुळे उपस्थित नव्हते, तरी सभेचे निमंत्रक म्हणून बावनकुळे यांच्याच नावाचा वापर भाजपकडून करण्यात आला. नागपूरसह पूर्व िवदर्भातील काही मतदारसंघांमध्ये स्वत: बावनकुळे प्रचाराच्या सभा घेत आहेत. भाजपने राज्यभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा समाेर आणून त्यांच्या नावावर मते मागण्याचा अजेंडा ठेवलेला असताना खुद्द फडणवीस यांच्या मतदारसंघात मात्र बावनकुळेंच्या नावाने मते मागितली जात असल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...