आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजलगाव- शहरातील महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवरील बलात्कारप्रकरणी रविवारी एका अल्पवयीन युवतीसह अन्य दोघांना माजलगाव पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात या पूर्वीच एकाला अटक करण्यात आली असल्याने या प्रकरणातील पाच पैकी चार जण पोलिसांच्या ताब्यात आले असून एक महिला अद्याप फरार आहे. दरम्यान, पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत ७२ तासांत या प्रकरणाचा पर्दाफाश केला. या आरोपींकडून आणखी काही मुलींना या रॅकेटमध्ये अडकवण्यात आले का, याची माहिती कळू शकेल.
शहरातील एका महाविद्यालयात अकरावी वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीची तिच्या मैत्रिणीने आशिष बोरा नावाच्या मुलाशी ओळख करून दिली. ओळखीनंतर त्याने तिला ब्लॅकमेल करत शहरातील एका फोटो स्टुडिओमध्ये तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केला. दरम्यान या मैत्रिणीने या दोघांचे फोटो काढून मनोज फुलवरे याच्या मोबाइलवर पाठवले होते. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी मनोज फुलवरे पीडितेला दिली होती. यामुळे पीडित मुलीने ३ ऑगस्ट रोजी महाविद्यालयात विषारी गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मुलीला प्रथम शहरातील खासगी रुग्णालय आणि नंतर औरंगाबादला हलवण्यात आले. पोलिसांनी औरंगाबादला जाऊन पीडितेचा इन कॅमेरा जबाब घेतल्यानंतर मुख्य आरोपी आशिष ओमप्रकाश बोरा, मनोज फुलवरे, प्रमोद नवनाथ कदम यांच्यासह दोन युवतींवर शहर पोलिसांत बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात मोठी साखळी असण्याची शक्यता असून आणखी काही प्रकरणे हाती लागण्याची शक्यता सहायक पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी व्यक्त केली. या प्रकरणात आरोपीला सहकार्य करणारा फोटोग्राफर प्रमोद कदम यास शुक्रवारी (ता.१७) अटक केली. त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
बोरा पुण्यातून ताब्यात
यातील मुख्य आरोपी आशिष बोरा हा पुण्यात असल्याचा सुगावा पोलिसांना मिळाला. त्याच्या एका मित्राला सोबत घेत शनिवारी पोलिस उप निरीक्षक विकास दांडे यांच्यासह काही पोलिस कर्मचारी पुण्याला रवाना झाले. शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास तेथील स्वारगेट बसस्थानक परिसरात सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. तर सकाळी यातील आरोपी मनोज फुलवरे व एका युवतीला शहरातूनच ताब्यात घेतले.
दोन पथकाच्या साहाय्याने ७२ तासांत छडा
या प्रकरणातील आरोपींंच्या अटकेसाठी स्थापन दोन्ही पथके एकाच वेळी विविध ठिकाणी रवाना झाली होती. अवघ्या ७२ तासांत आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. यात पोलिस उप निरीक्षक एस.एस. बिराजदार, विकास दांडे, शरद पवार, विजय घोडके, शिलेश गादेवार, विजय कळकेंद्रे, अशोक क्षीरसागर, जॉनटी कांबळे, देशमुख आदींचा सहभाग होता.
चौकशी सुरू
प्रकरणातील पीडित अल्पवयीन असून आरोपी फरार होण्याची शक्यता होती. यामुळे या प्रकरणात अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करण्यात येत असून आणखी काही प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.
- बी.एस. महाजन, पोलिस निरीक्षक, शहर पोलिस ठाणे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.