Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | accused Sent to jail in the case of sex racket 

नगरमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; महिला दलाल परप्रांतीय मुलींकडून करवून घेत होती वेश्याव्यवसाय

प्रतिनिधी | Update - Jan 12, 2019, 01:09 PM IST

एक महिला काही दिवसांपासून परप्रांतीय मुलींकडून वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती खबऱ्यानी पोलिसांना दिली होती.

 • accused Sent to jail in the case of sex racket 

  नगर- शहरातील सावेडी भागातील महावीरनगर परिसरात सुरु असलेल्या उच्चभ्रू (हाय प्रोफाईल) सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत तोफखाना पोलिसांनी तीन मुलींसह सहाजणांना ताब्यात घेतले. यापैकी तिघांविरुद्ध पिटा कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महावीरनगर परिसरताील रत्नप्रभा इमारतीमध्ये एक महिला परप्रांतीय मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होती. गुरूवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक पूनम पाटील व तोफखाना पोलिसांच्या टीमने इमारतीत छापा टाकून ही कारवाई केली. शुक्रवारी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

  सावेडी परिसरात नगर-मनमाड रोडवरील महावीरनगर ही वसाहत आहे. याच परिसरातील रत्नप्रभा इमारतीमध्ये एक महिला काही दिवसांपासून परप्रांतीय मुलींकडून वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती खबऱ्यानी पोलिसांना दिली होती. त्यानुसार गुरूवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, परिविक्षाधीन उपअधीक्षक पूनम पाटील, तोफखान्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे, पोलीस कर्मचारी मंगेश खरमाळे, राम सोनवणे, दीपक रोहोकले, शिरीष तरटे, अंजली गुरु यांच्या टीमने या इमारतीवर छापा टाकला.


  यावेळी एक महिला बंगल्यामध्ये खालच्या व वरच्या मजल्यावर कुंटणखाना चालवताना आढळून आली. पोलिसांनी कारवाईमध्ये तीन मुलींची सुटका केली असून त्यात दोन परप्रांतीय मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी येथूून ग्राहक पुरवणारी महिला रिंकी शर्मा, तसेच ग्राहक संतोष अर्जुन भुजबळ (रा. माका, ता. नेवासा), भास्कर राजाराम ठोंबे (रा. साईनगर बोल्हेगाव) अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम ३,४,५,६ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक मंगेश खरमाळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संपत शिंदे करीत आहेत.

  दरम्यान, महावीरनगर परिसरात हे रॅकेट काही दिवसांपासून सुरु होते. त्याची कुणकुण परिसरातील नागरिकांना लागली होती. त्यामुळे निनावी फोनवरून त्यांनी ही माहिती तोफखाना पोलिसांना दिली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. शुक्रवारी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात अाले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, हे सेक्स रॅकेट उघडकीस आल्याच्या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली. यासंदर्भात नगर शहरात दिवसभर या प्रकरणाची चर्च होती.

  बनावट गिऱ्हाईक पाठवून आणले प्रकरण उघडकीस
  महावीरनगर परिसरातील इमारतीमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, त्याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी छाप्याचे नियोजन केले. त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम गुरुवारी सायंकाळी या परिसरात गेली. आधी एक बनावट गिऱ्हाईक पाठवून तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री केली. तशी खात्री होताच पोलिसांनी एकाच वेळी तेथे छापा टाकला. त्यामुळे हे रॅकेट उजेडात आले.

Trending