आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्हीही मोठे होतोय तुम्हीही मोठे व्हा ना...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अच्युत बोरगावकर

आपलं शरीर, भावना, स्वप्रतिमा आणि आदर, वयात येताना होणारे बदल, खासगीपणा, आरोग्य आणि सुरक्षितता अशा सर्व मुद्द्यांवर गतिमंद मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधणारा असा हा अनोखा चित्रसंच मतिमंद मुलांना लैंगिक साक्षर बनवेल.


शरीर साक्षरता आणि लैंगिकता शिक्षणाचा एक प्रयोग इतर सामान्य मुलांप्रमाणेच गतिमंद मुलं वयात येतात, त्यांच्याही शरीरात संप्रेरकं आपलं अस्तित्व दाखवतात. वयात येताना होणाऱ्या बदलांना या मुलांनाही सामोरं जावं लागतं. जवळीक, आपुलकी आणि आकर्षण या भावना जशा तुम्हा आम्हा ‘सामान्य’ समजल्या जाणाऱ्या माणसांच्या आहेत तशाच त्या बौद्धिक वेगळेपण असणाऱ्या आपल्या गतिमंद मुलांच्याही आहेत. लैंगिक अभिव्यक्तीच्या ऊर्मी यातील बहुतेक मुलांनाही स्वस्थ बसू देत नाहीत, त्या व्यक्त होण्यासाठी आपली वाट शोधतातच. 

फरक एवढाच की, आपल्या मुलांना इथल्या सामाजिक रीती आणि नियमांची ‘आपल्याला अपेक्षित’ असलेली जाण नसते. समाजाने ठरवून दिलेल्या चाकोर त्यांच्या लेखी नसतात. पण लैंगिकतेच्या मुद्द्यावर मात्र आपली सर्व संवेदनशीलता अचानक गायब होते. मुलं जेव्हा आपल्या सहज सुलभ भावना, इच्छा कृतीतून व्यक्त करतात तेव्हा त्यांना ‘बाकी काही कळत नाही, पण एवढे बरे समजते’ किंवा या ‘वर्तन समस्या’ आहेत, डॉक्टरांकडून ‘काही औषध मिळते का’ म्हणून पहिलं  जातं. गतिमंदत्व ही एक शारीरिक स्थिती आहे. मेंदूची/बुद्धीची विशिष्ट क्षमता ती दर्शवते. तो काही मानसिक आजार नाही. आपल्या या मुलांनाही त्याच भावना आहेत, ज्या सामान्य समजल्या जाणाऱ्या त्याच वयाच्या मुलांना असतात हे आपण सर्वांनी मान्य करण्याची आवश्यकता आहे.

सन २००० पासून “तथापि ट्रस्ट’ स्त्रिया आणि आरोग्य, शरीर साक्षरता आणि लैंगिकता शिक्षणाच्या कामात एक संसाधन केंद्राच्या रूपात कार्यरत आहे. शरीर साक्षरता या कामाचा भाग म्हणून पाच ते सहा वर्षांपूर्वी तथापिने अपंगत्व आणि शरीर साक्षरता या विषयात काम करण्यास सुरुवात केली. त्यातूनच अंध मुलांसाठी ब्रेल पुस्तक आणि ऑडिओ सीडीच्या रूपात एका संसाधन संचाची निर्मिती करण्यात आली. तर चार वर्षांपासून गतिमंद मुलांची लैंगिकता आणि लैंगिक अधिकारांच्या संदर्भात त्यांचे पालक, शिक्षक आणि सांभाळकर्त्या व्यक्तींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. 

चार वर्षांपूर्वी राज्यभर फिरून गतिमंद मुलांचे पालक, शिक्षक आणि निरनिराळ्या संस्थांमधील शेकडो कार्यकर्त्यांशी तथापिच्या टीमने या विषयावर संवाद साधला. वयात येतानाच्या शारीरिक आणि मानसिक बदलांना ही मुलं कशी सामोरी जातात आणि गतिमंद मुलांचं वयात येणं त्यांचे पालक आणि शिक्षक कसे हाताळतात यावर पालकांचे अनुभव आणि निरीक्षणं जाणून घेतली. त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. आजपर्यंत राज्यभरातील २५ ते ३० संस्थांसोबत या निमित्ताने संपर्क झाला आहे.

गतिमंद मुलांच्या लैंगिकता अधिकारांबद्दल समाज म्हणून आपण सर्वांनीच अधिक संवेदनशील होणं गरजेचं आहे हा मुद्दा तथापि मागची दोन वर्षे लावून धरते आहे. त्यासाठी पालक, शिक्षक आणि त्यांच्या सांभाळकर्त्या संस्था संघटनांपर्यंत बैठका, प्रशिक्षण, आधार गट, संवाद सत्र आणि अनियतकालिक यांमार्फत पोचण्याचा प्रयत्न करते आहे. तथापिचे गतिमंद मुलांच्या पालकांसाठीचे ‘हितगुज’ हे वार्तापत्र ८०० हून अधिक पालक-शिक्षकांपर्यंत पोहाेचते. तथापि संचालित ‘स्वीकार’ या पालकांच्या आधार गटाशी पुणे आणि परिसरातील अनेक पालक जोडले गेले आहेत. तथापि निर्मित ‘शरीर साक्षरता सर्वांसाठी (गतिमंद मुला-मुलींच्या पालक व शिक्षकांसाठी’) या संसाधनाचा राज्यातील अनेक संस्था आणि पालक उपयोग करत आहेत. पालक-शिक्षक यांच्या सोबतच्या संवादातून हे सर्व सहभागींना शेवटी एक नेहमी पडणारा प्रश्न असतो आणि तो म्हणजे ‘आमच्या मुलांशी आम्ही हे सर्व कसं बोलू?’ ‘आम्हाला हे माहीतही नाही आणि ते कसं सांगावं हेही माहीत नाही’ असा मुद्दा पुढे येतो. अनेकदा शिक्षक किंवा सांभाळकर्तेही याच प्रकारचा प्रश्न विचारतात. अर्थात हा प्रश्न रास्तच आहे. आपलं शरीर, वयात येणं, जवळीक, सुख, आरोग्य आणि सुरक्षितता अशा मुद्द्यांवर मुलांसोबतच काय मोठ्यांसोबतही संवाद साधण्यासाठी सोपी, सहज आणि मातृभाषेत असलेली संवाद साधनं हाताशी नसणं ही मोठीच समस्या आहे. तथापिचे हे संसाधन ही गरज ओळखून तयार केलं गेलं आहे. शिवाय आपल्या मुलांच्या विशेष क्षमता ओळखून या चित्ररूपी संसाधनाची योजना आम्ही केली आहे.

‘आम्हीही मोठे होतोय – गतिमंद मुलांसाठी शरीर साक्षरता आणि लैंगिकता संच’ याची निर्मिती केली आहे. याअंतर्गत तथापिने काही संवाद साहित्य, संसाधनं विकसित केली आहेत. गतिमंद मुलांसाठी ‘शरीर साक्षरता आणि लैंगिकता शिक्षण’ यावर संवाद साधण्यासाठी ‘आम्हीही मोठे होतोय’ हा चित्र संच आणि पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शिका हे संसाधन तथापिने नुकतेच तयार केले आहे. हा संच तथापिचे अच्युत बोरगावकर आणि शिक्षणतज्ञ डॉ. सुनीता कुलकर्णी यांनी लिहिला आहे. आपलं शरीर, भावना, स्व-प्रतिमा आणि आदर, वयात येताना होणारे बदल, खासगीपणा, आरोग्य आणि सुरक्षितता अशा सर्व मुद््द्यांवर गतिमंद मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधणारा असा हा अनोखा चित्र संच आहे. चित्र संच तथापि ट्रस्टमध्ये उपलब्ध आहे.

संपर्क - तथापि ट्रस्ट ९८५०८५१४९९

बातम्या आणखी आहेत...