अॅसिड हल्ला / नागपुरात महिला डॉक्टरांच्या पथकावर फेकले अॅसिड

हल्लेखोर वेडसर तरुणाला अटक, ३ महिला जखमी

प्रतिनिधी

Feb 14,2020 08:18:00 AM IST

नागपूर - हिंगणघाट येथील फुलराणीच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच नागपूर जिल्ह्यात सावनेर परिसरात पहिलेपार येथे नॅकोच्या एचआय‌व्ही प्रकल्पासाठी सर्वेक्षण करीत असलेल्या वैद्यकीय पथकावर एका वेडसर तरुणाने अॅसिड फेकल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत एका महिला डॉक्टरसह ३ ते ४ जण किरकोळ जखमी झाले. लोकांनी त्या व्यक्तीला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेत स्वच्छतागृहासाठी वापरल्या जाणाऱ््या अॅसिडचा वापर झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.


नागपुरातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे एक पथक नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (नॅको) च्या प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्यासाठी सावनेर परिसरात आले होते. सावनेर येथील पहिलेपार वस्तीत हे पथक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत असताना एक वेडसर तरुण हातात बाटली घेऊन तेथे पोहोचला. वेडाचे चाळे करतच त्या युवकाने अॅसिड टाकून तुमचा चेहरा खराब करू का?..असे सांगत या पथकाच्या दिशेने बाटलीतले अॅसिड फेकले. या अॅसिडचे शिंतोडे या पथकातील महिला डॉक्टरसह तीन-चार जणांच्या अंगावर उडाले. अचानक घडलेल्या या प्रकाराने महिला डॉक्टर व त्यांच्या सहकारी अक्षरश: हादरून गेल्या. या प्रकाराने गावातील लोक जमा झाले. त्यांनी अॅसिड फेकणाऱ्या तरुणाला पकडून चोप दिला. सावनेर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने आपले नाव नीलेश कन्हेरे (२२) असे सांगितले. तो नागपूर ग्रामीणमधील तेलंगखेडी येथील रहिवासी असून तो मनोरुग्ण असल्याचा सावनेर पोलिसांचा अंदाज आहे. या घटनेत तरुणाने स्वच्छतागृहासाठी वापरल्या जाणाऱ्या अॅसिडचा वापर केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकारचे अॅसिड तेवढे प्रभावी नसते. त्यामुळे त्याचे शिंतोडे हात आणि पायावर उडाल्यावर लाल रंगाचे केवळ चट्टे तयार झाले आहेत. त्यामुळे जखमा झालेल्या नाहीत, असे पोलिसांनी सांगितले. नागपुरात मेयो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

X