Column / पोळ्याचे संपादन

दिल्लीवाल्यांना काही सांगितले नाही सर, त्यांना पोळाबिळा माहीत नाही

प्रा. जयदेव डोळे

Sep 03,2019 08:36:00 AM IST

हॅलो, संपादक महाजनादेश बोलताय नाॽ मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून पीए क्रमांक सात बोलतोय. शुक्रवारी आपल्याला पोळा साजरा करायचाय. तुम्ही यायचंय त्यासाठी. येताना दोन पुरणपोळ्या, एक छोटा कासरा घेऊन आणि तुमच्या पेपराची झूल अंगावर पांघरून या. पोळ्या यासाठी की तिकडे सांगली-कोल्हापूर पूरग्रस्त झाल्याने आपण मेजवानी करणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री साहेबांच्या मिसेसने सांगितलेय. कासऱ्याचे कारण तुम्ही एका टेबलाच्या पायाशी गळ्यात कासरा बांधून बसायचेय. सारे संपादक उगाच एकमेकांशी ‘तुझं कसंय रेॽ’ असे बोलून तक्रारी करत बसतात. मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकतच नाहीत. झूल तर आवश्यक आहेच ! त्याशिवाय तुम्हाला कोण ओळखणारॽ या तर मग...


हॅलो, ‘जनाशीर्वाद’चे संपादक बोलताय नाॽ मी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरून बोलतोय. त्यांचा पीए क्रमांक तेरा. शुक्रवारी पोळा असल्याचे तुम्हाला कळले असेलच. त्या दिवशी तुम्ही जिमला न जाता थेट इकडेच या. तुमची खांदेमळणी करणार आहेत मुख्यमंत्री. अहो, खांदेमळणीच का म्हणून काय विचारताॽ खांद्याच्या वरचा अवयव गहाण नाही का ठेवला तुम्ही दिल्ली दरबारी ! आमच्या राज्यात त्या केसाळ, टणक अन्‌ धोकादायक भागाचे काही काम नाही असा ठराव कॅबिनेटने केलेलाय. अंघोळॽ हो, हो. अंघोळीची सोय आहे. ती झाली की केशरी, शेंदरी, नारिंगी रंगाचे ठसे मारले जातील तुमच्या अंगावर ! फक्त एक करा- तुमच्या दैनिकाची झूल पांघरून या. तुम्ही संपादक म्हणून ओळखायला तेवढेच पुरेय सिक्युरिटीला...


हॅलो, ‘शिवस्वराज्य’ दैनिकाचे संपादक हवे आहेत. त्यांना सांगा, शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी पोळा आयोजित केलाय बंगल्यावर आणि येताना दोनच गोंडे आणायला सांगा त्यांना. एक मुख्यमंत्री साहेबांसमोर घोळवायला, दुसरा दिल्लीत कसा घोळणार ते दाखवण्यासाठी आणायचा. टोकदार वस्तू चालणार नाहीत असेही त्यांना सांगा. शिंगांना टोपणे घालायची विसरू नका म्हणावे त्यांना. ढुसणी देणे, फुर्र करणे, डुरकावणे यावर पूर्ण बंदी राहील पोळाभर असेही सांगितलेय म्हणावे. काही संपादक असे आवाज काढतात. ढुसण्या द्यायचा इरादा दाखवतात. थांबवलेय त्यांना. चारा, वैरण आणि आंबोण घातलीय त्यांच्या मालकांना ! दावणीही पाठवायच्या होत्या संपादकांसाठी. दिल्लीमेड होत्या त्या !! मिळाली असेल तर दावणीसह यायला सांगा संपादकांना. नमस्कार. कायॽ मिसेस बैल येऊ देत का म्हणतायॽ माहीत नाही बुवा. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मिसेसची तशी काही ऑर्डर नाही. बराय. ठीक.
हॅलो, आकाशवाणीॽ न्यूज सेक्शन द्या. कोणीच नाहीयेॽ अरे हो, सध्या सरकारी इव्हेंट्स खूप असतात. गेले असतील तिकडे कव्हर करायला. बरं, हे पाहा, न्यूज एडिटरला सांगा की शुक्रवारी पोळ्याला यायचंय. घुंगरे बांधून यायला कळवा त्यांना. मुख्यमंत्री बोलू लागले की माना डोलावताना घुंगरांचा इफेक्ट आला पाहिजे रेडिओवर ! तुमच्याकडे आहेत घुंगरूॽ मग एक जादा माळ विकत घेऊन यायला सांगा. आळीपाळीने साऱ्यांना संपादकांनी वाजवायला शिकवायची पाळी आकाशवाणीची आहे म्हणावे. आणि हे पाहा, मुख्यमंत्री बोलताना फार वेळ बोलतात. या ठिकाणी, या ठिकाणी असे खूपदा म्हणतात. ते एडिट करायला सांगा. नमस्कार... ते तेवढे घुंगरांचे सांगायला विसरू नका, बरे का !


हॅलो, कॅन आय स्पीक टू द एडिटर ऑफ ‘पोल अँड खोल’ प्लीजॽ आय ॲम पीए नंबर फोर्टीन फ्रॉम द चीफ मिनिस्टर्स बंगलो... अरेच्चा ! सॉरी हा. इंग्रजी पेपरात आपली पोरे असतात हे विसरलोच मी. इंग्लिश शिकायची सरकारी योजना सक्सेसफुल झाली म्हणायची. तर मी सांगत होतो की शुक्रवारी पोळा आहे बंगल्यावर. एडिटर साहेबांना बोलावलेय पार्टीला. कायॽ संपादक बाई आहेतॽ अरेच्या! बरं, हे बघा. मॅडमना सांगा की येताना आरतीचे तबक, दोन पुरणपोळ्या आणि झेंडूची फुले घेऊन यायचे. नाही, नाही. हे सगळे मुख्यमंत्र्यांसाठी नाही. मुख्यमंत्र्यांची सेवा करायचे भाग्य मिळाले म्हणून सारे संपादक एकमेकांना ओवाळतील, पुरणपोळ्या भरवतील आणि झेंडूचे हार गळ्यात घालून घेतील ! बाईंना सांगा की शालीऐवजी पेपराची झूल अंगावर घेऊन आले पाहिजे. झुलीला इंग्लिशमध्ये काय म्हणतातॽ अरे बैला, तू शोध अन्‌ सांग की तिला...


हॅलो, ‘कामना’ दैनिकाचे संपादक आले का दिल्लीहूनॽ देता का प्लीजॽ मुख्यमंत्र्यांचा पीए क्रमांक सत्तावीस बोलतोय...रामराम साहेब. आमच्या साहेबांनी शुक्रवारी पोळ्याचा कार्यक्रम आखलाय सर बंगल्यावर. आपल्याला बोलावण्यासाठी फोन केला साहेब ! वेळ आहे का साहेबॽ आमचे साहेब विचारत होते की ‘कामना’कार येतात का आपल्या पोळ्याला ते विचारा. नाही साहेब, पोळा बैलांचा असतो. वाघांचा नसतो ! आम्ही निमंत्रितांना झूल पांघरून यायला बजावलेय. तुम्ही वाघाची कातडी पांघरून आला तरी हरकत नाही सर. आहे का ती आपल्याकडे साहेबॽ नाही तर बाजारातून घेऊन पाठवतो...!!


हॅलो, सीएम साहेब, गुड मॉर्निंग, पीए दहा नंबर हिअर सर. पोळ्याची निमंत्रणे देऊन झालीत. सगळी व्यवस्था झालीय. दिल्लीवाल्यांना काही सांगितले नाही सर. त्यांना पोळाबिळा माहीत नाही. त्यांच्यासाठी काय ठरवू सर? डॉग शो ठीक राहील का? त्यांचे मालक, सुंदर सुंदर साखळ्या अन् शेपूट हलवा, मागच्या पायांवर उभे राहा, पंजा द्या अशी स्पर्धा ठेवूया?

X
COMMENT