Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Action for Suspension of District Prison Guard Borase and Sonawane

जिल्हा कारागृह रक्षक बोरसे, सोनवणेंवर केली निलंबनाची कारवाई

प्रतिनिधी | Update - Dec 07, 2018, 09:23 AM IST

कैदी पसार प्रकरण : कारागृह उपमहानिरीक्षक देसाईंची माहिती

 • Action for Suspension of District Prison Guard Borase and Sonawane

  जळगाव- जिल्हा कारागृहाच्या स्वयंपाक घराच्या मागील भिंतीवरून दोन कैद्यांनी पलायन केल्याच्या घटनेनंतर गुरुवारी सकाळी औरंगाबाद विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी तपासणी करून प्राथमिक चौकशी केली. चौकशी करून गेल्यानंतर कैद्यांची जबाबदारी असलेले कारागृह रक्षक बाळू उत्तम बोरसे व वासुदेव हिरामण सोनवणे यांच्यावर सायंकाळी देसाई यांनी निलंबनाची कारवाई केली.

  जळगाव कारागृहातून बुधवारी जामनेर तालुक्यातील शेषराव सुभाष सोनवणे व रवींद्र भीमा मोरे हे कच्चे कैदी स्वयंपाक घराच्या पाठीमागे असलेल्या भिंतीवरून उडी मारून पळून गेले होते. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत गुरुवारी सकाळी कारागृह उपमहानिरीक्षक देसाई यांनी भेट दिली. त्याचप्रमाणे कारागृहातील नोंदी व इतर रजिस्टरही त्यांनी तपासले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कैद्यांना कारागृह रक्षक बाळू बोरसे व वासुदेव सोनवणे यांनी बॅरेकमधून बाहेर काढलेले होते. त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी करण्यात येईल. कारागृहातील कैदी व इतरही कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर कारागृहातील उणिवा शोधण्याबरोबर कारवाई करण्यात येईल.

  कैद्यांची संख्या नियंत्रणाबाहेर; विभागातील १४ कारागृहांमध्ये भरणार १०० पदे

  आदर्श रचनेप्रमाणे जिल्हा कारागृहाच्या भिंतींची उंची कमी आहे. भिंतींची उंची वाढवण्याचाही प्रस्ताव आहे. त्या अनुषंगाने उंची वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कारागृहाची २०० कैद्यांची क्षमता असताना सद्य:स्थितीत ४५० कैदी आहेत. दुपटीपेक्षा जास्त कैद्यांची संख्या आहे. नियमाप्रमाणे सहा कैद्यांमागे एक शिपाई असणे आवश्यक आहेत. कैदी संख्येनुसार ८० शिपाई आवश्यक आहेत. सद्य:स्थितीत ४० पैकी २८ कर्मचारी आहेत. त्यातही इतर जबाबदारी त्यांच्यावर आहे. कर्मचाऱ्यांसाठी १८ काॅटर्स आहेत. इतर कर्मचाऱ्यांना बाहेर राहावे लागते. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. विभागातील १४ कारागृहांमधील पदांबाबत आढावा घेतला आहे.


  लवकरच या कारागृहांमध्ये १०० कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये जळगाव येथील जिल्हा कारागृहालाही जास्तीत जास्त कर्मचारी देण्याचा प्रयत्न आहे. लवकरच कारागृहाला नियमित कारागृह अधीक्षक मिळेल.

Trending