आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयात पुन्हा धडक कारवाई; गुन्हेगारांच्या २१ समर्थकांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जिल्हा न्यायालयात गुन्हेगारांना समर्थन देण्यासाठी आलेल्या समर्थकांची पोलिसांनी धरपकड केल्याच्या कारवाईनंतर तीनच दिवसात गुरुवारीही (दि. ११) पोलिसांनी अचानक न्यायालय परिसरात दिवसा कोम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारांच्या २१ समर्थकांना अटक केली. सोमवारी अशाच प्रकारे धडक कारवाई करत सुमारे ६० समर्थकांना अटक करण्यात आली होती. 


गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी गणेशोत्सवामध्ये पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सर्व सूत्रे हाती घेत गुन्हेगारांवर जरब निर्माण करण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशनची धडक कारवाई करत दीडशे गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई केली. यापाठोपाठ जिल्हा न्यायालयात खटला कामांसाठी पोलिसांनी हजर केलेल्या विविध गुन्ह्यातील 'भाईं'ना भेटण्यासाठी आलेल्या समर्थकांवर पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे ४० ते ५० समर्थकांना ताब्यात घेतले. यामध्ये पुणे येथील कुप्रसिद्ध 'गोल्ड' गँग टोळीच्या समर्थकांचा समावेश होता. या कारवाईचा गुन्हेगारांच्या समर्थकांना विसर पडत नाही तोच गुरुवारी पुन्हा सकाळी पोलिसांनी जिल्हा न्यायालयाच्या तीन प्रवेशद्वारांसह न्यायालय परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवत संशयित आणि विनाकामाचे फिरणाऱ्या ४० ते ५० संशयितांना ताब्यात घेतले. 


यातील काही कोर्ट कामासाठी आले होते. चौकशीमध्ये खात्री पटल्यानंतर संशयितांना सोडून दिले. मात्र, २१ संशयित विनाकामाचे न्यायालयात फिरत असल्याने संशयितांच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त बापू बांगर, शांताराम पाटील, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, मंगलसिंग सूर्यवंशी, अशोक भगत, सुभाषचंद्र देशमुख, किशोर मोरे, सूरज बिजली, मनोज करंजे, गुन्हे शाखेचे दिनेश बर्डेकर, आनंद वाघ यांच्या पथकासह पोलिस कारवाईत सहभागी झाले होते. 


कारवाईचे स्वागत
दोन दिवसांपूर्वीच धडक कारवाई करत गुन्हेगारांच्या समर्थकांच्या मुसक्या आवळणाऱ्या खाकीने दोन दिवसांनी पुन्हा न्यायालय परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवत साक्षीदारांना धमकावणाऱ्या संशयितांना अटक केली. अायुक्तांनी गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिकाऱ्यांना 'फ्री हँड' देत धडक कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे वकिलांसह नागरिकांनी अभिनंदन केले. 


न्यायालयात येणाऱ्यांवर नजर 
न्यायालयात येणाऱ्या संशयितांवर पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे. संशयास्पदरीत्या फिरत असलेल्यांवर कडक कारवाई केली जात आहे. साक्षीदारांवर दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी आहेत. पुढेही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. 
- लक्ष्मीकांत पाटील, उपआयुक्त 

बातम्या आणखी आहेत...