आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पाऊचच्या फॅक्टरीला लावले सील, आयुक्तांनी केली कारवाई; दोन ट्रॅक्टर पाऊच केले जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पाण्याचे पाऊच तयार करणाऱ्या जुने शहरातील एका फॅक्टरीला ११ सप्टेंबर रोजी सील लावण्यात आले. दरम्यान लगेचच खोलेश्वर भागात पाण्याच्या पाऊचचे २५ कट्टे जप्त करण्यात आले. या दोन्ही कारवाईत महापालिकेने एकूण दहा हजार रुपयाचा दंड वसुल केला. दरम्यान प्लास्टिक पिशवी बंदीची कारवाई आणखी तिव्रतेने राबवण्याची शक्यता आहे. 


शासनाने प्लास्टिक पिशवी वापरावर बंदी घातल्याने महापालिकेने सतत दंडात्मक कारवाया केल्या. नेमके कोणत्या प्रकारच्या प्लास्टिक वापरावर बंदी आहे? याबाबत व्यावसायिकांनी प्रश्न उपस्थित केल्या नंतर व्यावसायिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळाही घेण्यात आली. या कार्यशाळेत कोणत्या प्रकारच्या प्लास्टिक वापरावर बंदी आहे, याबाबत व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यात आले. यात प्लास्टिक पाऊच मध्ये विक्री होणाऱ्या पाण्याच्या पाऊचचाही समावेश होता. महापालिकेने अनेक भागात पाण्याच्या पाऊचची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र अद्यापही पाण्याच्या पाऊचची विक्री काही भागात सुरु आहे. जुने शहरातील अन्नपूर्णा माता मंदिरा समोरील जाजू नगर मध्ये पाण्याचे पाऊच तयार करण्याची फॅक्टरी आहे. 

 

ओरेन पाणी पाऊच कंपनीवर छापा घालून या फॅक्टरीला सील करण्यात आले. ही कारवाई आयुक्त जितेंद्र वाघ यांनी स्वत: केली. या कारवाईत नगर सचिव अनिल बिडवे, झोन अधिकारी वासुदेव वाघाळकर, सहायक आयुक्त पुनम कळंबे, आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर, आरोग्य निरीक्षक सुरज खेडकर, प्रशिश भातकुले, प्रशांत जाधव, विवेक मुंडे, रवी मोहोत, कुणाल भातकुले, सोहम कुळकर्णी, आशिष इंगोले, विजय गवई आदी सहभागी झाले होते. आेरेन पाणी पाऊच कंपनीला सील करुन कंपनीकडून पाच हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. दरम्यान ही कारवाई आटोपल्या नंतर खोलेश्वर भागात अर्जुन अक्वा या प्रतिष्ठित पाण्याच्या पाऊचची विक्री होत असल्याची माहिती महापालिकेला मिळाल्या नंतर आरोग्य विभागाने या प्रतिष्ठानावर छापा घालून पाण्याच्या पाऊचचे २५ कट्टे जप्त करुन पाच हजार रुपयाचा दंड केला. 


असे अडकले सावज
अन्नपूर्णा माता मंदिरा समोरून शेगावकडे जाणारा रस्ता जातो. मंदिरा समोर जाजू नगर वसले आहे. जाजू नगरच्या अखेरच्या टोकाला हा कारखाना आहे. दोन युवक पाण्याच्या पाऊचचे कट्टे दुचाकीवर घेवून जात असताना आरोग्य निरीक्षक सोहम कुळकर्णी आणि भातकुले यांनी त्यांना पकडले. यापूर्वीही या युवकांकडून दंड वसुल करण्यात आला होता. याबाबतची माहिती आयुक्त जितेंद्र वाघ यांना आरोग्य निरीक्षकांनी दिल्या नंतर आयुक्त तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या दोन्ही युवकांनी आपण हे पाऊच जाजु नगर मधील पाऊच फॅक्टरीतून आणल्याची माहिती प्रशासनाने दिली. या माहितीवरून या पाऊच फॅक्टरी पर्यंत प्रशासनाला पाेहोचता आले. ही फॅक्टरी सुरु असल्याची माहिती कोणालाच नसल्याने आता पर्यंत सर्रासपणे पाण्याचे पाऊच भरण्याचे आणि त्याची विक्री करण्याचे काम सुरु होते. 

 

दोन ट्रॅक्टर पाऊच जप्त 
फॅक्टरीवर केलेल्या कारवाईत महापालिकेने फॅक्टरीत तयार झालेले पाऊचही जप्त केले. या फॅक्ट्ररीतून एकूण दोन ट्रॅक्टर पाऊच जप्त केले. यावरून या फॅक्टरीत मोठ्या प्रमाणात पाऊच तयार केले जात होते. ही बाब स्पष्ट होते. 


महापालिकेला सहकार्य करुन वापर टाळा 
कोणत्या प्रकारच्या प्लास्टिक वापरावर बंदी आहे. याबाबतची माहिती व्यावसायिक बंधुना दिली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकचा वापर घातक असल्यानेच ही कारवाई सुरु आहे. व्यावसायिकांसह नागरिकांना बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर टाळून महापालिकेला सहकार्य करावे. 
- जितेंद्र वाघ, आयुक्त महापालिका 

 

बातम्या आणखी आहेत...