आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूचा रुग्ण दगावल्यास सीओ, वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील अनेक गावे डेंग्यू सदृश तापाने फणफणत असताना उस्मानाबादसह कळंबमध्ये बालकाचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबादेतही पालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याची मुद्दा 'दिव्य मराठी'ने समोर आणल्यानंतर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मंगळवारी (दि.५) आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी डेंग्यू सदृश्य रुग्णांच्या भागात जाऊन अॅबेटिंगसह जनजागृती न केल्यामुळे वैद्यकीय अधीक्षकांना, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या व बैठकीला हजर नसलेल्या सीओंवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा का दाखल करू नये, असे म्हणत यापुढे डेंग्यूने रुग्ण दगावल्यास सीओंसह वैद्यकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार असल्याचा इशारा खासदारांनी दिला.


जिल्ह्यातील उमरगा, कळंबसह उस्मानाबाद शहर डेंग्यू सदृश्य तापाने फणफणले असून अनेक रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. मंगळवारी यासंदर्भात 'दिव्य मराठी'ने वृत्त प्रसिध्द केले होते. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आरोग्य विभागाची जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार कैलास पाटील, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, वैद्यकीय अधीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पालिकेचे सीओ, स्वच्छता विभागाचे कर्मचारी आदींची उपस्थिती होती. यावेळी खासदार राजेनिंबाळकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून डेंग्यू सदृश रुग्णांची माहिती घेतली. तसेच संबंधित रुग्णांच्या गावात जाऊन परिसराची पाहणी करून अॅबिट औषध टाकले का, तसेच नागरिकांना डेंग्यूचे डास हद्दपार करण्यासाठी कोरडा दिवस पाळण्याबाबत जनजागृती केली का, अशी विचारणा केली. त्यावेळी एकाही वैद्यकीय अधिकाऱ्याने तसे केले नसल्याचे समोर आले. पालिका, नगरपंचायतच्या सीओसह स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसह धुर फवारणी करण्यास सांगितले. आगामी काळात डेंग्यूने रुग्ण दगावल्यास संबंधित पालिका, नगरपंचायतीच्या सीओंसह वैद्यकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार असल्याचे सांगितले.

वैद्यकीय अधिकारी अनभिज्ञ
उमरगा, कळंब, वाशी यासह इतर तालुक्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तालुक्यातील गावांची संख्या विचारली असता माहित नसल्याचे सांगितले. तसेच किती रुग्ण डेंग्यू सदृश्य आहेत व किती डेंग्यू पॉझिटिव्ह आहेत याबाबतची माहिती सांगता आली नाही. यामुळे जबाबदार अधिकारी किती रुग्णांकडे दुर्लक्ष करतात याचा प्रत्यय आला.

अशी अाहे रुग्ण संख्या
१ मलेरिया पॉझिटिव्ह
१३५ डेंग्यू सदृश्य
५ डेंग्यू पॉझिटिव्ह
६ चिकुणगुणिया पॉझिटिव्ह
२९ जणांचे अहवाल अप्राप्त

उस्मानाबादेत अॅबेटिंगसाठी स्पेशल यंत्रणा राबवण्याच्या सूचना
उस्मानाबाद शहराच्या विविध भागात पाण्याचा निचरा होत नाही. तसेच अनेक ठिकाणी पाणी काढून देण्यास अडचणी आहेत. यासाठी अॅबेटिंगसह धूर फवारणी करण्यासाठी स्पेशल टीम तयार करण्याच्या सूचना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी बैठकीत दिल्या.
 

बातम्या आणखी आहेत...