आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद : रियल लाइफमध्ये आदित्य ठाकरे अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मला 'नायक' दिसतो. दोघेही तरुण तडफदार आहेत. आगामी काळात राजकारणात अशाच 'नायकां'ची गरज आहे. उच्चशिक्षित, तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. अभ्यासू तरुण राजकारणी देशाची स्थिती बदलू शकतात, असे मत हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते अनिल कपूर यांनी व्यक्त केले आहेत.
एका कार्यक्रमानिमित्त अनिल कपूर रविवारी औरंगाबादेत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी मुक्त संवादही साधला. तसेच राजकारणावरही भाष्य केले. आपल्या एका चित्रपटात एक दिवसाचा मुख्यमंत्री बनलेल्या 'नायका'ला प्रत्यक्ष आयुष्यातील कोणत्या नेत्यात 'नायक' दिसतो, या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. ६४ वर्षीय अनिल कपूर म्हणाले, मी बाळासाहेबांपासून ठाकरे कुटुंबीयांना ओळखतो. माझा 'नायक' चित्रपट पाहून राजकारणी प्रभावित झाले होते. अनेकांनी मला त्यावेळी प्रत्यक्ष बोलून भावना व्यक्त केल्या. चित्रपटाप्रमाणे त्यांनी काम केले तर नक्कीच देशात बदल दिसेल. अनिल कपूर म्हणाले, सध्याच्या पिढीत आदित्य ठाकरे आश्वासक वाटतात.
युतीच्या सरकारवर काय वाटते...
भाजप-शिवसेना युतीच्या सरकारच्या सरकारबद्दल काय वाटते, या प्रश्नावर अनिल कपूर म्हणाले, युती किंवा इतर हा चर्चेचा मुद्दा नाही. तर युवकांनी सरकार चालवावे, असे मला वाटते. तरुणांमध्ये प्रचंड उर्जा आहे, आताची पिढी संवेदनशील अन् आक्रमक आहे. त्यांनी सक्रीय राजकारणात येऊन काम करावे.
३४ वर्षांत अनेक सकारात्मक बदल झाले
मी जिथे जातो तिथे लोक 'नायक'बद्दल बोलतात, राजकारणी या चित्रपटाने प्रभावित झाले, याचे मला समाधान वाटते. मी एक असा चित्रपट करू शकलो जो कायम चर्चेत असतो, याचा आनंद होतो. माझ्या करिअरला दिशा देण्यात 'मेरी जंग' चित्रपटाचा सिंहाचा वाटा आहे. त्याला आज ३४ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने बॉलीवूड प्रवासावर नजर मारताना असे दिसते की, कलावंत आणि तंत्रज्ञानात अमुलाग्र बदल झाले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.