आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. ही स्वच्छता शाश्वत स्वरुपात टिकविण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक प्रसिद्धीसाठी व ग्रामीण जनतेच्या वर्तन बदलासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक सराफ बँन्ड ॲम्बेसिडर म्हणून काम करणार असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
स्वच्छ भारत मिशनच्या (ग्रामीण) ऑडिओ - व्हिडीओ जाहिरातीचे प्रकाशन श्री. लोणीकर व सिने अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, अभिनेत्री निर्मिती सावंत उपस्थित होते.
श्री. लोणीकर म्हणाले,2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमाची सुरुवात झाली. 2 ऑक्टोबर 2019 ऐवजी 18 एप्रिल 2018 रोजीच ग्रामीण महाराष्ट्र हागणदारी मुक्त घोषित करण्यात आला. ग्रामसेवक ते मुख्य सचिव व सरंपचापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. 34 जिल्हे, 351 तालुके व 27 हजार 667 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त घोषित केल्या आहेत. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी यापुर्वी चार हजार रुपये इतके अनुदान देण्यात येत होते. परंतु आता बारा हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. गेल्या पाच वर्षात 60 लाख शौचालये बांधण्यात आली.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी आणि ग्रामीण जनतेच्या वर्तन बदलासाठी सिने अभिनेते अशोक सराफ यांना घेऊन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने बनविलेल्या ऑडिओ व्हिडीओ जाहिराती उपयोगी पडतील. दरम्यान सिने अभिनेते अशोक सराफ यांनी ग्रामीण स्वच्छतेसाठी जनतेसोबत विविध माध्यमातून संवाद साधण्यासाठी कायम तत्पर राहील असे यावेळी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.