मुलाखत : या कारणामुळे निवडणूक लढण्याचे ठरवले, ‘रयतेचे कल्याण’ हेच तत्त्व - अभिनेते डॉ.अमोल कोल्हे

दिव्य मराठी

Apr 20,2019 12:17:00 PM IST

पुणे - निवडणुकीच्या तोंडावर राजकारणात येणारे सेलिब्रिटी नवीन नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या भूमिकांमुळे लोकप्रिय झालेले डॉ. अमोल कोल्हे यास अपवाद आहेत. महाराजांच्या विचारांनी भारावलेल्या कोल्हेंनी डॉक्टरकी सोडून आधी अभिनय व नंतर राजकारणातही प्रवेश केला. ४ वर्षांपूर्वी शिवसेनेत आलेले डॉ. कोल्हेंनी आता राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवली. शिरूरमधून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव अढळराव यांना त्यांनी आव्हान दिलंय.

प्रश्न : शिवाजी महाराजांना अभिप्रेत हिंदुत्व व सध्याचे हिंदुत्व यात काय फरक आहे?
डॉ. कोल्हे : हिंदू धर्मापेक्षा महाराजांना ‘रयतेचे राज्य’ जास्त अभिप्रेत हाेते. प्रत्येक माणसाला सुखाने, समाधानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या राजधर्माचा आदर्श महाराजांनी घालून दिला. म्हणून ‘रयतेचं कल्याणकारी राज्य’ हे मला अधिक महत्त्वाचे वाटते.

प्रश्न : निवडणूक लढवण्याचा तुम्ही नेमकं केव्हा ठरवलंत?
डॉ. कोल्हे : राजकारणात मी हाेताेच. मात्र, राष्ट्रीय राजकारणाचा बाज बदलतोय हे दिसायला लागलं तेव्हा मी निवडणुकीचा निर्णय घेतला. विकासाची भाषा सोडून केवळ भावनिक मुद्द्यांची चर्चा होऊ लागली, ती मला खूप धोक्याची वाटली. विशेषत: एकदा भाजप खासदार साक्षी महाराज बोलले की ‘मोदीजी पुन्शी सत्तेवर आले तर २०२४ ची निवडणूक शेवटची निवडणूक असेल.’ तो क्षण माझ्यासाठी निर्णायक ठरला. लालशाही वाचवण्यासाठी माझ्यासारख्या अनेक सुशिक्षित नागरिकांनी त्याच वेळी सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. देशाला, देशातील नागरिकांना कुणी गृहीत धरत असेल तर लोकशाहीची ताकद दाखवून देण्याची हीच वेळ आहे.

प्रश्न : अभिनेता ते नेता ही भूमिका बदलत असताना, शिवाजी महाराजांची कोणती तत्त्वे तुम्ही आवर्जून अवलंबत आहात?
डॉ. कोल्हे : साकल्याने विचार करणे, मूठभर तळागाळातील माणसांना सोबत घेऊन प्रचंड ताकद उभी करणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण मला सर्वाधिक प्रेरणा देते. आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहाण्याची संभाजी महाराजांची वृत्ती.

प्रश्न : तुम्ही खासदार झालात तर लोकप्रतिनिधी म्हणून महाराजांच्या कोणत्या तीन शिकवणी प्रत्यक्षात आणाल?
डॉ. कोल्हे : शेतकऱ्यांचा कल्याण, स्त्रियांचा सन्मान आणि दगडफेक करणाऱ्या तरुणांपेक्षा दगड रचणाऱ्या विधायक तरुणाईचा उद्धार.

प्रश्न : शिरूर मतदारसंघात नेमकं काढणं आव्हान वाटतंय?
डॉ. कोल्हे : गेल्या १५ वर्षांत न झालेली कामे हा प्रमुख मुद्दा आहे. विरोधाविषयी मला चादरच आहे. पातळी सोडून कोणतीही टीका करत नाही. त्यांनी त्यांच्या परीने काम करण्याचा प्रयत्न केला असेलही. पण या मतदारसंघाचे प्रश्न सुटले नाहीत. नवीन पिढीच्या नवीन प्रश्नांना त्यांनी हात घातला नाही. त्यामुळे आता जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. मला मिळणारा प्रतिसाद हे येथील पंधरा वर्षांच्या निष्क्रियतेचा जनतेने दिलेले उत्तर आहे.

प्रश्न : शिवाजी महाराजांच्या नावाचा पक्ष गैरवापर करतात असं नाही वाटत?

डॉ. कोल्हे : प्रत्येक जण आपापल्या परीने महाराज मांडण्याचा प्रयत्न करतात. केवळ अफजल खानाचा कोथळा काढणाऱ्या महाराजांवर फोकस करायचा की रयतेचे हित जपणारे, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका सांगणाऱ्या महाराजांवर फोकस करायचा हे जनता नक्कीच जाणून आहे.

X