आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोलकाता - मॉब लिंचिंगच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रावर स्वाक्षरी केल्यामुळे आपल्याला धमकीचे फोन येत आहेत, असा दावा अभिनेता कौशिक सेन याने गुरुवारी केला. मोदी यांना ज्या ४९ मान्यवरांनी पत्र पाठवले होते त्यात कौशिक सेनचाही समावेश होता. एक वरिष्ठ पोलिस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहे.
कौशिक सेन याने सांगितले की, ‘बुधवारी मला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. मॉब लिंचिग आणि असहिष्णुता याच्याविरोधात आवाज उठवणे थांबवले नाही तर गंभीर परिणाम होतील, मी मार्ग बदलला नाही, तर ठार मारण्यात येईल, अशी धमकी मला देण्यात आली. मी पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. धमकी देणाऱ्याचा फोन क्रमांकही पोलिसांना दिला आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मी अशा धमक्यांना घाबरत नाही. पंतप्रधानांना पत्र पाठवणाऱ्या मान्यवरांनाही मी या घटनेची माहिती दिली असून त्यांनाही तो क्रमांक पाठवला आहे.’
चित्रपट निर्माते, लेखक आणि अभिनय या क्षेत्रातील ४९ मान्यवरांच्या एका गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून देशातील अलीकडच्या मॉब लिचिंगच्या घटनांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती. भगवान श्रीरामाच्या नावावर मॉब लिंचिंगचे प्रकार होत आहेत, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला होता.
दरम्यान, कौशिक सेन याने या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.