आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकेश-चैत्राली गुप्तेची एकुलती एक लेक करतेय सिनेसृष्टीत एन्ट्री, 'एक सांगायचंय...'मध्ये झळकणार के.के. मेननसोबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडील लोकेश आणि आई चैत्राली यांच्या पावलावर पाऊल टाकत शुभवी लोकेश गुप्ते चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित 'एक सांगायचंय.... Unsaid Harmony' या चित्रपटातून शुभवीच्या अभिनयाचा प्रवास सुरू होत आहे. देवी सातेरी प्रॉडक्शननं या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 

चित्रपटात केके मेनन आणि राजेश्वरी सचदेव यांच्यासह पद्मावती राव, मिलिंद फाटक, अजित भुरे, विनीत शर्मा, शाल्व किंजवडेकर, हर्षिता सोहल, विभव राजाध्यक्ष, अभिजित अमकर, सचिन साळवी  आदींच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचं गीतलेखन जितेंद्र जोशी, संगीत दिग्दर्शन शैलेंद्र बर्वेनं केलं आहे. ऑस्कर विजेत्या रेसूल पुकुट्टीनं चित्रपटाच्या ध्वनी आरेखनाची जबाबदारी सांभाळली आहे, तर पुष्पांक गावडेनं सिनेमॅटोग्राफी केली आहे. लोकेश विजय गुप्तेनं या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह त्याचं लेखन, संकलनही केलं आहे. तर चैत्राली गुप्तेनं चित्रपटाच्या वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे.नातेसंबंधांबाबतची एक अत्यंत संवेदनशील कथा या सिनेमात पहायला मिळणार आहे. 

 

चित्रपटातील पदार्पणाविषयी शुभवी म्हणाली, 'चित्रपटात माझ्याच वयाच्या एका मुलीची भूमिका चित्रपटात आहे, हे मला माहीत होतं. पण बाबाला कधी सांगितलं नाही, की मला काम करायचंय. एके दिवशी अचानक बाबाच मला येऊन म्हणाला, 'हाय इरा, कशीयेस? मग मी हसले. पण त्याने मला ऑडिशन द्यायला लावली. ऑडिशननंतर माझी कार्यशाळा झाली. स्क्रीप्टचं टीमबरोबर वाचन झालं. या सगळ्याचा मला चित्रीकरणावेळी फायदा झाला. तसंच सगळ्यांनीच खूप मदत केल्यामुळे मला पाहिल्यांदाच काम करत असल्यासारखं वाटलंच नाही.'

 

'मला सध्या तरी आवड आहे, म्हणून काम करतेय. पण पुढे जाऊन अभिनेत्री म्हणूनच काम करेन या विषयी आताच काही सांगता येणार नाही,' असंही शुभवीनं सांगितलं.

बातम्या आणखी आहेत...