आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्री किरण ढाणे म्हणाली, धावपटू साकारणे आव्हानात्मक...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'पळशीची पीटी' या आगळ्यावेगळ्या चित्रपटात अभिनेत्री किरण ढाणे हिने मुख्य भूमिका बजावली आहे. या चित्रपटाचा 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर' रविवारी २४ नोव्हेंबर रोजी, 'झी टॉकीज'वर होणार आहे. या खास चित्रपटाच्या निमित्ताने किरणशी मारलेल्या गप्पा;

या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?


यात मी भाग्यश्री देवकाते ही भूमिका साकारली आहे. रोजचे जीवन जगण्यासाठी खडतर प्रवास कराव्या लागणाऱ्या गरीब कुटुंबातील ही मुलगी आहे. 'आपण स्वबळावर आपली परिस्थिती बदलू शकतो' याची जाणीव झाल्यानंतर, तिने आपल्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास करायचे ठरवले आहे. या साध्याभोळ्या मुलीचा, स्वप्नपूर्तीसाठी सुरू असलेला प्रवास या चित्रपटात पाहायला मिळतो.

धावपटू म्हणून भूमिका करण्याचे आव्हान कसे स्वीकारलेस?


खेड्यातील एका मुलीची भूमिका करायची होती. त्यामुळे खेड्यातील मुलींचे वागणे-बोलणे, त्यांचे हावभाव यांचा अभ्यास करणे गरजेचे होते. अर्थात, धावपटूची भूमिका साकारणे, ही गोष्ट अधिक आव्हानात्मक होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने, भाग्यश्रीला धावण्याचा सराव सुद्धा अनवाणी पायांनी करावा लागतो. त्यामुळे मलाही, अनवाणी पायांनी धावण्याचा सराव करणे आवश्यक होते.

सहकलाकारांसह काम करण्याचा अनुभव कसा होता?


टीम खूपच छान होती. सगळ्यांच्यात मिळून-मिसळून राहिल्याने काम उत्तमरित्या पार पडले. मला उन्हातून, अनवाणी पायाने माळरानासारख्या ठिकाणी धावावे लागत होते. पण, अशावेळी माझे सहकलाकार भर उन्हात मला प्रोत्साहन देण्यासाठी थांबत असत.

चित्रीकरण गावातील भागात झाले आहे. हा अनुभव कसा होता?


गावकऱ्यांची खूप मदत झाली. माळरानावर शूट करत असताना सावली अजिबात मिळत नसे. जेवण्याच्या ब्रेकमध्ये उन्हातच बसावे लागायचे. त्यातल्या त्यात कधी जनरेटरची गाडी उभी असेल, तर तिच्या सावलीचा आडोसा घेतला जायचा.

चित्रीकरणादरम्यानची एखादी आठवण सांगशील का?


राहुल मकदुमने केलेले विनोद असोत किंवा राहुल बेलापुरकर सर आणि धोंडिबा कारंडे सर यांनी केलेली मदत असो, लक्षात राहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पण, एखादी खास आठवण किंवा किस्सा सांगायचं झाल्यास, डोंगराच्या कड्यावर घेतल्या गेलेल्या ड्रोन शॉटचा आहे.