आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्कः मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मन फकीरा’ हा चित्रपट व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने म्हणजेच 14 फेब्रुवारी 2020 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मृण्मयी देशपांडे या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून नुकतेच निर्मात्यांनी या सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
पर्पेल बुल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमटेड आणि स्मिता फिल्म प्रॉडक्शन्सच्या यांची प्रस्तुती असलेला ‘मन फकीरा’ या चित्रपटाची निर्मिती एस. एन. प्रॉडक्शन्स आणि स्मिता विनय गानु, नितीन प्रकाश वैद्य, ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार आणि किशोर पटेल यांनी केली असून चित्रपटाची सहनिर्मिती तृप्ती कुलकर्णी आणि प्रणव चतुर्वेदी याची आहे. या सिनेमाच्या मोशन पोस्टरमध्ये अंकित मोहन, सायली संजीव, सुव्रत जोशी, अंजली पाटील हे चार कलाकार दिसत असून हे पोस्टर हा सिनेमा व्हॅलेन्टाईन्स डेच्या दिवशी 14 फेब्रुवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार असे दर्शित करीत आहे. मृण्मयी देशपांडे म्हणते की, ‘मन फकिरा’ हा ट्रेंड सेटिंग चित्रपट असून तो नातेसंबंधांवर भाष्य करतो आणि आजची पिढी ज्या नातेसंबंधांकडे खुल्या नजरेने पाहते त्याच्याबद्दल बोलतो. आजची युवा पिढी विशेषतः लग्न या नात्याकडे फक्त बंधन म्हणून न बघता त्याच्यापलीकडे जगायला शिकली आहे. मला वाटत आजच्या युवा पिढीसाठी लग्नाच्या व्याख्या बदलल्या आहेत ते एक बंधन न राहता त्या आणखीन खुल्या आणि प्रगल्भ झाल्या आहेत. केवळ बंधन न वाटता या माणसाबरोबर आयुष्य काढता येणं शक्य आहे का, हा प्रश्न पहिल्यांदा सोडवून मग या गणितामध्ये उतरण्याचा विचार ही युवा पिढी करते. आणि खऱ्या अर्थाने जोडीदार या शब्दाची व्याख्या किंवा समानार्थी शब्द शोधण्याचा प्रयत्न ते या लग्नामध्ये शोधत असतात मग ते योग्य तो निर्णय घेऊन ही सीमा ओलांडतात. अत्यंत प्रभावी आणि वेगळ्या पठडीतील अशी ही कथा मृण्मयीने स्वतः लिहिली आहे. आपल्याच कथेच्या माध्यमातून ती दिग्दर्शनात पदार्पण करते आहे. तिच्या या पहिल्या चित्रपटाबद्दल बोलताना ती म्हणते, “मला नेहमीच दिग्दर्शक व्हायचे होते. गेली दहा वर्षे माझ्या मनात ही गोष्ट घोळत होती. दिग्दर्शन काही माझ्यासाठी नवीन नाही. कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला असताना मी एक नाटक दिग्दर्शित केले होते. त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे बक्षीस मिळाले होते. तेव्हापासून माझ्या डोक्यात दिग्दर्शनाचे वेड घोळत होते, पण योग्य वेळेची वाट पाहत होते. दिग्दर्शनासाठी एक ठरावीक प्रगल्भता लागते. तुम्ही तुमच्या जीवनप्रवासात शिकत जाता. एकेक प्रसंग हाताळताना त्यातून ही प्रगल्भता येते आणि त्यातून तुम्ही दिग्दर्शनासाठी सज्ज होता. मला त्याबाबत आत्मविश्वास आला आणि दिग्दर्शनाचे हे पाऊल टाकले.” या कथेबद्दल आणि लेखनाबद्दल बोलताना ती म्हणते, “मला नातेसंबंध हा विषय आणि त्यातील गुंता खूपच भावतो. मला माणसे त्यांच्या नजरेतून, त्यांच्या देहबोलीतून पारखता येतात. मानवी नातेसंबंध हे खूप खोलात जाऊन अभ्यास करण्याचा विषय आहे. हे नातेसंबंध नीट आणि सहजपणे मांडता आले तर अधिक रंजक बनतात. हे नातेसंबंध व्यक्त करण्याची संधी या कथेतून साधली आहे. हा माझा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असल्याने माझ्यासाठी खूपच जवळचा आहे. बदलत्या मराठी प्रेक्षकवर्गाला आणि त्यातही युवा पिढीला तो खूप भावेल, याची मला पूर्ण खात्री आहे.”
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.