आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव अभिनेत्री नगमा, अभिनेते राज बब्बर आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहंमद अझरुद्दीन २०१९ ची लोकसभा निवडणूक मुंबईतून लढवण्याची दाट शक्यता आहे. मागच्या वेळी मुंबईच्या सर्व ६ जागा गमावलेल्या मुंबई काँग्रेसला या आयात सेलिब्रिटीकडून तारले जाण्याची आशा निर्माण झाली आहे. मुंबईत लोकसभेच्या एकूण ६ जागा आहेत. त्यातील ३ भाजप व ३ शिवसेनेकडे आहेत. या वेळी मोदी लाट ओसरली आहे. त्यामुळे मुंबईतून लढण्यासाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. त्यातच ३ सेलिब्रिटींची नावे पुढे आली असून मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी त्यास दुजोरा दिला आहे.
उत्तर मध्य मुंबई हा दिवंगत अभिनेते सुनील दत्त घराण्याचा अपारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मागच्या वेळी येथून सुनील दत्त यांची मुलगी प्रिया पराभूत झाल्या होत्या. या वेळी त्या लढण्यास इच्छुक नाहीत. तसेच त्यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठीकडे अनेक तक्रारीही गेलेल्या आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष व उत्तर भारतीय नेते संजय निरुपम, दिवंगत मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद आणि दक्षिण मध्यमधून एका दलित चेहऱ्याला काँग्रेसकडून संधी दिली जाईल. तसेच एक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडलेला आहे. उर्वरित दोन मतदारसंघात मोहंमद अझरुद्दीन, राज बब्बर आणि नगमा यांच्यापैकी दोघांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असे मुंबई काँग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे आहे. यामधून मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतांचा काँग्रेसला लाभ होईल, असे काँग्रेस नेत्यांना वाटते.
नसीम खान, मुणगेकर, दलवाई आदी चर्चेत : २०१९ च्या लोकसभेसाठी मुंबई काँग्रेसकडून इच्छुकांची गर्दी वाढली आहे. त्यामध्ये आमदार व माजी मंत्री नसीम खान, माजी आमदार व शीख नेते चरणसिंह सप्रा, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, माजी खासदार डाॅ. भालचंद्र मुणगेकर, निवृत्त सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे, माजी आमदार बाबा सिद्दिकी, माजी मंत्री व आमदार वर्षा गायकवाड आणि राज्यसभा खासदार हुसेन दलवाई इच्छुकांच्या रांगेत उभे आहेत.
मुंबईत ३ जागा जिंकणार; खासगी सर्व्हेत काँग्रेसचा दावा
मुंबई काँग्रेसने आपल्या सहा लोकसभा मतदारसंघाचे एका त्रयस्थ संस्थेकडून सर्वेक्षण करून घेतले आहे. या वेळी काँग्रेसला मुंबईत किमान तीन जागा नक्की मिळू शकतात, असे तथ्य या अहवालातून समोर आले आहे, असे मुंबई काँग्रेसमधील एका नेत्याने सांगितले. २०१४ लोकसभेला शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होती. सध्या युतीमध्ये मोठा तणाव आहे. युती न करता दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले तर काँग्रेसला मुंबईत नामी संधी असल्याचे मानले जाते. त्यामुळे काँग्रेसमधील इच्छुक भाजप-शिवसेनेची युती न होवो यासाठी देव पाण्यात घालून बसलेले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.