आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा अभिनयाकडे वळली अभिनेत्री श्वेता शिंदे, 'लागीर झालं जी’ आणि ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकांची केली आहे निर्मिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्वेता शिंदे इन्स्टाग्राम फोटो - Divya Marathi
श्वेता शिंदे इन्स्टाग्राम फोटो

एंटरटेन्मेंट डेस्कः ‘अवंतिका’ , ‘अवघाची हा संसार’, ‘वादळवाट’ या गाजलेल्या मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता शिंदे काही वर्षांपूर्वी अभिनयाकडून मालिका निर्मिती क्षेत्राकडे वळली. तिने झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'लागीर झालं जी’ आणि सध्या सुरु असलेली ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकांची यशस्वीरित्या निर्मिती केली. मात्र आता श्वेता आपली अभिनयाची आवड जोपासण्यासाठी लवकरच छोट्या पडद्यावर परतणार आहेत. सध्या ती कोणत्या भूमिकेत दिसणार आहे हे जरी गुलदस्त्यात असले तरी झी युवा वाहिनीवर नवीन येणाऱ्या एका मालिकेत श्वेता झळकणार आहे. विशेष म्हणजे 'जय मल्हार' फेम अभिनेता देवदत्त नागेसुद्धा श्वेतासोबत दिसणार आहे. 
 

  • भूमिकेबद्दल श्वेता म्हणते...

श्वेताला तिच्या भूमिकेबद्दल विचारले असता, ती म्हणाली, "ही भूमिका, एका कॉलेजच्या डीनची आहे, एवढंच मी आत्ता सांगू शकतो. एक वेगळ्या प्रकारची लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'झी'सोबत माझं नातं खूप जुनं आहे. 'अवंतिका', 'वादळवाट', 'अवघाची संसार'सारख्या मालिकांमध्ये मी काम केलेलं आहे. 'लागिरं झालं जी', 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेची निर्मिती सुद्धा मी केलेली आहे. मी 'झी'मध्येच लहानाची मोठी झाले असं म्हणता येईल.  आज बऱ्याच वर्षांनंतर मी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर काम करणार आहे. याची मनात थोडीशी धाकधूक आहेच, पण 'झी'च्याच प्लॅटफॉर्मवरून पुनरागमन करत असल्याने आनंद सुद्धा खूप झालेला आहे. या भूमिकेसाठी माझी तयारी सुरू झालेली आहे. मला वजन कमी करावं लागणार आहे. 2 दिवसांपूर्वीच मी डाएट सुद्धा सुरू केलंय. खूप व्यायामसुद्धा करावा लागणार आहे. व्हॅनिटी व्हॅनवर पुन्हा एकदा नाव बघताना खूपच छान वाटलं. मालिकेचा विषय उत्तम असल्याने काम करायला सुद्धा खूप मजा येईल. प्रेक्षकांना सुद्धा ही मालिका आणि माझी भूमिका खूप आवडेल याची मला खात्री आहे."

  • श्वेताचा अल्पपरिचय...

श्वेता मूळची साताऱ्याची असून महाविद्यालयीन शिक्षणासाठी ती मुंबईत आली. मुंबईमध्ये महाविदयालयात असतानाच तिला अनेक मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या. अतिशय सुंदर चेहरा आणि तिचा स्वतःवरील आत्मविश्वासामुळे, घरच्यांचा संपूर्ण सपोर्ट नसतानाही तिने या ऑफर्स स्वीकारायला सुरुवात केली. त्यानंतर मात्र तिने कधीच मागे वळून पहिले नाही. अनेक उत्तोमत्तम मालिका आणि चित्रपटांमध्ये अतिशय महत्वाच्या भूमिका केल्या आणि त्या महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली. सध्या ती मालिका निर्मितीकडे वळली असल्यामुळे प्रचंड बिझी  होती, त्यामुळे अभिनयासाठी हवा असेलला वेळ तिला मिळत नव्हता. पण आता पुन्हा लवकरच ती आणि 'जय मल्हार' फेम देवदत्त नागे झी युवा वर नवीन येणाऱ्या एका मालिकेत एकत्र काम करताना दिसणार आहेत. सध्या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर  वायरल होत आहे. ज्यात देवदत्त नागे त्याच्या 'जय मल्हार'च्या लूकच्या पूर्णपणे विरुद्ध अशा वेषात दिसत आहे आणि त्याला पोलीस पकडत आहेत तर दुसरीकडे श्वेता त्याच्या गळ्यातील मफलर पकडून एक स्मितहास्य देत आहे. झी युवावर नवीन येणाऱ्या या मालिकेत या दोघांची नक्की काय केमिस्ट्री असणार आहे आणि कोणती भूमिका ते साकारणार आहे याची प्रेक्षकांना आता उत्सुकता लागून लागली आहे.