आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo रिकॉल / सोमी अलीचा झाला होता लैंगिक छळ, आता पीडित महिलांची मदत करणे हाच एकमेव उद्देश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः #Metoo मोहिमेनंतर अनेक अभिनेत्री आणि महिलांनी त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली आहे. पण एक अभिनेत्री अशी आहे, जिचे वयाच्या पाचव्या वर्षी लैंगिक शोषण झाले होते. आम्ही बोलतोय ते सलमान खानची पुर्वश्रमीची प्रेयसी आणि अभिनेत्री सोमी अली हिच्याविषयी. बालपणी झालेल्या शोषणानंतर तिने पीडित महिलांना मदत करणे हा आयुष्याचा उद्देश बनवला आहे. मुळची पाकिस्तानातील सोमी अली आता अमेरिकेत 'नो मोअर टिअर्स' नावाच्या सामाजिक संस्थेसाठी काम करते. ही संस्था पीडित स्त्रियांसाठी काम करते. काही काळ पाकिस्तानात राहिल्यानंतर सोमी तिच्या कुटुंबासोबत फ्लोरिडा (यूएसए) मध्ये स्थायिक झाली. 

 

कौटुंबिक हिंसेच्या वातावरणात वाढली
सोमीने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी पाकिस्तानमध्ये अशा वातावरणात वाढले जिथे महिलांना अतिशय वाईट पद्धतीने वागवले जात होते. माझ्या आईच्या अनेक मैत्रिणींना घरात मारहाण होत होती. जेव्हा मी माझ्या आईला तिच्या मैत्रिणींच्या शरीरावरील व्रणांबद्दल विचारत होते, तेव्हा मला सांगितले जात होते की, ती पायर्‍यांवरुन पडली किंवा स्वंयपाक घरात काम करताना चटका बसला. वास्तव हे होते, की त्यांना घरात मारहाण होत होती आणि त्याहून वाईट गोष्ट म्हणजे ते त्यांच्या सवयीचे झाले होते.

 

नोकराने केले होते शोषण
सोमीने स्वतःवर गुदरलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले. ती म्हणाली, घरात एक नोकर होता, त्याने माझे लैंगिक शोषण केले. तेव्हा मी पाच वर्षांची होते. जेव्हा मला शाळा आणि विद्यापीठांमध्ये बोलण्याची (भाषणाची) संधी मिळाली तेव्हा मी हा प्रसंग विद्यार्थ्यांसोबत शेअर केला. यामुळे इतरांनाही अशा प्रसंगातून जावे लागले असेल तर त्यांना बळ मिळेल, त्यांनी स्वतःला दोष न देता मोकळेपणाने समोर येण्याची प्रेरणा मिळेल, अशी भावना त्या पाठीमागे होती 

 

अनेकांच्या चेह-यावर फुलवले हास्य... 
सोमीने 2007 मध्ये 'नो मोअर टिअर्स' या संस्थेची स्थापना केली. घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडितांच्या मदतीसाठी ही संस्था काम करते. गेल्या 11 वर्षांपासून ही संस्था हजारो महिला, पुरुष आणि मुलांच्या चेह-यावर हास्य फुलवण्याचे काम करतेय.  

 

सलमानसाठी आली होती भारतात... 
सोमी सलमान खानसोबत तब्बल आठ वर्षे रिलेशनशिप होती. त्यानंतर त्यांच्यात ब्रेकअप झाले. त्यानंतर 2000 मध्ये सोमी फ्लोरिडा येथे परतली. सोमीने एका मुलाखतीत सांगतिले होते की, सलमानाचा मैंने प्यार किया हा चित्रपट पाहिल्यानंतर मी वयाच्या सोळाव्या वर्षी भारतात आले होते. ज्या दिवशी मी त्याचा चित्रपट पाहिला त्या रात्रीपासूनच मी त्याच्यासोबत लग्नाचे स्वप्न रंगवत होते. दूसर्‍या दिवशी सकाळी मी उठल्याबरोबर भारतात जाण्याची तयारी करु लागले. कारण मला सलमानसोबत लग्न करायचे होते. हे माझ्या आईला कळाल्यानंतर ती नाराज झाली. मात्र नंतर ती तयार झाली आणि मी भारतात आले. त्यानंतर नंतर जे घडले तो इतिहास आता सर्वांसमोर आहे. सोमी केवळ सलमानची गर्लफ्रेंड नव्हती तर तिने त्याच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

 

सलमानच्या हिंसेची झाली होती शिकार, तरीही केला होता त्याचा बचाव
असे बोलले जाते, की सलमानच्या तापट स्वभावाचा फटका सोमी अलीला बसला होता. मात्र, माध्यमांमध्ये जेव्हा बातम्या आल्या होत्या, की सलमानने सोमीच्या डोक्यात सॉफ्टड्रींकची बॉटल फोडली तेव्हा सोमीने समोर येऊन त्याचा बचाव केला होता. ती म्हणाली होती, जर सलमानने मला मारले असते तर रक्तबंबाळ होऊन मी हॉस्पिटलमध्ये पडलेली असते. मी प्रथमच दारु प्यायले होते. ते त्याला आवडले नाही म्हणून सलमानने कोल्डड्रिंक टेबलवर आडवे केले होते.

 

ऐश्वर्या रायमुळे तुटले नाते... 

सोमीने मुलाखतीत सांगितले होते की, सलमान आणि माझे नाते पुढे जाऊ शकले नाही याचा मला पाश्चाताप नाही. सलमान आणि त्यांच्या फॅमिलीकडून मी खुप काही शिकले. धर्म काय आहे, कल्चर काय आहे, आपण कुठे राहणारे आहेत. हे महत्त्वाचे नसते. आपली ओळख आपल्या कामातून होते. अशी शिकवन मला त्यांच्याकडून मिळाली. सलमान पुढे जाण्यासाठी चांगले रोड मॉडल आहेत. सोमीने म्हटले होते, की माझे आणि सलमानचे एकमेकांवर खूप प्रेम होते. मात्र आमच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात होऊ शकले नाही, कारण आमच्या दोघांत ऐश्वर्या राय आली. त्याकाळात सलमान संजय लीला भन्साळींच्या 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमात ऐश्वर्याबरोबर काम करत होता. या सिनेमादरम्यान सलमानचे सूत ऐश्वर्याबरोबर जुळले. त्यामुळे सलमानने सोमीच्या आयुष्यातून काढता पाय घेतला. सोमीने म्हटले होते की, आता तिच्या मनात कुणाबद्दलही राग नाहीये, कारण ती तिच्या आयुष्यात खूप पुढे गेली आहे. 

 

या चित्रपटांत झळकली सोमी... 
'अंत', 'कृष्ण अवतार', 'यार गद्दार', 'तीसरा कौन?', 'आओ प्यार करें', 'आंदोलन', 'माफिया', 'चुप', 'अग्नि चक्र' या सिनेमांमध्ये सोमीने आपल्या अभिनयाची छाप उमटवली.  

बातम्या आणखी आहेत...