आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमध्ये ७८ हजार अतिरिक्त जवान तैनात, १५ ऑगस्ट रोजी ६,७६८ गावांत तिरंगा फडकवणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडव्हायझरीनंतर पर्यटक परतू लागले. - Divya Marathi
अॅडव्हायझरीनंतर पर्यटक परतू लागले.

श्रीनगर - गुप्त माहितीनंतर केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा व राज्यात असलेल्या पर्यटकांसाठी अॅडव्हायझरी जारी केली. त्यात सरकारने पर्यटकांना तातडीने काश्मीर खोरे सोडण्याची सूचना केली आहे. वास्तविक अमरनाथ यात्रा १५ ऑगस्टपर्यंत चालणार होती. खरे तर खराब हवामानामुळे आधीच यात्रा ४ ऑगस्टपर्यंत स्थगित झाली होती. आता सरकार सुरक्षा व्यवस्थेचा हवाला देत आहे. काश्मीरमधील राजकीय पक्ष त्यावर चिंता व्यक्त करत आहेत. या हालचालींमुळे खोऱ्यातील लोकांच्या मनात दहशत निर्माण होत आहे. एवढेच नव्हे तर खोऱ्यात अफवाही वाढल्या आहेत. राज्यात सुरक्षा दलाच्या संख्येत वाढ होण्यामागे दोन कारणे सांगितली जात आहेत. पहिले- राज्यात विधानसभा निवडणूक, दुसरे- १५ ऑगस्ट रोजी राज्यातील ६ हजार ७६८ गावांत तिरंगा फडकवला जाणार आहे. येत्या मंगळवारी भाजपने जम्मू-काश्मीरच्या टीमसह दिल्लीत बैठक घेतली होती. त्यात निवडणुकीच्या तयारीवर चर्चा झाली आहे. सोबतच १५ ऑगस्ट रोजी खोऱ्यात मोठ्या उत्सवाच्या तयारीवरही चर्चा सुरू झाली होती. 
 
 

शहांचे मिशन काश्मीर
गृह मंत्रालयाची जबाबदारी घेतल्यानंतर अमित शहा यांचा कृतीवर भर आहे. त्यांचे संपूर्ण लक्ष काश्मीरवर आहे. शहा यांनी आपल्या मिशन काश्मीरअंतर्गत विषयपत्रिकेवर ४ मुद्दे निश्चित केले आहेत. 
 
प्लॅन-1 : काश्मीरमधून दहशतवादाचा सफाया
प्लॅन-2 : पंचायतींचा विकास करणे
प्लॅन-3 : भारत-पाक सीमेची सुरक्षा
प्लॅन-4 : जम्मू-काश्मीरमध्ये कलम-३७० व ३५-अ वर कार्यवाही. 
 

४० हजार अतिरिक्त जवान आधीच अमरनाथ यात्रेत तैनात 
अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा विचार करून खोऱ्यात ४० हजार निमलष्करी दल आधीपासूनच तैनात आहे. सरकारने आणखी १० हजार जवान रवाना केले. त्याशिवाय अतिरिक्त २८ हजार जवान पाठवले जाणार आहेत. खोऱ्यात सामान्यपणे जितके सुरक्षा जवान तैनात राहतात, त्यापेक्षा जास्त सुरक्षा जवान सध्या राज्यात तैनात आहेत. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये ७ लाख जवान तैनात असल्याचा दावा मानवी हक्क संघटनांनी केला आहे. यात सीमेवर तैनात सैनिकांचाही समावेश आहे. खोऱ्यात प्रत्येकी १५ ते २५ व्यक्तींमागे एक जवान तैनात आहे. या सुरक्षा दलात लष्कर, सीआरपीएफ, बीएसएफ, एसएसबी व आयटीबीपीच्या जवानांचा समावेश आहे. 
 

मार्चपासून जूनदरम्यान ५० तरुण हिंसाचाराच्या मार्गावर गेले
गेल्या एका दशकातील २०१८ हे वर्ष खोऱ्यातील सर्वाधिक हिंसक वर्ष होते. यंदा सरकारच्या विरोधात सर्वाधिक २०१ स्थानिक तरुणांनी हिंसक मार्ग निवडला. २०१७ मध्ये १३५ असे तरुण होते. मार्च ते जून २०१९ पर्यंत खोऱ्यात ५० तरुणांनी दहशतवादाचा मार्ग निवडला होता, असे सुरक्षा दलाचे म्हणणे. 
 

६ वर्षांत ९६३ दहशतवाद्यांचा खात्मा, १२६ दहशतवादी ठार 
२०१९ पूूर्वी सहा महिने काश्मिरात १२६ दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. २०१७ मध्ये २०६, २०१८ मध्ये २४६ दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी अलीकडेच संसदेत याबद्दल माहिती दिली होती. त्यानुसार २०१४ ते २०१९ या काळात ९६३ दहशतवाद्यांचा खात्मा. 

असे तर २००० व २०१७ मध्येही घडले नव्हते, ही धोक्याची चिन्हे
काश्मीरमधील वेगवान घडामोडींचा अर्थ लावणे नक्कीच सोपे राहिलेले नाही. गेल्या चार-पाच दिवसांपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषा व काश्मीर सेक्टर्समध्ये गोळीबार, मॉर्टरचा वापर केला जात आहे. पोलिसांची काही कागदपत्रे लीक झाली आहेत. त्यात चार महिने पुरेल एवढे रेशनपाणी साठवण्याची सूचना करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रा रोखण्यात आली आहे. भाविकांनी जास्त दिवस मुक्कामी राहू नये, असे बजावण्यात आले आहे. अशा प्रकारच्या घडामोडी २००० व २०१७ मध्येदेखील झाल्या नव्हत्या. तेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. मग काश्मीरमध्ये काही मोठे घडू पाहत आहे का ? म्हणूनच त्यास सरकार गोपनीय ठेवू इच्छिते. तसेही १५ ऑगस्टचा कालावधी संवेदनशील मानला जातो. सरकारने पुढील विचार करून तसा निर्णय घेतला असावा. गोपनीय माहितीच्या आधारे पाकिस्तान मोठे षड‌॰यंत्र करत आहे, याचेही कदाचित हे संकेत असावेत. सध्या सापडलेल्या आयईडी व शस्त्रांवरून तरी मोठा धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु दहशतवाद्यांकडील मोठ्या शस्त्रसाठ्यातील हा केवळ काही भाग असावा. अफवांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाने पत्रकार परिषद घेतली, हे मात्र बरे झाले. 
- भास्कर एक्स्पर्ट : -ले.जन.(निवृत्त) सय्यद अता हसनैन 
 

खोऱ्यात एक महिन्यांतील घडामोडी
> 26 जून: गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच श्रीनगरला दाखल, राज्यपालांच्या भेटीनंतर सुरक्षेचा आढावा. 
 
> 24 जुलै : एनएसए अजित डोभाल गुप्त मोहिमेवर श्रीनगरला. डोभाल यांनी सैन्य व गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. 
 
> 27 जुलै: गृह मंत्रालयाने १० हजार अतिरिक्त जवान खोऱ्यात रवाना करण्याचा निर्णय घेतला, माजी मुख्यमंत्री मेहबूबांनी विरोध केला. 
 
> ​​31 जुलै : लष्कर प्रमुख बिपीन रावत दोन दिवसांच्या दौऱ्यावर श्रीनगरला रवाना. उत्तर काश्मीरचा दौरा, एलआेसीच्या परिस्थितीचा आढावा. 
 
> 1 ऑगस्ट : माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांनी मुलगा उमरसह मोदींची भेट घेतली. केंद्राने आणखी २८ हजार जवान पाठवण्याचे जाहीर केले. 
 
> 2 ऑगस्ट : सैन्य, हवाई दलास सतर्कतेचा इशारा. अॅडव्हायझरीनुसार अमरनाथ यात्रेकरू व पर्यटक लवकरात लवकर माघारी परतले.