नवी दिल्ली / अधीर रंजन चौधरींची पीएम मोदींवर वादग्रस्त टिप्पणी, माफी मागितली; संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर चर्चा

जम्मू-काश्मीर, आधार आणि विशेष आर्थिक झोन विधेयकही सादर

दिव्य मराठी नेटवर्क

Jun 25,2019 10:44:00 AM IST

नवी दिल्ली - लोकसभेत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वादग्रस्त टिप्पणी केली. त्यामुळे गदारोळ झाला. भाजप खासदार आणि मंत्री प्रतापचंद्र सारंगी यांनी म्हटले होते की, अटलजींनी इंदिरा गांधींची स्तुती केली होती,तर काँग्रेसला मोदींची काय अडचण आहे? त्याच्या उत्तरात चौधरी यांनी वादग्रस्त टिप्पणी केली. मात्र प्रचंड गदारोळानंतर टिप्पणी कामकाजातून हटवण्यात आली. नंतर चौधरी म्हणाले की, जर पीएम मोदी यामुळे नाराज असतील तर मी माफी मागतो. सभापतिपदी बसलेले राजेंद्र अग्रवाल म्हणाले की, जर आक्षेपार्ह टिप्पणी असेल तर ती काढून टाकली जाईल.


अभिनंदनच्या मिशीला राष्ट्रीय दर्जा द्यावा : सभागृहात बालाकोट एअर स्ट्राइकची चौधरींनी स्तुती केली. त्यांनी विंग कमांडर अभिनंदन यांची स्तुती करून म्हटले की, शौर्यासाठी त्यांना शौर्य पुरस्कार मिळायला हवा. त्याचबरोबर अभिनंदन यांच्या मिशीला राष्ट्रीय दर्जा मिळावा, असेही चौधरी म्हणाले. त्याआधी गृहमंत्री अमित शहा यांच्यातर्फे राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक सादर केले. तसेच आधार दुरुस्ती आणि विशेष आर्थिक झोन विधेयकही सभागृहात मांडण्यात आले.

सारंगींचे पाच भाषांत सव्वा तास भाषण, विरोधकांवर हल्ला
केंद्रीय मंत्री प्रतापचंद्र सारंगींनी सुमारे सव्वा तास अनुभ‌वी नेत्याप्रमाणे अस्खलित हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उडिया आणि बांगला भाषेत विरोधकांवर हल्ला केला. ते म्हणाले की, विरोधकांना मोदींबद्दल एवढी असहिष्णुता का आहे? १९७१ च्या युद्धानंतर अटलजींनी इंदिरा गांधींना दुर्गा म्हटले होते. पण आज काँग्रेस व विरोधी पक्षाला मोदींची स्तुती करण्यास कोणती अडचण आहे?

‘न्यू इंडिया’ नको, आम्हाला जुना भारत परत हवा : आझाद राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी ‘न्यू इंडिया’वर टीका केली. ते म्हणाले की, लोकांना चांगले राहता यावे यासाठी आम्हाला जुना भारतच हवा. सगळीकडे लिंचिंग होत आहे. लोकांत द्वेष आहे. बापूंच्या खुन्याचे समर्थक सत्ताधारी पक्षात खासदार आहेत. झारखंडच्या मॉब लिंचिंगचा उल्लेख करून ते म्हणाले की, हे थांबू शकत नाही. सर्वांचा विश्वास दिसत नाही.

विदेशात भारतीयांचा ३४ लाख कोटी काळा पैसा जमा झाल्याचा अंदाज : अहवाल
भारतीयांनी १९८० पासून २०१० दरम्यान १७ लाख कोटी ते ३४ लाख कोटी रु. पर्यंत काळा पैसा बाहेर पाठवला. एनआयपीएफपी, एनसीएआआर आणि एनआयएफएमने एका अभ्यासात ही माहिती दिली. लोकसभेत सादर अर्थ मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या अहवालानुसार रिअल इस्टेट, खाण, पानमसाला, गुटखा, तंबाखू, बुलियन,कमोडिटी, चित्रपट आणि शिक्षणात सर्वात जास्त काळा पैसा असल्याची माहिती मिळाली आहे.

शिक्षण धोरणावर वेगळी चर्चा करू : सभापती ओम बिर्ला
नव्या शैक्षणिक धोरणावर मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक हे डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते, तेव्हा विरोधी खासदारांनी गदारोळ सुरू केला. गदारोळ वाढत असल्याचे पाहून लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी खासदारांना सल्ला दिला की, तुम्ही लेखी नोटीस द्या, त्यावर वेगळी अर्ध्या तासाची चर्चा करण्याची परवानगी मी देईन.

X
COMMENT