आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जरा वेळ लागेल, पण आम्हीही येतोय ऑनलाइन!!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अदिती अत्रे  

‘नेटवर्क क्रांती’ फक्त मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या गावांनाच अनुभवता आली आहे. कारण दाट जंगलातल्या किंवा डोंगराळ भागातल्या गावांमध्ये मात्र अजूनही इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली नाही. त्यामुळे स्मार्टफोनचा वापर तर तशी दूरची गोष्ट आणि तिथल्या महिलांच्या हातात स्मार्टफोन ही त्याहून दूरची.
आज शहरातला एक मोठा गट फोनशिवाय म्हणजे स्मार्टफोनशिवाय स्वतःच्या आयुष्याचा विचार तरी करू शकतो का? सकाळच्या अलार्मपासून ते अगदी दिवसातून किती ग्लास पाणी प्यावं इथपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आपण सारेच या स्मार्ट तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत. व्हॉट्सअप वरून येणारा कोणताही मजकूर आपल्याही नकळत आपल्या दररोज वाचनात येतो. पण, आजही आदिवासी भागात अशा स्त्रिया आहेत ज्यांच्या हातात साधा फोनही नाही... स्मार्ट फोन तर दूरची गोष्ट. आदिवासी आणि त्यातही स्त्रिया म्हणजे समाजाच्या तथाकथित उतरंडीनुसार सर्वात वंचित घटक. आज शहरात घरातल्या प्रत्येकाच्या हातात असलेला स्मार्टफोन अनेक आदिवासी महिलांपर्यंत पोहोचलादेखील नाहीये. मी वर्षभरापूर्वी गडचिरोलीत असताना आम्ही ‘मुक्तिपथ’च्या माध्यमातून गावांमध्ये दारूबंदीचं काम करत होतो. गावांमधल्या महिलांना लिहिता-वाचता येत नसल्यानं आणि त्यांच्यापर्यंत कोणत्याच प्रकारचं तंत्रज्ञान फारसं पोहोचलेलं नसल्यामुळे प्रत्यक्ष गावात जाऊन या महिलांशी बोलण्याशिवाय पर्याय नव्हता..आदिवासी गावातल्या कॉलेजला जाणाऱ्या मुली, कमावणाऱ्या महिलांकडे मात्र आता स्मार्टफोन आले आहेत. म्हणजे एखादी शिक्षिका, पोलिस पाटील, आशा, अंगणवाडी सेविका. गडचिरोलीच्या अनेक आदिवासी गावांमध्ये अगदी गेल्या वर्षभरापर्यंत नेटवर्कचा प्रश्न होता, हेही तिथल्या अनेक जणांकडे स्मार्टफोन नसण्याचं प्रमुख कारण होतं. गडचिरोली जिल्ह्यातल्या १२ पैकी ५ तालुक्यांत आजही नेटवर्क फारसं पोहोचलेलं नाहीये. काही गावांमध्ये तर कॉलसाठीच कसंबसं नेटवर्क यायचं. अगदी गेल्या वर्षीपर्यंत बीएसएनएल सोडून इतर कोणतंच नेटवर्क गडचिरोलीच्या अनेक गावांत पोहोचायचं नाही... पण आता सध्या जिओच्या टॉवर्समुळे गावात इंटरनेटलाही चांगलं नेटवर्क मिळायला लागलंय. पण ही ‘नेटवर्क क्रांती’ फक्त मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या गावांनाच अनुभवता आली आहे. कारण दाट जंगलातल्या किंवा डोंगराळ भागातल्या गावांमध्ये मात्र अजूनही इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली नाही. त्यामुळे स्मार्टफोनचा वापर तर तशी दूरची गोष्ट आणि तिथल्या महिलांच्या हातात स्मार्टफोन ही त्याहून दूरची. तरी, या सगळ्या परिस्थितीतही अनेक आशेचे किरण आहेत. सध्या आदिवासी भागातल्या आश्रमशाळेत शिकायला गेलेल्या मुली, शहरात शिक्षणासाठी गेलेल्या अगदी तुमच्या-आमच्यासारखाच मोबाइल वापरतात. त्यामुळे आदिवासी महिला तांत्रिक मुख्य प्रवाहात येण्याची सुरुवात तर नक्कीच झालीये, दिवसेंदिवस ही तांत्रिक दरी कमी होऊन सर्वांना समान संधी मिळेल आणि सर्व महिला प्रगतीची यशोशिखरं गाठतील हीच आशा! 

संपर्क- ९४०३६४८४९९

बातम्या आणखी आहेत...