आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस बंडखोरांमुळे वाढली अदिती तटकरेंची डाेकेदुखी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड : काेकणातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अदिती सुनील तटकरे यांच्या विरोधात काँग्रेसच्या तीन बंडखोर उमेदवारांनी अर्ज कायम ठेवल्याने तटकरेंची डाेकेदुखी वाढली आहे. शिवसेनेचे उपनेते तथा म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्यासाेबतच आघाडीतील या बंडखाेरांचे आव्हान पेलण्यासाठी ताकद पणाला लावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.


बालेकिल्ला असतानाही काही वर्षांपासून श्रीवर्धनमध्ये तटकरेंची ताकद कमी हाेऊ लागली आहे. २०१४ च्या निवडणुकीत त्यांचे पुतणे अवधूत यांचा केवळ ७७ मतांनी निसटता विजय झाला हाेता. शिवसेनेचे रवी मुंढे यांना त्यांना तगडी फाइट दिली हाेती. नुकत्याच झालेल्या लाेकसभेत मात्र सुनील तटकरे यांनी पुन्हा भरारी घेत रायगड हा मतदारसंघ अनेक वर्षांनंतर शिवसेनेकडून खेचून आणला. सेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गितेंचा त्यांनी पराभव केला. श्रीवर्धनमधून तटकरेंना ३० हजारांचे मताधिक्य मिळाले. मात्र तटकरेंना पुन्हा धक्के बसले. पुतण्या अनिकेत व त्यांंचे कुटुंब शिवसेनेत गेले. आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनेही साथ साेडली. या पक्षातील ज्ञानदेव पवार, डॉ. मोईज शेख आणि दानिश लांबे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास नकार दिला. त्यामुळे आता विधानसभेला मुलगी अदितीला निवडून आणण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.

बंधू अनिल तटकरेंसह पुतण्या अनिकेतच्या प्रवेशाने शिवसेनेला बळ
राज्यात सर्वत्र विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. उमेदवार अनेक मार्गांनी मतदारांशी 'कनेक्ट' करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोकणातील रोहा शहरात धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले तटकरे कुटुंब.

घराणेशाहीमुळे राष्ट्रवादीतही नाराजी
खरे तर शिवसेनेत प्रवेश करते झालेले अवधूत यांनाच उमेदवारी मिळेल, असे सांगितले जात हाेते. मात्र शिवनेनेने ऐनवेळी अदितीविराेधात उपनेते विनाेद घाेसाळकर यांना मैदानात उतरवले. त्यामुळे बहीण-भावाची लढाई टळली. घोसाळकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सुनील तटकरेंवरील भ्रष्टाचाराच्या आराेपांचा पाढा ते मतदारंसमाेर वाचत आहेत. दुसरीकडे जुन्या शिवसैनिकांची माेट बांधण्याचेही काम त्यांनी सुरू केले आहे. अदिती यांचा जनसंपर्क चांगला आहे. परंतु सतत एकाच घराण्याकडे आमदारकी असल्याने घराणेशाहीबद्दल राष्ट्रवादीतही दबक्या आवाजात नाराजी आहे. अशा नाराज कार्यकर्त्यांची माेट बांधून जागा राखण्याचे तटकरेंसमाेर आव्हान आहे.

बातम्या आणखी आहेत...