विधानसभा 2019 / आदित्य ठाकरेंचंही ठरलं, वरळीतून लढणार; जागा सोडणाऱ्या सुनील शिंदेंना योग्य स्थान देणार

आमदार सुनील शिंदे आदित्य ठाकरेंसाठी जागा साेडणार

दिव्य मराठी

Sep 25,2019 08:27:00 AM IST

मुंबई - युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अखेर वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे सुनील शिंदे हे आमदार आहेत. ते आदित्य यांच्यासाठी जागा साेडणार आहेत. त्यांना पक्षात योग्य ते स्थान देण्यात येणार आहे. तसेच या भागातील वजनदार नेते सचिन अहिर हे नुकतेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेे आहेत. त्यामुळे आदित्य यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे मानले जाते. अहिर हेही आमदारकीसाठी इच्छुक हाेते. मात्र त्यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्याचा शब्द शिवसेनेकडून देण्यात आल्याची माहिती आहे.


शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळी मतदारसंघातून शिवसेना नेते दत्ताजी नलावडे यांनी सातत्याने चार वेळा विजय मिळवला होता. मात्र २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांनी ५२ हजार ३९८ मते मिळवत शिवसेनेच्या आशिष चेंबूरकर यांना पराभूत केले होते. अंडरवर्ल्ड डॉन आणि माजी आमदार अरुण गवळी यांचे भाचे असलेल्या सचिन अहिर यांना या नात्याचा खूप फायदा झाला होता. त्यातच मनसे उमेदवार संजय जामदार यांनी ३२ हजार मते घेतल्याने सचिन अहिर यांचा विजय आणखी सोपा झाला होता. मात्र २०१४ मध्ये शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी अहिर यांच्यापेक्षा दुपटीने मते घेत त्यांचा पराभव केला. शिवसेनेची वाढलेली मते, युती आणि सचिन अहिर यांचा शिवसेनाप्रवेश असा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने आदित्य यांचा मार्ग साेपा झाल्याचे मानले जाते.

X
COMMENT