ज्याचे विचार-पाठिंबा दरवर्षी बदलतात, अशांसोबतच युतीचा विचारही नाही; युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

दिव्य मराठी

Apr 26,2019 10:37:00 AM IST

पुणे - महाआघाडीच्या बळावर विजय मिळत असेल तर इतरांबरोबर युतीची गरज नाही. मात्र, ती त्याच्याबरोबर करू शकतो, ज्याचे विचार, पाठिंबा प्रत्येक वर्षी बदलत नाही, अशा शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांचे काका आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना युवा पिढीच्या मनातील भावना, समस्या समजावून घेण्यासाठी आदित्य ठाकरे हे राज्यभरात “अादित्य संवाद’ उपक्रमांतर्गत तरुणांशी संवाद साधत आहेत. गुरुवारी मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरीमध्ये त्यांचा हा कार्यक्रम झाला. या वेळी तरुणाईने विचारलेल्या विविध प्रश्नांवर त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

> राखी मल्ल्या : महिला सुरक्षेबाबत काय उपाययाेजना करता येतील? निवडणुकीत देश सुरक्षेसंर्दभात काय?
आदित्य : विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी युवासेनाने पुढाकार घेतला. निर्भया प्रकरणानंतर अक्षय कुमारसाेबत मिळून अंधेरीत सेल्फ डिफेन्स अकॅडमीची सुरुवात केली. कुठेही वावरताना मुली, तरुणांना सुरक्षिततेची भावना महत्त्वाची असून ताे त्यांचा हक्क आहे. मुलींसाेबत कसे वागावे हे मुलांनाही शाळेपासूनच शिकवण्याची गरज आहे. पंतप्रधान माेदींनी ५ वर्षे चांगले काम करत पाकिस्तानलाही वेळोवेळी धडा शिकवला. पूर्वीचे सरकार शत्रूकडून हल्ला झाल्यावर केवळ निषेध व्यक्त करत किंवा संयुक्त राष्ट्रसंघाकडे तक्रार घेऊन जात हाेते.

> नीलेश पिंगळे : पार्थ पवार यांच्याबद्दल तुमचे मत काय?
आदित्य : मागील ९ ते १० वर्षांपासून मी राजकारणात आहे. काम कसे करायचे हे लोकांकडून शिकायचे होते म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहे. निवडणूक लढण्यापेक्षा हे प्रश्न मला अधिक महत्त्वाचे वाटतात. राष्ट्रवादीचे उमेदवार नक्की कोणत्या हेतूने आले हे मला माहीत नाही. कुठे स्टाइल न मारता लोकसेवा करणे याची शिकवण मला देण्यात आलेली आहे. मात्र, एक सांगतो, गेल्या १५ वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादीने विकासाची कामे केली असती तर जनतेने शिवसेना-भाजप युतीला संधीच दिली नसती.


> श्याम सुतार : लोणावळ्यात नाइट लाइफ संस्कृती शक्य आहे का?
आदित्य : मुंबईप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात नाइट लाइफ सुरू करावी लागणार, असे राज्यभर फिरताना दिसून येत आहे. दिवसभर काम संपवून रात्री भूक लागल्यानंतर मित्रांसाेबत बसण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध असण्याच्या दृष्टीने नाइट लाइफ महत्त्वपूर्ण ठरते. त्यामधून रोजगारनिर्मिती तर हाेतेच, पण शासनाला महसूलही मिळताे. स्टारबक्स, बरिस्ता अशा प्रकारचे चाटेल रात्रभर सुरू राहिले तर पालिकेच्या उत्पन्नात भर पडेल अणि शहरेही सुरक्षित राहू शकतील. कोणत्याही प्रकारचे पब, बार रात्री उघडे ठेवावेत, असे माझे म्हणणे नाही.


> सूरज म्हसले -आगामी का‌‌‌ळात तुम्ही निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती करणार का?
आदित्य : महाआघाडीच्या बळावर विजय मिळत असेल तर इतरांबरोबर युतीची काय गरज आहे. ‘युती त्याच्याबरोबर करू शकतो, ज्याचे विचार, पाठिंबा प्रत्येक वर्षी बदलत नाही.’ सेना-भाजपची युती ही गेल्या ३० वर्षांपासून हिंदुत्व अणि देशहित डाेळयासमाेर ठेवून असून कोणी कितीही प्रयत्न केले तरी आमच्यात फूट पडणार नाही.

> सुधीर काये : तुम्ही राजकारणी नसता तर कोणते करिअर निवडले असते?
आदित्य : मला राजकारणासाेबत फाेटाेग्राफी आणि क्रिकेटची आवड आहे. कधी कधी कवितांचेही लिखाण करताे. पण राजकारणात नसताे तर नेमके काय केले असते याबाबत काही सांगू शकत नाही. राजकारणात करिअर करण्याचे मला मानसिक समाधान मिळत असून एखाद्या रस्त्याचे काम मार्गी लावणे, शाळा-माहविद्यालय प्रवेश करणे, शैक्षणिक समस्यांची साेडवणूक करणे, रक्तदान शिबिर ही कामे मनाला आनंद देणारी वाटत आहेत.

X