आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंनी वरळीतून दाखल केला उमेदवारी अर्ज; उद्धव ठाकरेंनी मानले राज यांचे अप्रत्यक्ष आभार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे ठाकरे कुटुंबियांतील पहिले सदस्य आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी भव्य अशा रोड शोच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज वरळी मतदारसंघातून दाखल केला. त्यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रूममध्ये जाऊन त्यांच्या फाेटाेसमाेर नतमस्तक हाेत आशीर्वाद घेतला. आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज सादर करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि भाऊ तेजसही उपस्थित होता.

अर्ज भरण्याआधी सकाळी साडे दहा वाजता आदित्य ठाकरे यांनी रोड शोला सुरुवात केली. वरळीत शिवसैनिक सकाळपासूनच आदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झाले होते. भव्य रोड शो केल्यानंतर वरळी येथील आयोगाच्या निवडणूक कार्यालयात आदित्य ठाकरे पोहोचले आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी म्हटले, ‘आजचा दिवस खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. काम करण्याची एक्साईटमेंट आहे. आशीर्वाद देण्यासाठी सर्वजण आले आहेत. आजोबा बाळासाहेबांचे दर्शन घेऊन अालाे. मी केवळ वरळी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करणार असून शिवसैनिकांचे, जनतेचे आशीर्वाद माझ्यासोबत असल्याने  मी जिंकणार असा विश्वास आहे. लाेकांच्या अपेक्षा पूर्ण करू. लवकरच शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल,’ असा दावाही आदित्य यांनी केला.​​​​​​​
 

मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
आदित्य म्हणाले, ‘फॉर्म भरल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना फोन करणार होतो, परंतु त्यांचाच सकाळी फोन आला आणि त्यांनी मला शुभेच्छा दिल्या.’ वडिलांनी ‘काय शुभेच्छा दिल्या?’ असा प्रश्न विचारला असता ‘चांगले काम कर,’ असे त्यांनी सांगितल्याचे आदित्य म्हणाले. उद्धव ठाकरे यांनीही आदित्यला पाठिंबा देणाऱ्या, स्वीकारणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
 

शेलार, खान यांचेही अर्ज
काँग्रेसचे नसीम खान यांनी चांदीवली मतदारसंघातून शक्तीप्रदर्शन करून अर्ज दाखल केला. शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनीही वांद्रे येथील जरीमरी मंदिर, महिम दर्गा, गुरुद्वारा व माऊंट मेरीचे सपत्निक दर्शन घेऊन विजय संकल्प रॅली काढून अर्ज दाखल केला. यावेळी अल्पसंख्याक समाजासोबतच अन्य समाजातील जनसमुदायाही उपस्थित होता.

बातम्या आणखी आहेत...