आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री रुग्णालयात पदे भरू, जिल्हा रुग्णालय 500 खाटांचे करू, तेही याच सरकारकडून 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा स्त्री रुग्णालयाचे लोकार्पण करताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, ए.जे. बाेराडे, अभिमन्यू खोतकर अादी.  - Divya Marathi
जिल्हा स्त्री रुग्णालयाचे लोकार्पण करताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, ए.जे. बाेराडे, अभिमन्यू खोतकर अादी. 

जालना - जिल्हा स्त्री रुग्णालयात डॉक्टर, परिचारकांसोबत बोलताना एक मागणी आली की येथे स्टाफची कमतरता आहे, ती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून पूर्ण करू. तसेच येथील जिल्हा रुग्णालय ५०० खाटांचे करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू आणि तेही याच सरकारच्या कालावधीत करू, असे आश्वासन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले. रविवारी गांधी चमन येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला, या वेळी ते बोलत होते. 

 

या वेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे, जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आ. शिवाजीराव चोथे, संतोष सांबरे, भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, सविता किवंडे, अॅड. भास्कर मगरे, पंडित भुतेकर, संतोष मोहिते, विष्णू पाचफुले, भाऊसाहेब घुगे, भानुदास घुगे, अभिमन्यू खोतकर, माजी जि. प. सभापती रमेश गव्हाड, मनीष श्रीवास्तव, नगरसेविका संध्या देठे डाॅ. एम. के. राठाेड, डाॅ. अार. एस. पाटील आदींची उपस्थिती होती. 

 

ठाकरे म्हणाले, हॉस्पिटलमध्ये जाणे कमीत-कमी कसे होऊ शकेल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. मिड-डे मिल योजनेंतर्गत मुलांना जेवण कसे देतो, हे बघितले पाहिजे. स्वच्छतागृह विशेषत: महिला स्वच्छतागृहाच्या ठिकाणी सॅनिटरी व्हेंडिंग मशीन आहे का, हेदेखील बघणे गरजेचे आहे. अर्थात प्रतिबंधात्मक आरोग्य म्हणजे स्वत: आपण चांगले राहिलो, स्वस्थ राहिलो तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये येण्याची गरज लागणार नाही, याची काळजी आपण घेणे आवश्यक आहे. 

 

खोतकरांकडून दानवेंचा गौरव : राज्यातील युवकांचे नेते आदित्य ठाकरे, भाजपचे प्रमुख नेते व लाडके खासदार रावसाहेब पाटील दानवे असा गौरवपूर्ण उल्लेख करत राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. खोतकर म्हणाले, जिल्हा रुग्णालयाच्या निर्मितीनंतर हे रुग्णालय बंद होणार होते. मात्र यासाठी मी स्वत: प्रयत्न करून ४५ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून खेचून आणला. आज सर्वांच्या सहकार्याने हे रुग्णालय उभे राहिले, याचा आनंद होत असल्याचे मंत्री खोतकरांनी सांगितले. 

 

खा. दानवे म्हणाले, राज्यात जिल्हा रुग्णालये बांधल्यानंतर जुनी रुग्णालये बंद करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, महिलांसाठी हे रुग्णालय बांधण्यात आले, याचा अभिमान वाटतो. माणसाचा एकूण उत्पन्नाच्या ३० टक्के खर्च आरोग्यावर खर्च होतो. ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ५ लाखांपर्यंतचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. तसेच बायपास शस्त्रक्रियेसाठी अगोदर दीड-दोन लाख रुपये लागत. आता केवळ २८ हजार रुपयांत ही शस्त्रक्रिया होत आहे, यासारखे अनेक निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचे ते म्हणाले. 

 

जालना जिल्ह्यात बाइक अॅम्ब्युलन्स सुरू व्हावी 
जिल्हा नियाेजन समितीकडे एकत्रित मागणी करून स्त्री रुग्णालयाची इमारत बांधून घेतली आहे. आजकालचा जमाना होम डिलिव्हरीचा आहे. १०८ अॅम्ब्युलन्स गावा-गावापर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे दीपक सावंत यांनी सुरू केलेल्या बाइक अॅम्ब्युलन्स जालन्यात सुरू करणे गरजेचे आहे. मेळघाटप्रमाणे अॅम्ब्युलन्स सेवा गावात पोहोचली पाहिजे, अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली. 

 

महाराष्ट्र घडवतील एवढेच वचन देतो 
सगळ्या नवीन गोष्टी करायला आपले पाठबळ, आपले आशीर्वाद गरजेचे असतात. पाठबळ आणि आशीर्वाद हे प्रेसवाल्यांनी मत म्हणून घेऊ नये. आता, प्रचारासाठी आम्ही एकत्र येऊ. वेगळे येऊ हे काही बोलू शकत नाही. पण एवढे खरे आहे की, निवडणुकीत काही झाले तरी सगळे पक्ष हे एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी काम करतील आणि महाराष्ट्र घडवतील एवढेच वचन देत असल्याचेही ठाकरे यांनी सांगत युतीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला. 

अर्जुन खोतकरांनी श्रेय लाटू नये 
जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या इमारतीचे साठ टक्के काम आपल्या आमदारकीच्या कार्यकाळातच पूर्ण झाले होते. या इमारतीचे उदघाटन करून शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर हे केवळ श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. 

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना आपण जालना येथे जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या जीर्ण इमारतीचा मुद्दा तत्कालीन आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्याकडे उपस्थित करून जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाने भरीव आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे देखील आपण सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री चव्हाण व आरोग्य मंत्री शेट्टी यांनी अर्थसंकल्पात जालना येथे महिला व बाल रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद ठेवली होती. त्यानंतर आपण आमदार असतानाच आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात येऊन साठ टक्के काम देखील पूर्ण झाले होते. मात्र, राज्यमंत्री खोतकर यांनी या इमारतीचे उदघाटन घाई-गडबडीत आटोपून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...