Home | Maharashtra | Mumbai | Aditya Thackeray insist for Internal points and separate batch eleventh

अंतर्गत गुण, अकरावीच्या स्वतंत्र तुकडीसाठी आदित्य ठाकरे आग्रही, राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सेनेचा पुढाकार

विशेष प्रतिनिधी, | Update - Jun 14, 2019, 09:50 AM IST

पीक विमा व रोहयोबाबतही देवंेद्र फडणवीसांकडे तक्रारी

 • Aditya Thackeray insist for
Internal points and separate batch eleventh
  शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस गुरुवारी मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत केक कापून साजरा करण्यात आला.

  मुंबई - ‘केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धेत टिकण्यासाठी राज्य मंडळाच्या दहावीतील विद्यार्थ्यांना अंतिम निकालात पूर्वीप्रमाणेच अंतर्गत गुण ग्राह्य धरण्यात यावेत. तसेच, अकरावी प्रवेशावेळी या वर्षीपुरती राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र तुकडी करावी,’ अशी मागणी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. मुख्यमंत्र्यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा त्यांनी केला.


  राज्य मंडळाच्या बोर्डाने यंदापासून बदललेल्या गुणांकन पद्धतीमुळे उडालेला गोंधळ व महाराष्ट्रातील दुष्काळी
  परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आदित्य यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीतील चर्चेची माहिती त्यांनी गुरुवारी ‘मातोश्री’ या आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.


  ‘दहावीच्या परीक्षेचे गुणांकन करताना विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षेचे व अन्य गुण यंदा ग्राह्य धरण्यात आले नाहीत. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना यंदा कमी गुण मिळाले आहेत. अकरावी प्रवेशासाठी त्यांना सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागते आहे. या बाेर्डाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण दिले जात असल्यामुळे त्यांची टक्केवारी जास्तच आहे. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची वाट बिकट बनली आहे. या प्रश्नाकडे आपण मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले,’ असे आदित्य म्हणाले.
  ‘राज्यात मोठा दुष्काळ आहे, त्यातच पीक विमा योजनेत अनेक गडबडी झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त असून विमा योजनेत सुधारणा कराव्यात तसेच रोहयोची कामे पुरेशी मिळत नसल्याची बाब आपण मुख्यमंत्र्यांच्या कानी घातली. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी लक्ष घालण्याचे मान्य केले आहे’, असे आदित्य याने सांगितले.


  निवडणुकीबाबत माैन : ‘तुम्ही कोणत्या मतदारसंघातून उभे राहणार, मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का’, असे प्रश्न विचारून पत्रकारांनी आदित्यला भंडावून सोडले. मात्र, ‘अकरावी प्रवेशाचा प्रश्न आणि दुष्काळ असे दोन प्रश्न माझ्यासाठी आज महत्त्वाचे आहेत’, असे स्पष्ट करत आदित्यने त्या सर्व प्रश्नांना उत्तर देणे टाळले.


  आदित्यने जोडले हात : आदित्य अन् अभिनेत्री दिशा पाटणी यांची मैत्री मुंबईत चर्चेचा विषय आहे. योगायोगाने गुरुवारी आदित्यचा वाढदिवस होता. या दिवशी ‘खास व्यक्ती’कडून तुम्हाला खास गिफ्ट मिळाले का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर आदित्यने चक्क हात जोडून नमस्कार केला.


Trending