आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरे यांची मीडिया सेलवर बारीक नजर, तेच ठरवतात रणनीती; दिवसभरात १५ ते २० पोस्टमधून प्रचाराचा धुरळा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश जोशी 

मुंबई - आक्रमकता ही शिवसेनेची ओळख आहे. तीच शिवसेनेच्या आयटी आणि सोशल मीडिया सेलअंतर्गत वॉर रूमच्या कामात झळकते. प्रतिस्पर्ध्याच्या पाेस्टवर तीच आक्रमकता, तोच हजरजबाबीपणा आणि तीच समयसूचकता घेऊन ५ प्लॅटफॉर्मवर हा सेल काम करतोय. शिवसेनेचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तरुणांची फळी येथे रात्रंदिवस झटत आहे.

शिवसेना आणि आक्रमक भाषणशैली यांची नेहमीच सांगड घातली जाते. निवडणुकांचा फड जिंकण्यासाठी सोशल मीडियाची साथ तोलामोलाची आहे. त्यामुळेच शिवसेनेनेही अन्य पक्षाप्रमाणेच सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करण्यावर भर दिला आहे. खरं तर २०१४ च्या लोकसभेत केंद्रात मोदींनी सोशल मीडियाच्या वापराचे नवीन आयाम स्थापित केले. मात्र, मित्रपक्ष शिवसेनेची त्या वेळी प्रचाराच्या या पद्धतीवर फार पकड नव्हती. विधानसभा निवडणुकीत मात्र युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी याकडे विशेष लक्ष दिले आहे. सोशल मीडिया हाताळण्यासाठी खास टीम तयार केली. ती आता पूर्ण जोमाने काम करत आहे.
 

३५ जणांची टीम, बहुतांशी युवा सैनिक 
दादर येथील शिवसेना भवनमधील पाचव्या मजल्यावर शिवसेनेची वाॅर रूम आहे. याची जबाबदारी शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण, युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि अमोल घोले यांच्यावर आहे. त्यात सुमारे ३५ सदस्यांचा सहभाग असून ते सर्व शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. ही यंत्रणा उभारण्यासाठी कोणत्याही खासगी कंपनीची मदत घेण्यात आलेली नाही. त्यात संपूर्णपणे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे. यात डिझायनर, कल्पक कॉपी रायटर, व्हिडिओ एडिटरचा समावेश आहे.
 
 

आदित्य ठाकरे यांची मीडिया सेलवर बारीक नजर, तेच ठरवतात रणनीती
> शिवसेनेच्या सोशल मीडियावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंच्या पोस्ट असतात. त्यांची भाषणे, प्रचार दौरे, रॅली यातील महत्त्वाचे मुद्दे व्हायरल केले जातात. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, शेअरचॅट या प्लॅटफॉर्मवर प्रचार केला जातो. भाषणाच्या व्हिडिओजच्या क्लिप्स सातत्याने अपलोड केल्या जातात. 
> जिल्हा, वॉर्ड पातळीवरून आलेल्या महत्त्वाच्या पोस्टही मध्यवर्ती कार्यालय शेअर करते. राजकीय घडामोडींवर नजर ठेवून त्यांचे विश्लेषण केले जाते. विरोधकांच्या पोस्टला आक्रमक उत्तर दिले जाते. हा सेल राज्यभरातील माहिती व आकडेवारी गोळा करून पक्षाच्या नेत्यांना पुरवतो. व्हॉट्सअॅप ग्रुप, फेसबुक पेज निर्माण करणे, ट्रेंड जाणून घेणे, माहिती अद्ययावत करणे आदी कामांचा यात समावेश आहे.
 

धोरणात्मक निर्णयावर सल्ला
सोशल मीडिया सेलवर आदित्य ठाकरे यांची बारीक नजर असते. ते स्वत: मराठी, इंग्रजीतून अनेक ट्विट करतात. कलम ३७०, ट्रिपल तलाक, सर्जिकल स्ट्राइक, आदित्य यांना मुख्यमंत्रिपदाची दावेदारी तसेच आरेतील जंगलतोड यांसारख्या धोरणात्मक विषयांवरील पोस्ट करण्यापूर्वी पक्ष नेते, प्रवक्ते यांची मंजुरी घेतली जाते. पोस्ट करताना आततायीपणा न करता संयम बाळगण्याकडे या टीमचे लक्ष असते. 
 

राज्यातील नेत्यांची सोशल आघाडी
शिवसेनेचे खासदार, आमदार व जिल्हाप्रमुखसुद्धा सोशल मीडियावर आहेत. तेे आपापल्या जिल्ह्यातील घडामोडींवर भाष्य करतात. मध्यवर्ती कार्यालयातून आलेल्या पोस्ट शाखाप्रमुखांच्या अकाउंटपर्यंत पोहोचवण्यात ते मध्यस्थ असतात. यातून नेत्यांचे दौरे, एखाद्या विषयावर भूमिका समजते. शाखा स्तरावरील नेत्यांचे व्हॉट्सअॅप ग्रुप सक्रिय आहेत. त्यावर या लिंक फॉरवर्ड केल्या जातात.