आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंचा लढण्याचा निर्णय क्रांतिकारी, पण मुख्यमंत्रिपदावर दावा करू नये : आठवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन काटे
 
मुंबई-‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न फक्त मी करतोय. मात्र राज्यातला वंचित आघाडीचा प्रयोग वंचितांना सत्तेपासून आणखी वंचित ठेवणारा आहे,’ असा आरोप रिपाइंचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना केला. आदित्य ठाकरे यांचा निवडणुकीला लढण्याचा निर्णय क्रांतिकारी आहे, पण सध्या तरी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळेल अशी शक्यता नाही. त्यामुळे त्यांनी दावा करू नये, असा वडिलकीचा सल्लाही त्यांनी युवा सेनेच्या प्रमुखांना दिला.
 

प्रश्न : सध्याच्या राजकीय वातावरणाकडे कसे पाहता?
आठवले : २०१४ च्या तुलनेत चांगले वातावरण आहे. या निवडणुकीत भाजप, सेना, रिपाइं आणि मित्रपक्षांना २५० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळेल. त्यामुळेच अजूनही इनकमिंग सुरू आहे.
 

प्रश्न : वंचित बहुजन आघाडीचे आव्हान आहे का?
आठवले : वंचित आघाडीतून एमआयएमसह अनेक जण वेगळे होत आहेत. त्यात आणखी भर पडत जाईल. आव्हानाचा प्रश्नच नाही, उलट या आघाडीचा प्रयोग म्हणजे महाराष्ट्रात वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवण्याचा प्रयोग आहे.
 

प्रश्न : पण ‘वंचित’ची ताकद वाढतेय. तिकिटासाठी अनेक इच्छुक त्यांच्याकडे गेलेत?
आठवले : कोरेगाव भीमा प्रकरणानंतर अॅड. प्रकाश आंबेडकरांची ताकद वाढली. त्या वेळी झालेल्या आंदोलनात आमचे ८०% कार्यकर्तेही सहभागी होते. मात्र श्रेय प्रकाश आंबेडकर यांना मिळाले. त्याचा त्यांच्या उमेदवाराला फायदा झाला. पण एवढ्या मतांवर सत्तेपर्यंत जाता येत नाही. वंचितमुळे बाबासाहेबांची रिपाइं मोडीत काढली जात आहे.
 

प्रश्न : रिपाइं मोडीत काढली जात आहे म्हणजे काय?
आठवले : अॅड. प्रकाश आंबेडकर यांची संघटना बाबासाहेबांच्या विचाराच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियापासून दूर गेलीय. त्यांनी रिपब्लिकन पक्ष मोडीत काढलाय. बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न फक्त मी करतोय. १९९६ मध्ये आम्ही एकत्र होतो तेव्हा आमच्या पक्षाला मान्यता मिळाली होती हा इतिहास आहे.
 

प्रश्न : आदित्य यांच्या उमेदवारीकडे कसे पाहता?
आठवले : आदित्य यांचा निवडणूक लढण्याचा निर्णय क्रांतिकारी आहे. पहिला ठाकरे निवडणूक रिंगणात उतरला आहे. त्यांची देशभरात उत्सुकता आहे, ते अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. वरळी आमचा बालेकिल्ला आहे. तेथून आदित्य लढत असल्याने त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. ते माेठ्या फरकाने विजयी हाेतील.
 

प्रश्न : ‘ईडी’ची सध्या बरीच चर्चा आहे...
आठवले : शरद पवार हे चाणाक्ष राजकारणी आहेत. त्यांचे काम नियोजनबद्ध व व्यवस्थित आहे. माझे त्यांच्याशी अनेक वर्षांचे संबंध आहेत. ईडीने चौकशी करावी असे कोणतेही काम ते स्वतः करणार नाहीत याची मला खात्री आहे. हजारे यांनीही त्यांना क्लीन चिट दिली आहे.
 

प्रश्न : मग हा प्रकार राजकीय नाट्य होता का?
आठवले : ईडीने तपास न करताच गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली. या प्रकरणात आधी तपास व्हायला हवा. अनियमितता आहे का, यासंदर्भात कोणावर आरोप आहेत याची चौकशी होणे आवश्यक वाटते. बँकांनी कारखान्यांना मदत केली, पैसे थेट खात्यात गेले असे चित्र दिसते. चूक असेल तर चौकशी व्हावी, पण थेट गुन्हा दाखल करणे कोणालाच आवडले नाही.
 

प्रश्न : या प्रकरणाचा फायदा पवारांनाच मिळेल?
आठवले : हायकोर्टाच्या आदेशाने गुन्हे दाखल झाल्यावर हा प्रकार पुढे आला. त्यांनी जाहीर भूमिका घेतली, पण या सगळ्या प्रकारात त्यांना याचे काही मायलेज मिळेल असे चित्र निर्माण झालेले नाही.
 

प्रश्न : तुम्हाला मिळालेल्या जागांवर भाजपच्या चिन्हावर लढणार का?
आठवले : भाजपच्याच चिन्हावर लढा असा कोणताही आग्रह आम्हाला कोणी केला नाही. तरीपण सर्वानुमते निर्णय होईल. आम्ही फार कमी जागांवर लढत आहोत. इतर राज्यांत आम्हाला ‘कॉम्प्युटर’ हे चिन्ह मिळालेेले आहे. १९९२ मध्ये आम्ही रिपाइं म्हणून पंजाच्या चिन्हावर लढलो होतो. पण स्वतंत्र गटाची मान्यता मिळवली होती त्यामुळे यावर ऐनवेळी निर्णय होईल.

बातम्या आणखी आहेत...