Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | aditya thakare on sanwad yatra

शिवरायांची प्रतिमा स्टेजवर, त्यांच्या रांगेत बसू शकत नाही,आदित्य ठाकरेंच्या त्र्यंबकमधील वक्तव्यानंतर नाशकात धावपळ

विशेष प्रतिनिधी, | Update - Jul 21, 2019, 08:35 AM IST

व्यासपीठावरून भाषण करणाऱ्या प्रतिमेपेक्षा लोकांमध्ये थेट संवाद साधणारा नेता

  • aditya thakare on sanwad yatra

    नाशिक-‘शिवाजी महाराजांची मूर्ती आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या प्रतिमा स्टेजवर आहेत. त्यांच्या रांगेत आम्ही नाही बसू शकत, म्हणून स्टेजच्या खालून मी तुमच्याशी बोलणार आहे,’ असे आदित्य ठाकरे त्र्यंबकेश्वरमधील विजय संकल्प मेळाव्यात म्हणाले आणि नाशिकमधील मेळाव्यात एकच गडबड सुरू झाली. नाशिकमधील मेळाव्यातील व्यासपीठाच्या उजव्या बाजूच्या प्रतिमा शेवटच्या क्षणी व्यासपीठावर ठेवण्यात आल्या, पण या वेळी आदित्य ठाकरे आवाज घुमत असल्याचे कारण देत लोकांमध्ये शिरले.


    व्यासपीठावरून भाषण करणाऱ्या प्रतिमेपेक्षा लोकांमध्ये थेट संवाद साधणारा नेता हा फोटो नेहमीच राजकारणात लक्षवेधी ठरला आहे. तसाच काहीसा प्रयत्न जन आशीर्वाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे करत आहेत. नाशिक दौऱ्यातील त्यांचा पहिला मेळावा त्र्यंबकेश्वरमध्ये झाला. त्यावेळी व्यासपीठावरील प्रतिमांचे पूजन झाल्यावर “शिवाजी महाराजांची मूर्ती आणि बाळासाहेबांच्या प्रतिमा स्टेजवर आहेत, त्यांच्या रांगेत आम्ही बसू शकणार नाही म्हणून स्टेजच्या खालून मी तुमच्याशी बोलणार आहे...’ असे म्हणत आदित्य ठाकरेंनी खाली उतरून लोकांशी संवाद साधला. या प्रसंगानंतर नाशिकमधील मेळाव्याचे व्यवस्थापन करणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. नाशिकमधील मेळाव्यात पूजनाच्या प्रतिमा व्यासपीठावर नाहीतर व्यासपीठाच्या उजव्या बाजूस ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, त्र्यंबकच्या प्रसंगाची माहिती मिळताच, नाशिकमधील कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. स्टेजच्या उजव्या बाजूस खाली असलेल्या प्रतिमा स्टेजवर घ्याव्या लागतील, असा निरोप त्यांनी सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिला.


    प्रतिमांची पुनर्रचना, मात्र आदित्यांचा लाेकांतून संवाद
    त्र्यंबकहून निघालेले आदित्य काही अंतरावर पोहोचले होते. विसेक मिनिटांत ते नाशिकमधील मेळाव्यात पोहोचतील असे सांगण्यात आले. त्यामुळे सेना पदाधिकाऱ्यांची एकच लगबग सुरू झाली. कुणी शिवाजी महाराजांची प्रतिमा सावरली, कुणी बाळासाहेबांची. कुणी दगड आणले, कुणी टेबल उचलले. साहेब येण्यापूर्वी ही पुनर्रचना झाल्याने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र, प्रत्यक्षात या फेररचनेचा काहीच उपयोग झाला नाही. नाशिकमधील मेळाव्यातही आदित्य यांनी खाली उतरून सभागृहाच्या मधोमध उभे राहून संवाद साधला.

Trending