आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरे विशेष मुलाखत : महाराष्ट्र घडवायचाय, मात्र ही मुख्यमंत्री ठरवण्याची वेळ नाही - आदित्य ठाकरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी शिवसैनिकांतून हाेत आहे. खासदार संजय राऊत यांनी तर आदित्य यांना थेट मुख्यमंत्रिपदाचे उमेदवारच जाहीर करून टाकले. या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट करताना आदित्य म्हणाले, ‘जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मी राज्याच्या कानाकाेपऱ्यात फिरणार आहे. तेथील जनतेचे आाशीर्वाद घेतल्यानंतरच निवडणूक लढायची की नाही हे ठरवू.’ दैनिक दिव्य मराठीशी विविध विषयांवर त्यांनी साधलेला संवाद...


> या यात्रेतून विधानसभेची तयारी सुरू आहे का?
आदित्य : अजिबात नाही. जनआशीर्वाद यात्रा म्हणजे प्रचारफेरी नाही. निवडणुका आल्या की राजकीय पक्ष मते मागायला येतात, मात्र शिवसेना वेगळा पक्ष आहे. सत्तेत असतानाही जेथे चुकीचे काम होत आहे ते दाखवण्याचे काम सेना करते. कर्जमाफीचा विषय असो की पीक विम्याचा.. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना धावून जाते. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करतो. मात्र सत्ता आल्यानंतर १०० टक्के समाजकारण करतो. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेचे म्हणणे एेकून घेण्यासाठी मी आलो आहे. 

 

> स्वत: निवडणूक लढणार का?
आदित्य : विधानसभेच्या निवडणुकीला अद्याप वेळ आहे. या यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र मला फिरायचा असून जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. त्यानंतर विधानसभेची निवडणूक लढायची की नाही हे ठरवणार.

 

> नवा महाराष्ट्र घडवायचाय,  त्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का?
आदित्य : नवा, समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे, त्यासाठी जनतेसह पत्रकारांचीही मला साथ हवी आहे. ती दिल्यास नक्कीच महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलेल. मात्र, ही मुख्यमंत्री ठरवण्याची वेळ नाही. 

 

> आपल्या स्वप्नातील महाराष्ट्र कसा आहे?
आदित्य : १५ वर्षे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्यांनी महाराष्ट्र सडवला. आता मात्र महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलायचाय. ती बदलण्याची ताकद या जनतेत आहे. राज्यात दुष्काळ, पर्यावरण, रोजगार असे अनेक प्रश्न आहेत. या पाच वर्षांत ते मार्गी लावण्याचा युती सरकारने प्रयत्न केला. आगामी काळातही नेटाने प्रयत्न करायचे आहेत. वेगाने पुढे जाणारा महाराष्ट्र जनतेला हवा आहे. त्यासाठी जात, पात विसरून काम करायचे आहे.