आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेही राज्यभरात काढणार जन आशीर्वाद दौरा; भाजपला शह देण्यासाठी यात्रा करणार?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रशांत किशोर यांच्यावर पक्षाच्या प्रचाराची रणनीती सोपवली होती. त्याचा त्यांना चांगला फायदा झाला. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत किशोर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची योजना तयार करत असून ज्यांनी मते दिली नाहीत त्यांची मते मिळवण्याचा आणि ज्यांनी दिली त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी हा दौरा असून या दौऱ्याचे नाव “जन आशीर्वाद दौरा’   असे आहे. दौऱ्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.


लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी विधानसभेत शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचा असेल तर थोडीशी पडती बाजू घेऊन भाजपशी युती करण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला होता आणि उद्धव ठाकरे यांनीही तो सल्ला मानला होता. त्याचा त्यांना चांगलाच फायदा झाला. आता विधानसभा निवडणुकीची तयारी प्रशांत किशोर यांनी सुरू केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे प्रमोशन युवा सेनेतर्फे ट्विटरवर केले जात आहे. आंध्र प्रदेशमध्ये जगन मोहन रेड्डी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी संपूर्ण राज्य पालथे घातले होते. प्रशांत किशोर यांनीच या दौऱ्याचे नियोजन करून दिले होते. आता त्याच धर्तीवर आदित्य ठाकरे यांच्याही दौऱ्याचे नियोजन केले जात आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. 


युवासेनेने आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त एक पोस्टर तयार करण्यात आले असून त्यावर ‘ज्यांनी मते दिली त्यांचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी दिली नाहीत त्यांची मने जिंकायची आहेत, शिवसेना जन आशीर्वाद दौरा’ असा उल्लेख करण्यात आलेला आहे.
 

 

भाजपला शह देण्यासाठी यात्रा
खरे तर शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटप आणि सत्तेच्या समान वाटपाबाबत चर्चा झालेली असून आता काही दिवसांतच जागावाटप केले जाणार असून दोन्ही पक्ष विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. भाजपने “अबकी बार २२० पार’ अशी घोषणा दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा शिवशाही सरकार घोषणा घेऊन राज्यभरात यात्रा करणार आहेत. या वेळी मंत्रिमंडळातील भाजप आणि शिवसेनेचे मंत्रीही त्यांच्यासोबत असणार आहेत. असे असताना आदित्य ठाकरे यांची वेगळी यात्रा भाजपला शह देण्यासाठी आहे, असेही म्हटले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...