आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाला आली जाग : ६ महिला विहिरीत पडल्याच्या घटनेनंतर पानेवाडीत २४ हजार लिटरचे टँकर सुरू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री  - तालुक्यातील पानेवाडी येथे विहिरीतून पाणी शेंदून काढत असताना विहिरीवर ठेवलेले लाकूड तुटल्याने सहा महिला त्यात पडून जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली होती. ही घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे  झाले असून पानवाडीसाठी तत्काळ २४ हजार लिटर क्षमता असलेल्या टँकरच्या दोन खेपा सुरू करण्यात आल्या आहे. आज दुपारी पानेवाडीतील पाणीपुरवठाच्या (मिठा कुंआ) विहिरीत पाण्याचे टँकर खाली करताच गावातील महिलांनी व चिमुकल्यांची पाणी भरण्यासाठी गर्दी केली होती. 


फुलंब्री तालुक्यातील पानेवाडी येथे शनिवारी (दि. १) सकाळी साडेसहा वाजेला गावापासून दूर असलेल्या एका विहिरीतून पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिला विहिरीवर ठेवलेल्या लाकडावर पाय ठेऊन विहिरीतून पाणी शेंदत हाेत्या. दरम्यान, ते लाकूड तुटले होते. परंतु, विहिरीत पडलेल्या लाकडाचा महिलांनी आधार घेतला होता. यानंतर गावकऱ्यांनी विहिरीत पडलेल्या सहा महिलांना दोरीच्या सहाय्याने विहिरीतून  सुखरूप वर काढले व सर्व जखमी महिलांना फुलंब्रीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी आ. डॉ. कल्याण काळंेसह राजकीय व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय गाठून जखमी महिलांची विचारपूस केली. दरम्यान, पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना दोन किलोमीटर दूरवरून पाणी भरावे लागते हे वास्तव समोर आल्याने सर्वांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यामुळे नेहमीच कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्याची धांदल उडाली. अधिकाऱ्यांनी तत्काळ पानेवाडी गावासाठी हजार लिटर क्षमता असलेल्या टँकरच्या दोन खेपा सुरू केल्या. परंतु, गाव हे डोंगरामाथ्यावर असल्याने त्यातच रस्त्यात खड्डे असल्याने टँकर वरती चढत नव्हते. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात मुरूम टाकून पाण्याचे टँकर पानेवाडीत दाखल झाले. दरम्यान, गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला मिठा कुंआ असे म्हणतात. या विहिरीत पाण्याचे टँकर खाली करण्यात आले.  विहिरीत पाण्याचे टँकर खाली करताच गावातील महिलांनी व चिमुकल्यांची पाणी भरण्यासाठी झुंबड उडाली होती.

 

धोकादायक विहिरीतून आजही महिलांसह चिमुकल्यांनी भरले पाणी 
सहा महिला विहिरीत पडून जखमी झाल्या होत्या. ही घटना ताजी असताना आज ही त्या धोकादायक विहिरीतून अनेक महिलांनी पाणी शेंदून नेले असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे फुलंब्री तालुक्यात किती भीषण दुष्काळ पडला असून पाण्यासाठी नागरिक धोकाही स्वीकारत आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांची जीवाची काळजी करून तात्पुरते समाधान न करता पाण्याच्या कायमस्वरूपी उपयोगी पडतील, असा योजना अमलात आणाव्यात, अशी मागणी कालच्या घटनेनंतर तालुक्याभरातून होत आहे.