आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासन व्यवस्था आणि माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • एलफिन्स्टनने २८ फेब्रुवारी १८११ रोजी पुण्याच्या रेसिडेंट पदाची सूत्रे घेतली

कौस्तुभ दिवेगावकर


आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक पेच, धार्मिक- जातीय ताणांतून सामाजिक जीवनात निर्माण झालेली कोंडी आणि पर्यावरण बदलाच्या दुष्परिणामांतून सध्या नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रशासनातील स्थैर्याचा मुद्दा केंद्रस्थानी येतो आणि त्या दृष्टीने एल्फिन्स्टनच्या कार्याचे मूल्यमापन महत्वाचे  ठरते. ज्या संयतपणे त्याने परिस्थिती हाताळली, त्याचे स्मरण आजच्या संक्रमण काळातील आव्हानांच्या संदर्भात वारंवार होते.

धुनिकता या संकल्पनेत अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, सामाजिक बदल, प्रशासन अशा बाबींबद्दल चर्चा होऊ शकते. त्यापैकी प्रशासन या घटकाचा विचार करता, ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचा कार्यकाळ आधुनिक महाराष्ट्राच्या प्रशासनाची पायाभरणी करणारा होता, असे मानता येते. आधी पेशव्यांच्या दरबारात रेसिडेंट, नंतर इंग्रजी सत्तेत डेक्कन कमिशनर आणि मुंबई प्रांताचा गव्हर्नर म्हणून त्याने आपल्या प्रशासकीय कौशल्याने आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा पाया घातला. त्याला दोनशे वर्षे उलटली आहेत. एल्फिन्स्टनने घालून दिलेली मुंबई प्रांताच्या प्रशासनाची चौकट कमी-अधिक प्रमाणात आजही त्याच स्वरूपात राहिली आहे.


एलफिन्स्टनने २८ फेब्रुवारी १८११ रोजी पुण्याच्या रेसिडेंट पदाची सूत्रे घेतली. या काळात मराठ्यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केल्यामुळे मराठी राज्यात कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पेशवे आणि विविध वतनदार यांचे संबंध ताणलेले होते. ते तसेच राहतील, याची दक्षता एलफिन्स्टनने धूर्तपणे घेतली. आपल्या राजकीय कौशल्याने त्याने दुसऱ्या बाजीराव पेशव्यांस शरण येण्यास भाग पाडले. या काळातील एलफिन्स्टनची धोरणे ईस्ट इंडिया कंपनीच्या वसाहतवादी धोरणापेक्षा वेगळी नव्हती. मात्र, राजकीय बदलांचा प्रजेवर अनिष्ट परिणाम होऊ नये, याची दक्षता एल्फिन्स्टनने वेळोवेळी घेतल्याचे दिसते. वस्तुतः एखादा प्रदेश जिंकल्यानंतर जाळपोळ, लुटालूट हा भारताच्या मध्ययुगीन इतिहासातला अपरिहार्य प्रसंग असे. मात्र, पुण्यातील लोकांना कसलीही इजा पोहोचू नये, अशी व्यवस्था एलफिन्स्टनने केली होती.

जनरल स्मिथने १० फेब्रुवारी १८१८ ला सातारा जिंकले. एल्फिन्स्टनने हुशारीने ‘प्रॉक्लमेशन ऑफ सातारा’ या नावाने प्रसिद्ध असलेली द्वाही फिरवली. त्यात इंग्रजी अंमलात कोणत्याही धार्मिक पंथाच्या आचारात ढवळाढवळ  होणार नाही, जे वतनदार बाजीरावाची नोकरी सोडतील, त्या सर्वांची वतने, पेन्शने, तनखे पूर्वीप्रमाणे चालू राहतील, न्यायाचा अंमल काटेकोरपणे होईल, कसलीही जुलूम- जबरदस्ती होणार नाही, याची हमी त्याने यातून दिली. सत्ताबदल सफाईने व शांततेत व्हावा, यासाठीचा हा प्रयत्न होता. सुरक्षिततेसोबत शिक्षण आणि धार्मिक बाबतीत वैयक्तिक स्वातंत्र्य इत्यादी गोष्टी मिळाल्या की सर्वसामान्य लोक समाधानी असतात, ही बाब हेरून एल्फिंस्टनने प्रशासकीय व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

जून १८१८ ते ऑक्टोबर १८१९ या काळात त्याने पहिला डेक्कन कमिशनर म्हणून काम पाहिले. तेव्हा तो केवळ ३८ वर्षांचा होता. पुणे, नगर, नाशिक, सातारा, खानदेश असा मोठा प्रदेश त्याच्या कार्यकक्षेत होता. इंग्रजी प्रशासन व्यवस्था जशीच्या तशी लादण्यापेक्षा मराठ्यांच्या प्रशासन पद्धतीत जे चांगले आहे ते टिकवून त्यातील त्रुटी दूर केल्या पाहिजेत, असे त्याचे मत होते. प्रदेशात शांतता आणि स्थिरता निर्माण करण्यासाठी त्याने पुणे, सातारा, खानदेश अशा जिल्ह्यांत कर्तबगार कलेक्टरांची नेमणूक केली. सततची युद्धे, दुष्काळ व अकार्यक्षम प्रशासन या कारणांमुळे निर्माण झालेली अस्थिरता त्याने समजून घेतली. शक्यतो लागवडीखालील जमिनीवरच  कर असावा, शेतकऱ्यावर कराचा बोजा जास्त असू नये, असा त्याने प्रयत्न केला. दिवाणी आणि फौजदारी कामकाजासाठी कोर्टाची स्थापना केली. मात्र, हिंदू आणि मुस्लिम यांच्या धार्मिक कायद्यांबाबत शास्त्री- पंडित व मौलवी यांची सल्लागार म्हणून नेमणूक करून शक्यतो लोकांच्या धार्मिक भावना न दुखावण्याचा त्याचा प्रयत्न होता.
मुंबई प्रांताच्या महसूल प्रशासनाची घडी त्याने बसवली. मराठ्यांच्या प्रशासन व्यवस्थेत जमीनदारांचे वर्चस्व फार पूर्वीपासून होते. एल्फिन्स्टनने चातुर्याने त्यांची वतने चालू ठेवली, मात्र त्यांना न्यायालयांच्या कक्षेत आणले. जुनी पध्दत बदलून महसूल प्रशासन विकसित करण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी झाला. त्याने बंगालमधील कायमधारा व मद्रासमधील रयतवारी अशा दोन्ही ही कर प्रणालींचा अभ्यास करून सुवर्णमध्य  साधला. १८१९-२७ या काळात एल्फिन्स्टनने मुंबई प्रांताचा गव्हर्नर म्हणून काम पाहिले. या काळात महसुली प्रशासनात शिस्त निर्माण करण्याचे त्याने प्रयत्न केले. १८२४ मध्ये त्याने जमीन मोजणी करून सारा निश्चितीचे काम सुरू केले. पुढे मुंबई प्रांतात सर्व्हे आणि सेटलमेंट खात्याची स्थापना होऊन जमीन महसूल प्रशासनाला आधुनिक रूप प्राप्त झाले.

शिक्षण क्षेत्रात एलफिन्स्टनला विशेष रुची होती. पेशवे काळातल्या दक्षिणा प्रथेचा चांगल्या कामासाठी वापर करण्याचे त्याने ठरवले. सार्वजनिक निधी बनवून १८२१ मध्ये विश्रामबागवाड्यात संस्कृत पाठशाळा सुरू केली. पण, त्यात बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात नव्हते. मात्र, पुढे सर्व वर्गातील लोकांना शिक्षण मिळावे, त्यात इंग्रजीसह स्थानिक भाषेचा वापर व्हावा, केवळ कारकुनीसाठी नव्हे, तर विविध ज्ञानशाखांच्या अभ्यासाकरिता उत्तेजन दिले. त्याच्या पुढाकाराने शालेय पुस्तके तयार करणाऱ्या संस्था निर्माण झाल्या. एल्फिंस्टनने मुंबई प्रांतात शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या मिशनऱ्यांनाही दूर ठेवले. त्याला धर्म आणि शिक्षण यांची फारकत करायची होती. शिक्षणाच्या बाबतीत सरकारने पैशाची काटकसर करणे अयोग्य आहे. जनतेला शिक्षण देणे हे सरकारचे केवळ कर्तव्यच नाही, तर त्यात हितही आहे. गरीब लोकांचे सुख त्यांच्या शिक्षणावर अवलंबन असते. विचारीपणा आणि स्वाभिमान हे गुण प्राप्त होण्याचे साधन म्हणजे शिक्षण, असे तो मानत असे. बालविवाह, लोकसंख्या वाढ, विवाह किंवा धार्मिक समारंभात आयुष्याची कमाई उधळून टाकण्याचा अव्यवहारीपणा, सावकारांमुळे नाडलेल्या अडाणी गोरगरिबांची लाचार अवस्था अशा समस्यांवर शिक्षण हाच तोडगा आहे, असा त्याचा विश्वास होता.
एल्फिन्स्टनने ब्रिटिश पद्धतीचे अनुकरण पूर्णपणे न करता स्थानिक रूढी चालीरीती कायदे यांचा विचार करून एक कायदेसंहिता तयार केली, जी ‘एलफिन्स्टन कोड’ म्हणून प्रसिद्ध झाली. मुंबई प्रांताचे सर्वोच्च न्यायालय व अधिनस्त न्यायालये अशी व्यवस्था त्याने केली. आरोपींचे मूलभूत अधिकार, ज्युरी पद्धत, वकिलांची व्यवस्था अशा बाबी सुरळीत करून त्याने ‘कायद्याचे राज्य’ ही संकल्पना महाराष्ट्राच्या संदर्भात विकसित केली. प्रशासकीय अधिकारी म्हणून एखाद्या प्रदेशाचा किती सखोल अभ्यास असावा, याचा वस्तुपाठ म्हणजे एलफिन्स्टनचे लेखन होय. आपण ज्या प्रदेशाचे प्रशासन चालवतो तेथील इतिहास, भाषा, संस्कृती, राजकीय व्यवस्था, आर्थिक स्थिती, लोकभावना, भौगोलिक मर्यादा या सर्वांची सखोल माहिती असली पाहिजे, याबाबत तो दक्ष होता. 

इंग्रजी सत्ता महाराष्ट्रात कायम टिकणार नाही याची त्याला जाणीव होती. मात्र, हिंसक उठाव, बंड होऊन सत्ता जाण्यापेक्षा इथले लोक सुशिक्षित होऊन त्यांनी राज्यकारभार हाती घेऊन, त्यानंतर आपल्या साम्राज्याचा शेवट झाला तर बरे, अशी त्याची भूमिका होती. मुंबई प्रांतात वृत्तपत्रे, शिक्षण, महसूल प्रशासन, न्यायपालिका अशा संस्था चालवण्याची क्षमता असलेला समाज इंग्रज देश सोडेपर्यंत तयार झालेला असेल, ही त्याची प्रामाणिक भावना होती. प्रशासकाने संस्था बळकट कराव्यात ही शिकवण त्याने आपल्या कार्यातून दिली. त्याने आपल्या अधिनस्त तरूण अधिकाऱ्यांची फळी उभारली. वृत्तपत्रांना प्रशासनाच्या चुका सुधारण्याचे साधन मानले. प्रशासनात स्थानिक लोकांचे प्रमाण अधिक असावे असा त्याचा कायम प्रयत्न होता. वसाहतवादी इंग्रजी धोरणांच्या पलीकडे जात उदारमतवादी कल्याणकारी प्रशासन हे एल्फिन्स्टनचे वेगळेपण होते.

लोकमान्य टिळकांनी आपल्या एका अग्रलेखात एलफिन्स्टनबद्दल, “त्यांनी गोडीगुलाबीने प्रजेची मने राजी केली,’ असे गौरवोदगार काढले. आपल्या कारकीर्दीत एलफिन्स्टनला अमाप लोकप्रियता लाभली. ३१ ऑक्टोबर १८२७ रोजी वयाच्या केवळ ४८ व्या वर्षी तो निवृत्त झाला. मुंबईतील इंग्रजच नव्हे, तर प्रांतातील स्थानिक लोकांनीही त्याचे सत्कार केले. मुंबईकरांनी एल्फिन्स्टन कॉलेजच्या स्वरूपात या महान प्रशासकाची आठवण आजही जपली आहे. महाराष्ट्रातील समाजजीवनाशी  तो एकरूप झाला होता. त्याने नोव्हेंबर १८२७ ला इंग्लंडकडे प्रयाण केले व त्याच्या मृत्यूपर्यंत (१८५९) तेथेच राहिला. दरम्यानच्या काळात त्याला दोनदा भारताच्या गव्हर्नर जनरल या पदाची संधी ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांनी दिली, मात्र त्याने ती नाकारली. एल्फिन्स्टनचे धोरण हे बऱ्याचदा “प्रशासनात फार मोठे बदल न करण्याकडे’ झुकल्याचे दिसून येते. मात्र, अस्थिरतेच्या काळात सकारात्मक बदल कसे करावे, याचा आदर्श त्याच्या प्रशासन पद्धतीने घालून दिला आहे.

आजच्या काळातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक पेच, धार्मिक- जातीय ताणांतून सामाजिक जीवनात निर्माण झालेली कोंडी, पर्यावरण बदलाचे शेती व एकूण ग्रामीण-शहरी भागावर झालेले दुष्परिणाम यांच्या पार्श्वभूमीवर नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. एल्फिन्स्टनच्या काळातील आव्हाने ही संक्रमण काळाची होती. त्यामुळे त्याच्या कार्याचे मूल्यमापन ‘प्रशासनातन स्थैर्य प्रस्थापित करणे’ या निकषावर करणे फार महत्वाचे आहे. ज्या संयतपणे त्याने परिस्थिती हाताळली, त्याचे स्मरण आजच्या संक्रमण काळातील आव्हानांच्या संदर्भात वारंवार होते.

(लेखक भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असून, मराठी साहित्य व इतिहासाचे अभ्यासक आहेत).

बातम्या आणखी आहेत...