आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'...मोदी कंपन्यांना खाऊ घालतात, नंतर भरवायला सांगतात'; अॅड. आंबेडकर यांची टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- काँग्रेसवाले उघड खात होते. आता मोदी खासगी कंपन्यांना खाऊ घालतात आणि नंतर भरवायला सांगतात. याला 'कॉर्पोरेट करप्शन' म्हणतात. राफेल विमान खरेदीत हेच घडले, अशी जळजळीत टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी आरक्षण अधिवेशन झाले. पार्क मैदानात झालेल्या या कार्यक्रमासाठी मोठा जनसमुदाय तब्बल सहा तास उन्हात बसून होता. 


राफेल विमानाच्या खरेदीवर मी नाशिकमध्ये बोलेपर्यंत काँग्रेस गप्पच होते. आता मोदी चाेर आहेत म्हणत सुटले. दुसरीकडे शरद पवारांनी यात काहीच गडबड नसल्याचा खुलासा केला. म्हणजे राहुल गांधींचा अपमानच झाला. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसाठी कोण निर्लज्जपणा करणार, हे पाहता येईल. मी काँग्रेससोबत समझोता करायला तयारच आहे. पण त्यांनी भरकटू नये म्हणजे झाले, असेही अॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 


ते पुढे म्हणाले, "७१२ कोटी रुपयांचे विमान १६०० कोटी रुपयांत खरेदी झाली. मग ७०० कोटी रुपये खाल्ले कुणी? या प्रकरणात अनिल अंबानींच्या डिफेन्स कंपनीला पुढे केले. या विमानांच्या देखभालीचा खर्च वर्षाकाठी १ लाख कोटी अाहे. ही रक्कम अंबानींच्या खात्यात जमा करावी लागेल. संरक्षणावर अडीच ते तीन लाख कोटींचा खर्च, त्यात एक लाख कोटी देखभालीला गेल्यावर राहिले काय? त्यावर पर्याय म्हणजे कर वाढवणार. मोदींना मत देणाऱ्यांना दरवर्षी १० हजार रुपयांचा भुर्दंड बसणार. ते द्यायचे नसेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्ता द्या." 


माळी महासंघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्रीशैल गायकवाड यांनी स्वागत केले. अर्जुन सलगर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अंजना गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी एमआयएमचे तौफिक शेख, शफी हुंडेकरी, लक्ष्मण माने, बबन जोगदंड, दशरथ भांडे, विश्रांती भूषणर, पी. एन. हराळीकर, अनिल जाधव, बशीर अहमद, भारती कोळी आदी होते. 


आरक्षण ७० टक्केपर्यंत वाढवा, प्रश्नच सुटतील 
आरक्षणासाठी मराठा समाजाने मोर्चे काढली. त्यातून मिळाले काय? दलित, धनगर आदिवासींमध्ये भांडणे लागली. आरक्षणाचा प्रश्न बाजूलाच राहिला. आरक्षणासाठी आजपर्यंत मागासलेपणाची व्याख्या होती. आता सामाजिक, आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची वेळ आली. प्रत्येक घटकाला आरक्षण देताना या बाबी तपासल्या पाहिजेत. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणास विरोध केला. सामाजिक स्वास्थ्यासाठी ही अट शिथिल करण्याची मागणी करून ७० टक्क्यांपर्यंत नेता येईल. तिथे मराठा समाजासह इतरांचा प्रश्नही सुटेल, असे अॅड. आंबेडकर म्हणाले.


मोदींना किती निधी दिला? 
किरकोळ व्यापारात थेट परकीय गुंतवणूक नको म्हणून व्यापाऱ्यांनी अाज बंद पुकारला. याच व्यापाऱ्यांनी २०१४ मध्ये आरएसएस आणि मोदींना निधी दिला. मोदी आता जाता जाता परदेशी लोकांना व्यापारपेठ खुली करून दिली. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरला. कारण किरकोळ व्यापार आता राहणार नाही, याची त्यांना जाणीव झाली. दुसरीकडे अजगराच्या रुपातील मोदींना रोखू शकत नाहीत. परंतु या अजगराला रोखायचे असेल तर व्यापाऱ्यांनो, वंचित बहुजन आघाडीत या. एकाही परदेशी व्यापाऱ्याचा पैसा देशात घुसू देणार नाही, अशी ग्वाही अॅड. आंबेडकर यांनी या वेळी दिली. 


रखरखत्या उन्हात लाेकांची सहा तास बैठक 
१. दुपारी १२ वाजता सुरू होणाऱ्या सभेसाठी अॅड. आंबेडकर २ वाजून २५ मिनिटांनी मंचावर आले. त्यांच्या भाषणाच्या विविध समाज घटकांच्या तब्बल ३० प्रतिनिधींचे भाषण झाले. सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी अॅड. आंबेडकर बोलण्यास सुरुवात झाली. सहाला आकाशात ढग जमले. गडगडाटही एेकू आला. ही स्थिती पाहून त्यांनी ६ वाजून १० मिनिटांनी भाषण आवरते घेतले. 
२. जिल्ह्यातून अालेल्या वाहनांची व्यवस्था होम मैदानात करण्यात आली होती. तिथून लोकांचा लोंढा हलगीच्या नादात पार्क मैदानात येत होता. मैदानातील जागा व्यापून गेल्यानंतर उंच पायऱ्यांवर जाऊन लोक बसले होते. रखरखत्या उन्हात सकाळपासून तब्बल सहा तास ठाण मांडून बसलेले होते. 
३. मैदानातील भव्य मंडपावर भगवे, हिरवे, निळे आणि भगवे झेंडे लावण्यात आले होते. मान्यवरांचा याच रंगांचे फेटे बांधण्यात आले. अॅड. आंबेडकर यांच्या डोक्यावर पिवळ्या रंगाचा फेटा होता. धनगर समाजाने त्यांना काठी आणि घोंगडे देऊन सत्कार केला. 

बातम्या आणखी आहेत...