आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोट्या वचनांना कायद्याचा बडगा असलाच पाहिजे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

१० सप्टेंबरच्या ‘मधुरिमा’ मध्ये कविता ननवरे यांची ‘रात गई बात खतम’ ही कव्हर स्टोरी प्रकाशित केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या विवाहपूर्व लैंगिक संबंध आणि फसवणूक या केसच्या निकालावर आधारित हा लेख होता. वाचकांनी सोशल मिडियासह अनेक माध्यमांमधून त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्याच प्रतिक्रियांचा हा सारांश...
 
सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी एक निर्णय दिला. त्या निमित्ताने परत एकदा ‘लग्नाचं खोटं वचन देऊन ठेवलेले लैंगिक संबंध’ हा बलात्कार आहे की नाही यावर चर्चेचा झडताहेत. अनेक खोट्या केसेसमध्ये अडकलेल्या, भविष्यात अडकू शकणाऱ्या ‘बिचाऱ्या’ वगैरे पुरुषांची आता या निर्णयामुळे सुटका होईल, अशीही चर्चा या निमित्ताने रंगली आहे. काहींनी तर पुढे जाऊन अशीही भीती व्यक्त केली आहे की ह्या निर्णयाचा अनेक पुरुष आता स्त्रियांना लैंगिकदृष्ट्या फसवण्यासाठी गैरफायदाही घेतील वगैरे वगैरे..!

भारतीय दंड संहितेच्या कलम ३७५ मध्ये बलात्काराची व्याख्या केलीय.त्यानुसार ‘महिलेच्या संमतीशिवाय’ ठेवलेले संबंध म्हणजे बलात्कार होय. संहितेचे कलम ९० असे म्हणते की संमती ही जर ‘खोटी गोष्ट सांगून, गैरसमज पसरवून मिळवलेली असेल’ तर तिला ‘संमती’ म्हणता येणार नाही. या मूलभूत कायदेशीर तरतुदींचा आधार घेत आजवर न्यायालयाने ज्या ज्या प्रकरणांत ‘संमती ही लग्नाचं खोटं वचन देऊन घेतलेली होती’ हे सिद्ध झालेले आहे, त्या प्रकरणात अशी संमती ही संमती म्हणून न्यायालयाने ग्राह्य धरली नाही व आरोपीला बलात्काराच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवलेले आहे.

हे झालं कायदेशीर प्रक्रियेविषयी. पण यानिमित्ताने दुसरा भाग जो की तेवढाच महत्त्वाचा आहे तो ही चर्चिला जाणं गरजेचं आहे, व तो म्हणजे लैंगिक नातेसंबंध. आपल्याकडे मुळात आजही समाजमान्य (वैवाहिक) नात्याशिवाय असलेले लैंगिक संबंध हे स्वीकारले जात नाही.  शिवाय अशा संबंधांचा परिणाम तुम्ही स्त्री आहात की पुरुष यावर अवलंबून आहे. कारण चारित्र्याच्या कसोट्या स्त्री-पुरुषांसाठी आजही वेगवेगळ्या आहेत व त्या प्रत्यक्ष जीवनात थेटपणे परिणाम करीत असतात. अशा संबंधांमध्ये असणाऱ्या स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत भेदभावी व्यवहाराचा, त्यांना हीन लेखलं जाण्याचा, प्रसंगी त्या कुणालाही ‘उपलब्ध’ आहेत अशा मानसिकतेच्या शिकार होण्याचा, त्यांच्यावर थेट बळजबरी होण्याचा, त्यांना चारित्र्यहीन ठरवून बहिष्कृत केले जाण्याचा धोका आजही गंभीर आहे. त्या तुलनेत अशा संबंधांमध्ये राहणाऱ्या पुरुषांना वरीलपैकी कोणत्याच धोक्याचा सामना करावा लागत नाही. या सर्व परिस्थितीत स्त्रियांना संरक्षण मिळावे या हेतूनेच खरे तर वरील कायदेशीर तरतुदी निर्माण झालेल्या आहेत.
बलात्कार, मग तो थेट बळजबरी करून झालेला असो,  खोट्या वचनांच्या आधारे केला गेलेला असो, तो स्त्रियांच्या एकूणच शरीर, मन, बुद्धी आणि दैनंदिन आयुष्यावर, त्यांच्या जगण्याच्या इच्छा आणि प्रेरणेवर अामूलाग्र प्रभाव पाडत असतो. त्या धक्क्यातून त्या सहजतेने व लवकर बाहेर पडू शकेल अशी आपली समाजव्यवस्था नाही. असे असतानादेखील लेखिकेने “पुरुषांवर असा आरोप करून त्याला लग्नबंधनात अडकायला मजबूर करणं हासुद्धा स्त्रीचा पुरुषावर होणार बलात्कारच आहे”असं म्हणणं केवळ भयंकरच नाही तर स्त्रियांवर होणाऱ्या बलात्काराची कुचेष्टा करत टर उडवण्यासारखं आहे, तसा हेतू कदाचित नसला तरी. आणि तरीही घडणाऱ्या घटनेला तिलाच जबाबदार धरत तिनेच कसं सजग राहायला हवं असा सल्ला देणंही फारच अजब आहे. मुळात आरोपी म्हणून पुरुषांची भूमिका इथे महत्त्वाची आहे. घरात, देशात शांततेने, आनंदाने राहण्याचा, जगण्याचा मूलभूत हक्क असताना देखील, केवळ चोरी होऊ नये म्हणून दिवसरात्र जागून काढण्याची शिक्षा ही मूलभूत हक्कांची पायमल्ली असते. स्त्रीने स्वत:च सजग राहण्याचा सल्ला देणाच्या नादात, एका बाजूला आपण तिच्यावर कायमसाठी ‘फसवल्या जाण्याच्या दहशतीचं जोखड’ लादत आहोत, तर दुसऱ्या बाजूला पुरुषांच्या ‘बलात्कारी’ मानसिकतेकडे, लैंगिक वर्तनातील त्यांच्या जबाबदारीकडे मात्र दुर्लक्ष करत आहोत का, याचा गांभीर्याने विचार होणं आवश्यक आहे.  इथे खरं तर पुरुषांची भूमिका ही जास्त महत्त्वाची आहे. कारण फसवणूक करून, खोटं आश्वासन देऊन लैंगिक संबंधांसाठी संमती मिळवणारा ‘तो’ आहे, आणि म्हणूनच तो आरोपीदेखील आहे. त्यामुळे स्त्रिया कायद्याचा गैरवापर वगैरे करतात, असं म्हणण्यापेक्षा ‘संमती’ म्हणजे नक्की काय हे पुरुषांनी समजून घेणं आवश्यक आहे. अशी संमती आपण फसवून तर घेत नाही आहोत ना, याचाही विचार करणं आवश्यक आहे. त्यासोबतच स्वत:च्या व इतरांच्याही लैंगिक संबंधांकडे निकोपपणे, सामान्य गोष्ट म्हणून पाहता यायला शिकणं हेदेखील तेवढंच आवश्यक आहे. त्यातूनच लैंगिकते भोवतीच्या ‘ खानदान की इज्जत’ वगैरेसारख्या धारणा संपुष्टात यायला मदत होईल. 

लैंगिक संबंधांचं सामान्यीकरण झालं तर मुळात खोट्या वचनांची व त्यानिमित्ताने होणाऱ्या कायदेशीर प्रक्रियेची गरज पडणार नाही. आणि म्हणूनच किमान व्यक्तिगत गरज म्हणून तरी पुरुषांनी यात पुढाकार घेणं, जोडीदाराबरोबर व समाज म्हणून देखील या लैंगिकतेची मोकळी चर्चा करणं तसेच कोणत्याही तथाकथित नैतिक-अनैतिकतेच्या चौकटीच्या पलीकडे जाऊन तिच्याकडे बघणं आवश्यक आहे. 

पण हे होत नाही तोपर्यंत, अशी सहमती खोट्या वचनांच्या आधारे मिळवली जाणार असेल तर ‘त्याला’ कायदेशिर चाप बसायलाच हवा.  

लेखकाचा संपर्क : ९८१९९८६५२१
 

मधुरिमा विचारमंचावर कायदेतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी व्यक्त केलेली मते...
 

हे ही नसे थोडके...
एखाद्या प्रकरणात, कुठल्याही चुकीसाठी महिलेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारे पायलीला पन्नास आहेत. त्यात स्त्री-पुरूष दोघंही आघाडीवर असतात. मात्र या लेखाच्या निमित्तानं अनेक पुरूष बोलते झाले. स्त्रियांच्या रास्त अधिकारांबद्दल. तिच्या सन्मानाबद्दल. तिच्या वाजवी हक्कांबद्दल. कुणी थेट कायद्याचा दाखला देत तिची बाजू मांडली तर कुणी तिचा माणूस म्हणून विचार करून मत व्यक्त  केलं. तर कुणी  सामाजिक कार्याच्या शिदोरीतले अनुभव गाठीशी बांधून तिचा विचार केला. या लेखावर स्त्रियांची बाजू समजून त्यावर व्यक्त झालेल्या पुरूषांची संख्या लक्षणीय आहे, ही देखील जमेचीच बाजू...   
 
 

स्त्री-पुरुष म्हणजे दोन शत्रुराष्ट्रे नाहीत : अॅड. निशा शिऊरकर, संगमनेर
“प्रौढ स्त्री-पुरुषांनी परस्पर सहमतीने ठेवलेल्या शरीरसंबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही,”असे अनेक निर्णय यापूर्वीही न्यायालयाने दिले आहेत. म्हणून अशा निर्णयामुळे पुरुषवर्गाला कोणाही स्त्रीच्या मनाविरुद्ध शरीरसंबंध ठेवायला परवानगी मिळाली नाही. या लेखातील खटकलेली बाब म्हणजे, स्त्रिया या पुरुषांना अडकवण्यासाठी, आयुष्यातून  उठवण्यासाठी तक्रारी करतात ही बाब चुकीची आहे. अनेक वेळा जोडप्यांमध्ये प्रेमसंबंधांमध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर  तक्रारी दाखल होतात. केवळ कायद्याचा गैरफायदा घेऊन पुरुषांना जाळ्यात अडकवण्याचे तसेच खोट्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. आजच्या खुल्या व्यवस्थेत तरुण, तरुणी एकमेकांना भेटतात. प्रेमात पडतात. लग्नाच्या वेळी कोणाला तरी जातीची भिंत आड येते किंवा कुटुंब, समाजाच्या विरुद्ध जाऊन निर्णय घेण्याचे साहस नसते. त्यामुळे लग्न करता येत नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. पण  काहीही तक्रार न करता निमूटपणे वाटा बदलणाऱ्यांची संख्यासुद्धा मोठी आहे.  कधी-कधी मात्र अन्यायाची आणि सुडाची भावना निर्माण होते. अशा वेळी ,लग्नाचे वचन  पाळले नाही, अशा तक्रारी दाखल होतात. काही वर्षांपूर्वी असे वचन देऊन केलेल्या शरीरसंबंधांना न्यायालय बलात्कार मानत होते. परंतु १९९० नंतर आलेल्या अनेक न्यायालयीन निर्णयांत अशा तक्रारी फेटाळल्या आहेत.  अल्पवयीन मुलींवर तसेच प्रौढ स्त्रियांवर होणाऱ्या बळजबरीच्या, अत्याचारांची तुलना वरील घटनेशी करता येणार नाही. त्यांना कायद्याचे योग्य सरंक्षण आहे. खर तर स्त्री पुरुष संबंधातील प्रश्न संयमाने सोडवायला हवेत.  स्त्री-पुरुष शत्रुराष्ट्रे नाहीत. परस्परांवर अवलंबून असणारे जीव आहेत. 
- सामाजिक कार्यकर्त्या
 

नातेसंबंध, फसवणूक, विवाह, बलात्कार या चारही संकल्पनांमध्ये  फरक करता आला पाहिजे : प्रथमेश पाटील, पुण
नातेसंबंध, फसवणूक, विवाह, बलात्कार या चारही संकल्पनांमध्ये लेखिकेला फरक करता आला नाहीये. स्त्री एका विशिष्ट प्रकारे वागते,  किंवा पुरुष एका विशिष्ट प्रकारे वागतात, असा कोणताच स्टडी नाहीये. स्त्रिया हा एक कोटिक्रम म्हणून पाहिलं तर स्त्रिया या समाजव्यवस्थेत प्रत्येक गोष्टीवर वेगवेगळ्या पुरुषांवर अवलंबून असल्याचे दिसून येते. त्यात वडिलांनंतर नवरा हा आधार आहे, असं ती मानत असते. त्यामुळे  ती कोणत्याही आमिषाला बळी पडत नाही तर ती तिच्या आयुष्याचे आराखडे बांधत असते. सोबतीचं वचन दिल्यामुळे स्त्री आपल्या खासगी आयुष्यात बदल करत असते. मग जर पुरुषाने वचन पाळले नाही तर ती फसवणूक होते, पण बलात्कार केला हे म्हणणं योग्य नाही. या लेखनात खूप विरोधाभास आहे. दोन लोकांमधील नातेसंबंध संपुष्टात आले तर ते नातं संपवण्याचा हक्क दोघांना असला पाहिजे. एखादा नातं संपलं की फसवणूक वाटणं हे मुळात चूक आहे. नातं संपवता येणं हे प्रौढपणाचं लक्षण आहे. आपण यापुढे जाऊन विचार करणे गरजेचे आहे.  पण तरीही एखाद्या स्त्रीला जर वाटत असेल की, तिची फसवणूक होऊन बलात्कार केला गेला तर त्या केससाठी संमतीचं उल्लंघन हा निकष लावला पाहिजे. पण त्या स्त्रीची तक्रार बेदखल करणे हे अयोग्यच आहे.  
- कार्यकारी संपादक, इंडी जर्नल
 

पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रिया या अशाच घडल्या जातात : वंदना खरे, मुंबई
हा लेख खूपच पुरुषधार्जिण्या भाषेत लिहिला आहे. एक तर कन्सेंट ही खूप कॉम्प्लिकेटेड संकल्पना आहे, याची कोणतीही जाणीव मांडणीत दिसत नाहीये.”शरीरविक्रेती स्त्री ( वेश्या) पैसे घेऊन पुरुषाला काही वेळासाठी आपलं शरीर उपलब्ध करते. त्या पैशात ती तिच्या उदरनिर्वाहाची सोय करते. मग एखादी स्त्री पुरुषाकडून लग्नाचं वचन घेऊन त्याला स्वखुशीने आपलं शरीर देते तेव्हा ती याहून वेगळं काय करत असते.” हे धाडसी वाक्य लिहिताना मुळात आपल्या समाजात ज्या स्त्रिया विवाहपूर्व संबंध ठेवतात त्यांना लग्नाच्या बाजारात किंमत नसते  ह्या वस्तुस्थितीचा विचारच झालेला नाही. एक तर स्त्रियांनी पुरुषांच्या लैंगिक मागण्यांना बळी पडूच नये किंवा संबंध ठेवूनही लग्न नाही झाले तर ‘रात गई बात गयी’ म्हणावे, असे या लेखिकेने  सुचवले आहे. ‘तुझे प्रेम असेल तर माझ्या लैंगिक मागण्या पूर्ण कर’ असा दबाव आणणाऱ्या मानसिकतेवर प्रहार या लेखातून केलेला नाही. जो समाज पुरुषांना अश्या मागणीची मुभा देतो, यावर कोणतीच टीका लेखात नाही. पुरुषप्रधान संस्कृतीत बलात्कार, लैंगिक, कौटंुबिक हिंसा या प्रकरणांत प्रशासकीय, वैद्यकीय अशा सर्वच ठिकाणी बाई कशी चुकते हेच दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या लेखातही बाईनेच काय करावे हे सांगितले आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रिया या अशाच घडल्या जातात. पण यापलीकडे जाऊन विचार करणे गरजेचे आहे.  
- स्त्रीवादी विचारवंत
 

जोडीदाराप्रति जबाबदार वर्तनमूल्य रुजवणे गरजेचे : डॉ. अनघा सरपोतदार, मुंबई
लेखिकेच्या म्हणण्यानुसार हिंसा / फसवणूक थांबवण्याची सर्व जबाबदारी पुन्हा स्त्रीचीच आहे, अशी भूमिका घेणे होईल. किंबहुना पुरुषाचा हेतू ओळखू न आल्याने स्त्रीला दोष देणे हीच होईल. त्यामुळे पुरुषाचा हेतू ओळखण्याची जबाबदारी संपूर्णपणे स्त्रीवर देणे, अशी भूमिका प्रचंड अन्यायकारक आहे. नात्यामध्ये बेजाबदार वर्तन / हिंसा पुरुषाकडून होत असेल तर ते होऊ नये म्हणून पुरुषांसाठी शिक्षा / दंड आणि प्रबोधन दोन्ही गरजेचं आहे.  पितृसत्तेमध्ये लग्नसंस्थेला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. त्यामुळे शारीरिक संबंध केल्यानंतर त्या संबंधांची जबादारी पुरुषाने घ्यावी ही स्त्रीची अपेक्षा रास्त आहे. तशी जबाबदारी घेण्याची पुरुषाची इच्छा नसली तर संबंध येण्याच्या आधीच तशी चर्चा दोघांमध्ये होणे गरजेचे. संबंधांमध्ये पारदर्शकता आणि जोडीदाराप्रति जबाबदार वर्तन ही मूल्य मुलगे आणि पुरुषांमध्ये रुजवणे अति आवश्यक. कन्सेंट म्हणजे परवानगी. जी कृती दोन सज्ञान व्यक्ती करत आहेत किंवा करणार आहेत, त्यामध्ये दोन्ही व्यक्तींची कोणत्याही दबाव नसलेली परवानगी आवश्यक असते. लग्न करतो सांगून शरीरसंबंधांसाठी मिळवली कन्सेंट आणि ते झाल्यावर लग्न न करणे ही स्पष्टपणे फसवणूक होते. लेखामधल्या भूमिकेचे समर्थन करणे म्हणजे बलात्कार होऊ नये म्हणून स्त्रियांनीच सतत कशी सतर्कता दाखवावी हे डोस पाजण्यासारखे आहे.
- स्त्रीवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या
 

इमोशनल फूल बनू नये हा ‘युगप्रवर्तक’ सल्ला - रविंद्र झेंडे, पुणे
माझा आक्षेप लेखिकेच्या या प्रकरणाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबद्दल आहे. लेखिकेने ‘भारतीय’ स्त्रिया असा शब्द वापरला आहे. या धारणेनुसार असलेल्या भारतीय ‘संस्कृती’मध्ये विवाहपूर्व शरीरसंबंधांना बंदी आहे, म्हणून कुठल्याही कारणाने शरीरसंबंध झाला असल्यास त्याच व्यक्तीशी लग्न करणे किंवा लग्नाचे वचन दिल्यास शरीरसंबंधांना राजी होणे याला समाजमान्यता मिळते. शरीरसंबंध तर दूरची गोष्ट आहे, पण प्रेमप्रकरण नुसते जाहीर करायचे असले तरी मुलगा आणि मुलगी हे ‘प्रेम’ लग्नात परावर्तित होणार आहे याची खातरजमा करून घेत असतात, असा अनुभव आहे. यात पुरुषाच्या बाजूनेही तू माझीच आहेस आणि दुसऱ्या कोणाचीही होणार नाहीस याची खात्री करून घेण्याचा भाग असतोच. लेखिकेने म्हटल्याप्रमाणे बायकांना संस्कृतीचे नव्हे तर स्वतःचे बदनामीपासून संरक्षण करायचे असते. अशा प्रकरणात फसवणूक झाली तर पुरुष साळसूद आणि बाई चवचाल अशी मांडणी करणे चूक आहे.  लग्नाचे वचन देऊन काही कारणाने ते निभावू न शकलेले गरीब बिच्चारे पुरुष आणि या बायका म्हणजे शरीरसुखाचा फास टाकणाऱ्या कुटिल ‘विषकन्या’ अशी ही पारंपरिक मांडणी आहे. बायकांनी ‘इमोशनल फूल’ बनू नये असा युगप्रवर्तक सल्ला देताना लेखिकेने बदलत्या काळाबरोबर जुळवून घेऊ पाहणाऱ्या, रूढ चौकटी मोडू पाहणाऱ्या युवतींना आत्मसन्मान टिकवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. हे संस्कृतिरक्षकांचे नवे रूप आहे. कुटुंबाच्या,समाजाच्या,संस्कृतीच्या जोखडांना न जुमानता लिंगविरहित स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याचा प्रयत्न स्त्री-पुरुष दोघांनी करण्याची गरज आहे. लेखिकेला न्यायालयाच्या निकालाचा अर्थ समजलेला नाहीये.- पत्रकार
 
 
 

बातम्या आणखी आहेत...