आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Advani News In Marathi, BJP, Gandhinagar, Lok Sabha Ticket

गुजरात भाजपने अडवाणींसाठी गांधीनगरमधून तिकीट मागितले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरात भाजपच्या कार्यकारिणी मंडळाची मंगळवारी बैठक झाली. 26 जागांवर उमेदवारांच्या नावाची चर्चा झाली. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना गांधीनगरमधून तिकीट देण्यासंबंधी एकमत व्यक्त करण्यात आले. नरेंद्र मोदी गुजरातमधून निवडणूक लढवतील, एवढे निश्चित आहे. परंतु मतदारसंघ कोणता असेल, हे स्पष्ट झाले नाही. त्यांना सुरत किंवा अहमदाबाद पूर्वमधून तिकीट दिले जाऊ शकते.


गुजरात भाजपने आपल्या शिफारशी केंद्रीय निवड समितीला पाठवल्या आहेत. 19 मार्चला केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल. अडवाणींना गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केल्यामुळे आता सर्व चर्चांवर पडदा पडला आहे. अडवाणी भोपाळमधून निवडणूक लढवतील, असा अंदाज लावला जात होता. भोपाळचे खासदार कैलाश जोशी यांनी निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. अडवाणींनी या मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी इच्छा जोशी यांनी व्यक्त केली होती. अडवाणी यांनी मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून विरोध केला होता. त्यामुळे मोदी समर्थक त्यांच्यावर नाराज झाले. गांधीनगरमध्ये त्यांची वाटचाल एवढी सोपी नाही, असेही म्हटले जाते.


मोदींच्या विरोधात काँग्रेसचा तुल्यबळ उमेदवार
वाराणसीमधून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पक्ष मजबूत उमेदवार उतरवेल, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मंगळवारी स्पष्ट केले. अर्थात वाराणसीमध्ये गाझियाबादसारखे चित्र दिसले तर आश्चर्य वाटायला नको. गाझियाबादमध्ये काँग्रेसने राज बब्बरला मैदानात उतरवल्यानंतर तेथील खासदार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी तो मतदारसंघ सोडला. सुरजेवाला म्हणाले, तिकीट घोषणेच्या 24 तासांतच मोदींच्या तंबूत राजकीय घबराट पाहायला मिळाली आहे. गुजरातमध्ये सुरक्षित जागा शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्या अगोदर पक्षाचे नेते अनिल शास्त्री यांनी ट्विट केले होते. जर बसपा आणि सपा वाराणसीमध्ये मोदींना हरवण्यासाठी गंभीर असेल तर त्यांच्या विरोधात एक संयुक्त उमेदवार उतरवणे गरजेचे आहे, असे शास्त्रींनी म्हटले होते.


धर्मनिरपेक्ष होण्यासाठी मोदींची निंदा करा -बरकती
कोलकाताचे मौलाना बरकती यांच्या म्हणण्यानुसार ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली पाहिजे. त्यानंतर ते स्वत: ला धर्मनिरपेक्ष असल्याचे सिद्ध करू शकतील. कोलकात्याच्या टिपू सुलतान मशिदीमध्ये बरकती इमाम आहेत. ममता धर्मनिरपेक्ष आहेत, हे आम्हाला ठाऊक आहे. परंतु त्यांना ते सिद्ध करण्यासाठी मोदींवर अगोदर टीका करावी लागेल. मोदींच्या विरोधात अधिक आक्रमकपणे टीका करावी लागेल. बरकती म्हणाले, ते (मोदी) मुस्लिमांचे मत का मागत आहेत ? त्यांना तर मुस्लिमांची टोपी परिधान करण्यात अडचण आहे. मत मागण्याची त्यांना लाज वाटायला हवी.


मोदींना भेटले दोन नवीन समर्थक
पवारांची कन्या सुप्रिया सुळे आणि करुणानिधी यांचे पुत्र अलागिरी यांच्या रूपाने मोदींना नवीन समर्थक मिळाले आहेत. जोपर्यंत न्यायालयात सिद्ध होत नाही, तोपर्यंत एखाद्या व्यक्तीला दोषी मानणे योग्य होणार नाही. एखादी व्यक्ती हत्यारा असा डांगोरा पिटणे बरोबर नाही. कोर्ट आपले काम करत आहे, असे वक्तव्य सुप्रिया यांनी केले आहे. अलागिरी म्हणाले, मोदी एक चांगले प्रशासक आहेत. ते पंतप्रधान झाले तर मी त्यांचे स्वागत करेन.