आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर आम्ही काँग्रेसला टाळून सत्ता स्थापन करणार अॅड.प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील कायदा, व्यवस्था व संविधान मानत नाही. त्यामुळे आरएसएसला संविधानाच्या चौकटीत कसे आणायचे याचा आराखडा द्या, असा प्रस्ताव काँग्रेसला दोन महिन्यांपूर्वी दिला होता. मात्र यावर काँग्रेसकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यांनी अशी टाळाटाळ केली तर आम्ही त्यांना टाळून सत्ता स्थापन करणार, असा इशारा भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला. वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन मेळाव्यात ते बोलत होते. 


शहरातील आझाद मैदानावर शुक्रवारी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार इम्तियाज जलील, बळीराम शिरस्कर,माजी आमदार लक्ष्मण माने,हरिदास भदे,अशोक सोनवणे,अमित भुईगळ,शेख माजेद,संभाजी शिरसाट,दीपक डोके,दीपक बोराडे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना अॅड. आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस आणि आरएसएस यांचा छुपा समझोता असून एकमेकांची भीती दाखवून ते सत्ता मिळवतात. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राम मंदिराचा निर्णय घेऊ असे म्हणतात, तर दुसरीकडे आरएसएसचे नेते मोहन भागवत २१ फेब्रुवारीपर्यंत राममंदिराचे काम सुरू करू, असे सांगतात. 


आरएसएसला संविधान मान्य नसल्यामुळे ते अशा गोष्टी बोलतात. सरकार यावर काहीच बोलत नाही. त्यामुळे आरएसएसला सरकारची मूक संमती आहे असा अर्थ होतो, असे आंबेडकर या वेळी म्हणाले. काँग्रेससोबत किती जागा घ्यायच्या, सत्तेत कोण येणार हा प्रश्न नाही, तर आरएसएसच्या विचारांचे सरकार बदलायचे आहे हा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे आंबेडकर याप्रसंगी बोलताना सांगितले. 


एक नाही, पाच हजार घ्या 
काही लोक तुमच्याकडे मतदानासाठी एक हजार रुपये घेऊन येतील. ते न घेता त्यांच्याकडून ५ हजार घ्या. काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, यांनी आतापर्यंत तुम्हाला काहीच दिले नाही. निवडणूक हीच या लुटारूंना लुटण्याची वेळ आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पैसे घ्या व वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करा, असे माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने म्हणाले. 


शेतमजुरांना काय?
दोन एकरपेक्षा कमी जमीन असणाऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने या अर्थसंकल्पात केली आहे. मात्र या रकमेतून काय होईल? त्याशिवाय शेतमजूर, भूमिहीन यांच्यासाठी यात काहीच नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पैसे कुठे आहेत, असा सवाल आंबेडकरांनी केला. 


सभेला मोठी गर्दी 
शहरातील आझाद मैदानावर ही सभा होती. सभेची वेळ तीन वाजेची असल्याने कार्यकर्त्यांनी दुपारी दोन वाजेपासूनच मोठी गर्दी केली होती. अॅड.प्रकाश आंबेडकर चार वाजता सभास्थळी दाखल झाले. त्यानंतर रात्री ८.४५ वाजेपर्यंत ही सभा चालली. सभेसाठी भारिप आणि एमआयएम या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. 
  

बातम्या आणखी आहेत...