आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव विजा पंडूमचा..

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘पिटोपाटांग’ हा माडिया भाषेतला शब्द. त्याचा अर्थ कथा सांगणे असा होतो. या सदरातून वाचकांना आदिवासींच्या सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय कथा उलगडून दाखवणार आहोत. विकासाच्या योजना आदिवासींपर्यंत पोहोचत नाहीत किंवा आदिवासी विकासाच्या मुख्य प्रवाहात येत नाहीत ही ओरड नेहमीच होत असते. परंतु, त्याच्या मुळापर्यंत कुणी पोहोचत नाही. याचं मूळ आहे मुख्य प्रवाहातील समाजाने आदिवासींचे जगणे आणि बेदखल होणारी त्यांची संस्कृती. आदिवासी विकास हा शहरी, नागरी समाजाच्या विचारसरणीतून ठरवला गेला. परिणामी तो अपयशी ठरला. आदिवासी संस्कृती लोप पावते आहे. ती शब्दरूपाने जिवंत ठेवणे आणि मध्य भारतात त्या दृष्टीने सुरू असलेले प्रयत्न वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा एक प्रयत्न आहे. नागरी आणि आदिवासी समाजातील संवादाचा हा सेतू बनावा हीच या सदरामागची भूमिका...

 

विजा पंडूम म्हणजे बिजाचा उत्सव. विजा पंडूम झाला की इथला प्रत्येक आदिवासी आपापल्या शेतात धानाची म्हणजे भाताची पेरणी करतात. माडिया आणि गोंड आदिवासींमध्ये विजा पंडूम हा अत्यंत महत्त्वाचा उत्सव... बिजोत्सवच. निसर्ग आणि माणूस यांचं आदिम नातं अधोरेखित करणारा.

 

मृग नक्षत्र तोंडावर आलं होतं. जुव्वी गावात ‘नोमाळ' पाळला होता. नोमाळ म्हणे त्या दिवशी कुणीही झाड तोडायचं नाही, गावातून जायचं नाही, जमिनीचे व्यवहार करायचे नाहीत. म्हणून काही सामसूम नव्हतं. गावात एकच गलका पडला होता. सगळ्या स्त्रिया गोटूलमध्ये जमल्या होत्या. पेरमांची कथा रंगात आली होती. जंगलात बिजाईची पूजा करून सर्व पुरुषांनी गावात प्रवेश केला. ‘तीर्रर्र पुढे'चा जयघोष आसमंतात दुमदुमला. स्त्रियांनी गाणी म्हणत त्यांचं स्वागत केलं. मुलींनी गोटुलसमोर बांधलेल्या तोरणाला स्पर्श करण्यासाठी प्रत्येक जण उड्या मारू लागला. स्त्रियांच्या प्रसादाचा वाटा त्यांच्या सुपूर्त करण्यात आला. तो त्यांनी गोटूलमध्ये शिजवला. पुरुषांनी त्यांचा प्रसाद जंगलात जाऊन शिजवला. जंगलात एकच दरवळ पसरली होती आणि आसमंतात उत्साह. हा उत्सव होता ‘विजापंडूम'चा. विजा पंडूम म्हणजे बिजाचा उत्सव. विजा पंडूम झाला की इथला प्रत्येक आदिवासी आपापल्या शेतात धानाची म्हणजे भाताची पेरणी करतात. माडिया आणि गोंड आदिवासींमध्ये विजा पंडूम हा अत्यंत महत्त्वाचा उत्सव... बिजोत्सवच. निसर्ग आणि माणूस यांचं आदिम नातं अधोरेखित करणारा. विशेष म्हणजे, जमीनरुपी योनीचं पूजन करणारा. माडिया भाषेत 'तीर्रर्र' म्हणजे जय हो आणि 'पुढे' म्हणजे योनी. योनीतून, जमिनीतून नवीन जिवाची निर्मिती होते म्हणून हा ‘विजा पंडूम'. गावचे पेरमा, गायता, कोतला या पारंपरिक प्रमुखांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव साजरा केला जातो. निसर्गपूजक आदिवासी संस्कृतीचा दाखला देणारा. 


विजा पंडूमबद्दल विस्ताराने सांगण्याचं कारण म्हणजे, शहरी, नागरी समाजाच्या दृष्टीने मागासलेल्या समजलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यात हा साजरा करण्यात आला. यावेळी या पारंपरिक विजा पंडूम निमित्ताने तालुक्यातील वन धन केंद्राची बैठकही तिथे संपन्न झाली. वन धन केंद्र म्हणजे आदिवासी विकास महामंडळाची ही योजना. आदिवासींच्या बचत गटांना रोजगार निर्मितीसाठी साहाय्य करणारी. जुव्वीतल्या त्या बैठकीत काहींनी मोहाचे लाडू बनवण्याच्या प्रकल्पाचा विचार मांडला तर काहींनी तुरीचे तेल काढण्याचा. यंदाच्या शेतीच्या बिजासोबतच त्या बैठकीतल्या या बिजांची पेरणीही गावातल्या तरुणांच्या डोक्यात चपखल बसली.


विकासाच्या योजना आदिवासींपर्यंत पोहोचत नाहीत किंवा आदिवासी विकासाच्या मुख्य प्रवाहात येत नाहीत ही ओरड नेहमीच होत असते. परंतु, त्याच्या मूळापर्यंत कुणी पोहोचत नाही. याचं मूळ आहे मुख्य प्रवाहातील समाजाने आदिवासींचे जगणे आणि त्यांची संस्कृती बेदखल करण्याची. मुद्दा फक्त विकास योजनांचाच नाही तर संपूर्ण दृष्टिकोनाचा आहे. आदिवासी विकास हा शहरी, नागरी समाजाच्या विचारसरणीतून ठरवला गेला. परिणामी तो अपयशी ठरला. आज मुंबईसारख्या जागतिक महानगरीच्या आसपासच्या आदिवासींची स्थिती किती दयनीय आहे. विट भट्ट्यांवर मजूर म्हणून ते काम करताहेत. त्यांची भाषा विसरले आहेत, त्यांची संस्कृती विसरले आहेत. त्यांची जमीन गमावून बसले आहेत. त्यांचे आयुर्मान चाळीस वर्षांवर खालावलेले आहे. त्यांच्यापैकी कुणीही आनंदी नाही की सुखी नाही. विकासाचे ते मॉडेल आदिवासींसाठी यशस्वी ठरले असते तर ते आज आनंदी का नाहीत हा प्रश्न आज महत्त्वाचा आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या विकासाच्या निकषांमध्ये कोणताही समूदाय आनंदी असणे हे महत्त्वाचे परिमाण आहे. त्याचा विचार करता, राज्याच्या दृष्टीने अतिमागासलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील गोंड, माडिया आदिवासी हे सर्वाधिक आनंदी आहेत, समृद्ध आहेत. याचे बीज इथल्या समृद्ध संस्कृतीत 
सामावलेले आहे. या संस्कृतीमुळेच ते आतापर्यंत जंगलाचे जतन करू शकले आहेत, निसर्गाचे संवर्धन करू शकले आहेत. काळाच्या ओघात मात्र, आदिवासींची ही संस्कृती, त्याचा अर्थ बिगर आदिवासींपर्यंत पोहोचलाच नाही. तो पोहोचवणे हा या सदराचा मुख्य उद्देश आहे. 


‘गोटूल' त्यापैकीच एक. खरं तर “गोटूल' म्हणजे आदिवासी समाजातील तरुणांची मुक्त संस्कृती हेच नागरी समाजापर्यंत पोहोचले. प्रत्यक्षात आदिवासी संस्कृतीत गोटूलचा अर्थ आणि गोटूलचे अस्तित्व त्यापलीकडे आहे. गोटूल ही येथील सामाईक जगण्याची, विकेंद्रीत लोकशाहीचे व सामूदायिक निर्णय प्रक्रियेचे महत्त्वाचे माध्यम आहे. त्याची चर्चा आपण इथे करणार आहोत. त्याशिवाय पंडूम म्हणजे आदिवासींचे उत्सव, वेटा म्हणजे त्यांच्या शिकाराच्या पद्धती, त्यातील नियम, पट्टी म्हणजे त्यांचा अधिवास, पेन कर्ताळ म्हणजे देवांचे उत्सव, लामणसारख्या मातृसत्ताक पद्धती, जात्रा, जन्म, लग्न, मृत्यू याच्याशी संबंधित बिनाल्कसारखे रितीरिवाज, नोमाळा म्हणजे खानपान पद्धती या साऱ्याची चर्चा आपण इथे करणार आहोत. 


माडिया समाजातील पहिला वकील होण्याची संधी मला मिळाली. फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी पदवी घेतली, आयएलएसमध्ये वकालत शिकलो. पण जेव्हा मी माझ्या गावात पुन्हा आलो, माझ्या लोकांसोबत काम करू लागलो तेव्हा लक्षात आलं, आपण काहीच शिकलेलो नाही. यांच्याकडूनच बरंच काही शिकण्यासारखं बाकी आहे. आदिवासींच्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांच्या समृद्ध संस्कृतीत सामावलेली आहेत. पण नागरी समाजाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने, विकासाच्या मुख्य प्रवाहात त्याचा समावेश न झाल्याने आदिवासी बाहेर फेकला गेला आहे. त्याचा विकास करायचा असेल, त्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर नागरी समाजालाही आदिवासींची संस्कृती, त्यांचे रितीरिवाज समजून घेणे गरजेचे आहे. आदिवासी समाजात त्याचे जतन होणे, बेदखलतेमुळे गमावलेला आत्मविश्वास पुनज्जीवित करण्यासाठी, आत्मसन्मान मिळवण्यासाठी सांस्कृतिक समृद्धीचा हा वारसा समजून घेणे, आधुनिक जगण्याशी त्याची नाळ जोडणे गरजेचे झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गोटूल पट्टी समित्यांच्या माध्यमातून आम्ही हा प्रवास सुरू केला आहे. विजा पंडूममध्ये वन धन केंद्राची बैठक किंवा पेन कर्ताळमधून उभा राहिलेला सुरजागडच्या बेकायदा खाणी उत्खननाविरोधातील लढा त्याचीच काही उदाहरणेे. 
ओरिजिन ऑफ द लॉ इज इन कस्टम. कायद्याचा उगम प्रथा परंपरेत मानला जातो. पण पेसा आणि वन हक्क कायदे सोडले तर आदिवासींच्या संस्कृतीचा विचार कोणत्याच कायद्यात करण्यात आला नाही. आदिवासींच्या विवाहाच्या स्वतंत्र पद्धती आहेत, पण त्याला कायद्याचे कोंदण नसल्याने त्यातील तंटे हिंदू विवाह पद्धतीने चालवले जातात. आदिवासी हे हिंदू नाहीत, तरीही त्यांच्या धर्मांतरावर राजकारण होते. वैयक्तिक तंटे, सामूहिक निर्णय घेण्याची आदिवासींची सक्षम अशी स्वतंत्र यंत्रणा आहे, रचना आहे. परंतु त्याची मुख्य प्रवाहातील समाजाने दखलच घेतली नाही. दुर्लक्षिली गेली. एवढा मोठा आदिवासी समाज, त्यास तुकड्यात विभागले. मध्य भारतात एवढा प्रचंड मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशापासून महाराष्ट्रातील अमरावती, किनवटपर्यंत. एक देश बनले एवढा विस्तृत प्रदेश. भाषावार प्रांत रचना झाली. मराठी बोलणाऱ्यांना महाराष्ट्र राज्य मिळाले, तेलगू बोलणाऱ्यांना आंध्रप्रदेश मिळाला, पंजाबी बोलणाऱ्यांना पंजाब मिळाला. पण गोंडी बोलणाऱ्यांना गोंडवाना राज्य मिळाले नाही. तेव्हा आदिवासींमधून सक्षम नेतृत्व नव्हते. त्यांचे स्वतंत्र राज्य झाले नाही. तसे झाले असते तर भारतातील आदिवासींची स्थिती खूपच वेगळी असती. आज गोंडी भाषा बोलणारे आदिवासी ज्या राज्यात विखूरले आहेत, तिथली मातृभाषा त्यांच्यावर लादली गेली. माझी भाषा माडिया, माझ्या पालकांना, कुटुंबियांना कुणालाच मराठी येत नाही, पण माझी मातृभाषा मराठी लिहिली आहे. 


छत्तीसगडमधील माझ्या मावस भावांची, मामे भावंडांची मातृभाषा शासकीय कागदोपत्री हिंदी लिहिली आहे. तेलंगण्यातील आदिवासींची मातृभाषा तेलगू लिहिली आहे. आदिवासींना विभागून टाकले, त्यांची शक्ती क्षीण केली. परिणामी देशातील गोंड आदिवासींची पुढली पिढी एकमेकांशी गोंडीमध्ये संवाद साधू शकत नाहीए. आमच्या भागातील माडिया नावे मागे पडत चालली आणि ऐश्वर्या, लैला यासारखी नावे ठेवली जात आहेत. आदिवासी संस्कृती लोप पावते आहे. ती शब्दरूपाने जिवंत ठेवणे आणि मध्य भारतात त्या दृष्टीने सुरू असलेले प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. नागरी आणि आदिवासी समाजातील संवादाचा हा सेतू बनावा हीच आशा.


> शब्दांकन - दीप्ती राऊत
(लेखक जिल्हा परिषद सदस्य आणि भामरागड गोटूल पट्टी समिती सदस्य आहेत)
 

लेखकाचा संपर्क - ९४०५१३०५३०

बातम्या आणखी आहेत...