Magazine / पेंदा, पडका आणि वास्त्याची भाजी

मुळात आदिवासी समाज हा शेती करणारा समाज नव्हता. नागरी समाजाच्या संपर्कात आल्यावर तो शेती करू लागला

दिव्य मराठी

Jul 21,2019 12:12:00 AM IST

मुळात आदिवासी समाज हा शेती करणारा समाज नव्हता. नागरी समाजाच्या संपर्कात आल्यावर तो शेती करू लागला. माडिया समाज हा तर हंटिंग अँड गॅदरिंग म्हणजे शिकार करणे आणि कंदमुळे गोळा करणे असा जंगलावर उपजीविका असलेला समाज. पुढे हा समाज शेती करू लागला खरा, परंतु त्यातही सपाटीवरील एकसुरी, परावलंबी आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या शेतीपेक्षा आदिवासींची शेती आणि त्यास जोडलेली संस्कृती खूप वेगळी आणि वैविध्यपूर्ण आहे.

शासकीय कागदपत्रे असोत वा कोणताही शैक्षणिक दस्तावेज, ‘व्यवसाय' या रकान्यासमोर सगळ्या आदिवासींसाठी सरसरकट "शेती' अशी नोंद केली जाते. आदिवासी समाज, जीवनमान आणि संस्कृती याबाबतच्या अनभिज्ञेमुळेच ही चूक आपण सारेच वर्षानुवर्ष करीत आलो आहोत. मुळात आदिवासी समाज हा शेती करणारा समाज नव्हता. नागरी समाजाच्या संपर्कात आल्यावर तो शेती करू लागला. आमचा माडिया समाज हा तर ‘हंटींग अँण्ड गँदरिंग’ म्हणजे शिकार करणे आणि कंदमुळे गोळा करणे असा जंगलावर उपजीविका असलेला समाज. पुढे हा समाज शेती करू लागला खरा, परंतु त्यातही सपाटीवरील एकसुरी, परावलंबी आणि पर्यावरणाचा ऱ््हास करणाऱ्या शेतीपेक्षा आदिवासींची शेती आणि त्यास जोडलेली संस्कृती खूप वेगळी आणि वैविध्यपूर्ण आहे.
"जंगल' हे माडियांच्या जगण्याचा अविभाज्य भाग. त्यामुळे जंगलात जाऊन स्वत:च्या खाण्यापुरती केलेली शिकार आणि जंगलातील भाजीपाला, फळे आणि कंदमुळंं हा त्यांचा आहार. आजही गावठाणं तयार झाली असली तरी अनेकजण जंगलातच राहातात. गावठाण्यात राहीले तरी जंगलात उगवणाऱ्या वनस्पती हा त्यांचा मुख्य आहार. त्यात वास्ते म्हणजे बांबू शूट्स, कुडील जब्बा म्हणजे कंचनाच्या झाडाची कोवळी पानं, आल जब्बा म्हणजे पिंपळाची लाल कोवळी पानं हा माडियांचा सर्वाधिक पसंतीचा आहार आहे. सध्या प्रत्येक घरात तुम्हाला वास्ते, कुडील जब्बा किंवा आल जब्बा या भाज्या हमखास खायला मिळतील. माडिया भाषेत 'जब्बा' म्हणजे पानं. तेल, फोडणीची गरज नसलेल्या या कोवळ्या पानांच्या आणि कोंबांच्या नुसत्या हळदमिठाच्या उकळीवरील किंवा चुलीवर भरडलेली कोरडी भाजी माडियांमध्ये विशेष प्रिय आहे. आता तर काहींनी त्यांच्या परसात किंवा घरासमोर या भाजीसाठी खास कंचनाची झाडं लावली आहेत. त्यामुळे "जंगल' हेच आदिवासींचे पहिले शेत.


आदिवासींनी शेतीची सुरुवात केली तीच जंगलातील स्थलांतरित पद्धतीची. आजही गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित शेती केली जाते. वनाधिकार कायदा आल्यानंतरच शेतीचे हक्काचे पट्टे तयार झाले. जंगल आणि पर्यावरण याचे अत्यंत संतुलन साधणारी स्थलांतरित शेती बिनामुंडासारख्या पहाडीतील गावांमध्ये केली जाते. पहाडातील या स्थलांतरित शेतीला माडिया "पेंदा' म्हणतात, तर पठारावरील स्थीर शेतीला "पडका'. आजही दोन्ही प्रकारची शेती करणारी कुटुंबे इथे आहेत. पेंदा पद्धतीत आदिवासी कुटुंब पहाडावरील एक तुकडा निवडतो, तेथील जंंगल छाटून, जाळून शेतीसाठी जमीन तयार करतात. यात कोणतीही अवजारे वापरली जात नाहीत, अगदी नांगरही नाही. त्यामुळे पतीपत्नी दोघे हाताने जेवढी जमीन तयार करू शकतील तेवढीच करतात. विशेषत: दोन-तीन वर्ष तो तुकडा कसतात आणि चौथ्या वर्षी ती जमीन सोडून देऊन पहाडीचा दुसरा तुकडा निवडतात. तिथे पुन्हा पहिल्याप्रमाणे नव्याने मशागत. पुन्हा दोन-तीन वर्ष हा पट्टा कसून तिसरा तुकडा तयार करतात. त्यामुळे एकावेळी एका तुकड्यावर ते शेती करीत असताना पहाडीच्या उरलेल्या भागात दहा-बारा वर्षात पूर्ववत जंगल उभं राहात असतं. पेंदा पद्धतीच्या या शेतामुळे फक्त जंगलच नाही तर शेतीचाही समतोल राखला जातो. यात एकाच वेळी कोहला, आर्क, गोरांघ यासारखी मिलेट्स, काकडी, आंबाडीसारख्या भाज्या, वालासारखी कडधान्य एकाच वेळी पेरली जातात. ही मिश्र शेती आहे. घरातील पारंपरिक बियाणंच यात वापरलं जातं. कोणतीही बाह्य खते किंवा रसायनांशिवाय जंगलातल्या कसदार मातीत ती बहारदार उगवतात.


आदिवासींच्या शेतीचा दुसरा प्रकार म्हणजे "पडका'. पहाडीहून खालच्या परिसरात पडका शेती केली जाते. हेल्ले म्हणजे रेड्याचा नांगर (नांगील - माडिया शब्द) धरून ही शेती केली जाते. अजून नांगरासाठी बैलांचा वापर केला जात नाही. अलीकडेच बिनागुंडातील रामा दुर्वा या तरुणाने एक पोतं धान मिळवून पहिल्यांदा भाताची पेरणी केली. तोपर्यंत इथले सगळे माडिया पेंदा शेती करीत होते, त्यांना धान्य माहीतच नव्हते. मिलेटस् चा भात आणि मिलेटस् ची आंबील हेच त्यांचे अन्न होते. पहाडाखालील स्थीर - पडका शेती करू लागलेल्या आदिवासींनी सागवान, हिरड्याच्या लाकडांपासून नांगर तयार केले. बिगर आदिवासींची शेती बघून ते ही आता भाताची पेरणी, लावणी करू लागले. आदिवासी शेतीचा तिसरा प्रकार आहे तो 'वेटूळ' म्हणजे घराभोवतीची वाडी. प्रत्येक आदिवासी घराभोवती वेटूळ असते. परसबागेपेक्षा मोठी आणि पडक्यापेक्षा लहान अशी ही शेती. यात मका, काकडी, भोपळा, भेंडी याची शेती केली जाते. वेटूळमध्ये धान्याशिवाय अन्य भाज्या, वनस्पती लावल्या जातात. शेतातलं धान्य घरात येण्यापर्यंत पावसाळ्यातील खाण्याची सोय वेटूळमधून होते. नवा पंडूम झाल्यावरच या भाज्या खाल्ल्या जातात, तोपर्यंत नाही. नवा पंडूम म्हणजे शेतीला सुरुवात झाल्यापासूनचा पहिला सण. साधारण पोळ्याच्या आसपास हा येतो. नवा पंडूम होईपर्यंत तोपर्यंत आदिवासी बांबूंचे कोंब, जंगली मशरूम्स, कंदमुळे या जंगलातील उपजांवरच अवलंबून असतात. याच काळासाठी उन्हाळ्यात मासे, काही कंद आणि भाज्या सुकवून ठेवतात. नवा पंडूम झाला की वेटूळमध्ये आलेला भाजीपाला खाण्यास सुरुवात होते.


शेतीचा चौथा प्रकार म्हणजे चेलका. म्हणजे नदीच्या काठावर केली जाणारी शेती. ही रब्बी हंंगामातील शेती आहे. पावसाळ्यात वाहून आलेल्या नदीपात्रातील कसदार गाळावर चेलक्यात डाळी पिकवल्या जातात. यातही गावरान बियाणं आणि कोणत्याही बाह्य खते किंवा औषधांशिवाय अत्यंत आरोग्यसंपन्न पद्धतीने चेलका शेती केली जाते. विजा पंडूमच्या सणानं शेतीच्या मोसमाची सुरुवात होते. पीक व्यवस्थित यावे म्हणून धान पेरल्यावर तेगाम पंडूमचा उत्सव साजरा केला जातो. पीक आल्यावर पिंडी पंडूमचा उत्सव होतो आणि मगच नवीन धान्य खाण्याची सुरुवात होते. सगळे कसे नियोजनबद्ध. वर्षभराचे धान्य बांबूच्या ढोलीत साठवलं जातं. शेणामातीनं लिंपलं जातं. काही धान्याची कणसंच एकमेकात विणून त्याची वेणी तयार केली जाते. त्याला वेटीया म्हणतात. घरात लाकडी स्टँण्ड तयार करून त्या बड्डीवर या ढोली ठेवलेल्या असत. धान्याची कमतरता कधीच पडत नव्हती.


आता या चारही पद्धती बदलत चालल्या आहेत. आदिवासींची शेती संस्कृती समजून न घेता, पठडीबंद सरकारी योजना त्यांच्यावर लादण्यात आल्या. त्यामुळे आदिवासींची पारंपरिक शेती मागे पडली आणि तथाकथित ‘प्रगत' शेती पसरते आहे. विशिष्ट कंपन्यांची बियाणे दरवर्षी खरेदी करावी लागत आहेत. रासायनिक खतांचा मारा केलेली, सातशे -आठशे रुपये एक तास या भावाने ट्रँक्टरने मशागत करणे ही ‘आधुनिक' शेती सुरू झाली आहे. पारंपरिक शेती मागे पडली आणि परावलंबी तोट्याची, कर्जबादारी शेती आदिवासींच्या माथ्यावर मारली गेली. आदिवासींची मूळ शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. मानवी कौशल्याने, अवजारांनी केली जात होती. सरकारी योजनांद्वारे मात्र डिझेल इंजिन, मळणी यंत्रांचे वाटप केले गेले. त्यात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला. नांगर दिले ते लोखंडाचे, ते बैलांनाही उचलेनात असे. ट्रँक्टर दिले त्याच्या डिझेलचे, भाड्याचे पैसे भरता भरता आदिवासी कर्जबाजारी झाला. ते कर्ज फेडण्यासाठी स्वत:कडील अस्सल ऑरगँनिक धान्य आणि गावरान बियाणं कमी भावात विकू लागला आहे. दुसरीकडे रेशनवरचं सडकं, किडकं धान्य खाऊ लागला. तो वर्षानुवर्ष जी पिकं घेत होता, ज्या पद्धतीने शेती करत होता, त्याला 'अँार्ग्यानिक' म्हणून शहरी बाजारपेठेत मोल मिळत असताना, त्याच्या गावात मात्र 'तुम्ही अजुनही कोहलाच करता' म्हणून निर्भत्सना केली जाते. शेती करणं कमीपणाचं मानून आदिवासी युवक मुंबईपासून हैद्राबादपर्यंत चपराशाची नोकरी करण्यात धन्यता मानू लागले आहेत. लाकडी नांगरानं शेती करणं गरीबीचं लक्षण समजलं जात आहे. जुईसारख्या माझ्या गावात आज लाकडी नांगर बनवण्याचं कौशल्य सगळे विसरून गेले आहेत. र्टँक्टरच्या सरकारी योजनेनं एकाला लाभार्थी केलंय, पण बाकीच्यांना कर्जबाजारी.


थोडा विचार केला, थोडे प्रयत्न केले तर हे चित्र बदलणं अगदीच शक्य आहे. ओरिसा सरकारने मिलेट मिशन सुरू केले आहे. त्या पद्धतीने आपल्याकडेही मिलेट्स लागवडीला प्रोत्साहन देता येणे शक्य आहे. यामुळे आदिवासींच्या उत्पादनात फरक पडू शकतो. सीड बँकेसारख्या उपक्रमातून त्यांच्याकडील पारंपरिक बियाणाचे संवर्धन आणि एक्सचेंज दोन्ही शक्य होऊ शकते. कोहला हा अत्यंत पौष्टिक असा मिलेट्सचा प्रकार अजूनही विदर्भातील आदिवासींनी टिकून ठेवला आहे. नागली, वरई टिकून आहे. आर्क, गोरांघ यासारखे मिलेट्स तर नामशेष होत आले. कोहला अजून टिकून आहे, पण तो पिकवणाऱ्या आदिवासीला कमी लेखलं जातं, या धान्याला भाव मिळत नाही. औषधी गुणधर्म असलेल्या कोसरी किंवा कोहल्याला शहरात दिडशे रुपये किलोने मागणी आहे, पण तेथील आदिवासीकडून तो खरेदी केला जातो पंचवीस रुपये किलोनं. या पारंपरिक धान्यास शहरातील ऑर्ग्यानिक बाजारपेठ उपलब्ध झाल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. पण हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा आदिवासी संस्कृती आणि आदिवासी जीवन याकडे बघण्याचा समाजाचा आणि धोरणकर्त्यांचा दृष्टिकोन बदलेल तेव्हा. पॉलिश तांदूळ खाणारे पुढारलेले आणि कंदमुळंं खाणारे मागासलेला हा मूलभूत विचार बदलेल तेव्हा. हा विचार जिथे बदलला तिथे बदल घडून येत आहे. बस्तरमधील कोंडा गावातील आदिवासींनी नामशेष होत असलेल्या अडीचशे पारंपरिक बियाणांचे संवर्धन केले आहे.


आपले आदिवासी विकास किंवा कृषी खाते अशा सीड बँक, सीड फेस्टीव्हल्स घेऊ शकते. एक भाषा नष्ट होणे हा कोणत्याही संस्कृतीपुढील मोठा धोका मानला जातो. एक बीज नामशेष होणे हा देखील तेवढाच धोक्याचा इशारा मानला गेला पाहिजे. त्यातून फक्त आदिवासी संस्कृतीच नाही तर संपूर्ण मानवी समाज धोक्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. हीच वेळ आहे विकासाची परिभाषा बदलण्याची. त्यासाठी आदिवासी शेती आणि आदिवासी संस्कृती नागर समाजासाठी आदर्श व दिशादर्शकाचे काम करू शकते.


शब्दांकन : दिप्ती राऊत


लेखकाचा संपर्क : ९४०५१३०५३०

X