आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओले ओले वेट्टा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागरी समाजाची "शिकार' आणि आदिवासी समाजाची "शिकार' यात अत्यंत महत्त्वाचा मूलभूत फरक आहे. नागरी समाजासाठी "शिकार' ही हौस आणि शौर्य याच्याशी जोडली गेली, परंतु आदिवासी समाजात शिकार ही संस्कृतीचा आणि जगण्याचा अविभाज्य घटक आहे. कायद्याने मात्र त्यास सर्रास गुन्हा ठरवला आहे. अनेक गावांत शिकार करणे हा गुन्हा आहे हेदेखील लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. ते उत्सवांचा भाग म्हणून शिकार करतात आणि कायद्याच्या कचाट्यात सापडतात. 
 
इंग्रज राजवटीपासून स्वातंत्रोत्तर भारत सरकारपर्यंत शिकार हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु, नागरी समाजाची "शिकार' आणि आदिवासी समाजाची "शिकार' यात अत्यंत महत्त्वाचा मूलभूत फरक आहे. नागरी समाजासाठी "शिकार' ही हौस आणि शौर्य याच्याशी जोडली गेली, परंतु आदिवासी समाजात शिकार ही संस्कृतीचा आणि जगण्याचा अविभाज्य घटक आहे. आदिवासींची संस्कृती समजून न घेता त्यांच्यावर नागरी कायदे लादण्यात आल्याने, अन्य वनोपजकांप्रमाणेच शिकारीबाबतही आदिवासींना वनखात्याच्या आणि पोलिसांच्या ससेमारीचा सामना करावा लागत आहे. हे चित्र बदलायचे असेल तर वेट्टा - म्हणजे आदिवासींमधील शिकारीची संस्कृती, त्याच्या पद्धती आणि त्याचे नियम समजून घेणे गरजेचे आहे. यातील महत्त्वाचा निकष म्हणजे आदिवासी त्यांच्या पोटासाठी शिकार करतात, सण उत्सवाचा भाग म्हणून शिकार करतात. ते शिकारीचे स्मगलिंग करत नाहीत किंवा केलेली शिकार विकतही नाहीत.   

आदिवासी केव्हाही शिकारीला जात नाहीत. शिकारीसाठी जाण्याचे या समूहांचे परंपरेने ठरवलेले नियम आहेत. साधारण तीन प्रसंगात आदिवासी शिकारीसाठी जातात. पहिला प्रसंग म्हणजे मुलाचा जन्म. मुलाचा जन्म झाल्यावर त्याच्या पित्याने जंंगलात जाऊन शिकार करण्याची प्रथा बहुतांश आदिवासी समाजांमध्ये पाळली जाते. बापाला कोणती शिकार मिळणार यावर त्या मुलाचं नशिब ठरविण्याचा एक संकेत मानला जातो. हा झाला एक श्रद्धेचा भाग, परंपरेचा भाग. शिकारीला जाण्याचा दुसरा प्रसंग आहे तो अंधश्रद्धेशी निगडीत. अंधश्रद्धेत अडकलेल्या आदिवासींमध्ये जादूटोणा हा महत्त्वाचा मुद्दा बनतो. एखाद्याने जादुटोणा केल्याची तक्रार करणाऱ्यास "शिकारी'च्या माध्यमातून त्याचा पुरावा द्यावा लागतो. आणि शिकारीचा तिसरा नियम आहे तो पंडूम अर्थात सणउत्सवांशी निगडीत.

बदलत्या काळानुसार, अंधश्रद्धेशी निगडित प्रथा बंद व्हाव्यात आणि उत्सवांशी निगडित सामूहिक संस्कृतीचे नियम, रुढी वृद्धींगत व्हाव्यात यासाठी ग्रामसभांपासून गोटूल समित्यांपर्यंत गडचिरोलीच्या जंगलात प्रयत्न सुरू आहेत. 

आदिवासी त्यांच्या शिकारीसाठी बंदूकींसारखी आधुनिक शस्त्रे वापरत नाहीत. पारंपरिक साधने आणि सामूहिक कृती हे आदिवासींच्या शिकारीचे वेगळेपण. प्रत्येक आदिवासी घरात जाळी असते. शिकारीसाठी ती जाळी जंगलात लावली जाते आणि विरुद्ध बाजुने लोकं हाकारा देत जाळीच्या दिशेने वळतात. त्याला ओले म्हणतात. ओले म्हणजे ओरडणे.  वाटेतली जनावरं घाबरून जाळीच्या दिशेने पळतात आणि जाळीत अडकतात किंवा त्याला भाल्याने जेरबंद केलं जातं ही शिकारीची नेहमीची पद्धत. शिकारीचा दुसरा प्रकार म्हणजे कल्पुंज. यात सपाट खडक कलता करून त्याखाली तांदळाच्या लाह्या ठेवल्या जातात. उचलत्या कडेला एक खुंटी लावून सापळा तयार केला जातो. लाह्यांच्या वासाने लहान जनावरं खडकाखाली जाताच खुंटी खाली पडते आणि जनावर सापळ्यात अडकते. साधारणपणे घोरपड, उंदीर, काही पक्षी यांची शिकार अशी केली जाते. 

एका दिवसात, एका रात्रीत होणारी शिकार विरळच. दोरीच्या सापळ्यानेही आदिवासी शिकार करतात. पण त्यासाठी चार-पाच दिवस नियोजन केलं जातं. एका विशिष्ट ठिकाणी जंगली फळं किंवा कंदमुळं ठेवली जातात. ती खाण्यासाठी प्राणी-पक्षी नियमित येऊ लागले की तिथे दोरीचा सापळा लावला जातो. शिकार खाद्यापाशी येताच तिच्या गळ्यात दोरीचा फास पडतो. आबुजमाडसारख्या डोंगराळ प्रदेशात शिकारीची आणखी एक अनोखी पद्धत अवलंबली जाते. काही जणं दोनचार दिवस जंगलात जाऊन एकाच ठिकाणी लघवी करतात. त्यामुळे त्या मुत्राच्या वासावर काही जनावरं जमीन चाटायला येतात. तसे प्राणी त्या ठिकाणी आले की शिकार स्वत:हून चालतच येते.  
आदिवासींच्या संस्कृतीत जोडल्या गेलेल्या शिकारीचे दाखले मिळतात ते त्यांच्या उत्सवात. विजा पंडुम, नवा पंडुम या सर्व उत्सवांच्या आदल्या एक दोन दिवसात गावातले सर्व आदिवासी शिकारीसाठी जातात. शिकाराचा पहिला नियम म्हणजे फक्त तीन वेळा प्रयत्न करणे. तीन वेळा जाऊनही शिकार मिळाली नाही चौथ्या वेळी जाऊ नये हा संकेत आदिवासी पाळतात. त्यामुळे प्राण्यांच्या संख्येत समतोलता राखण्याची ही परंपरा 

आदिवासी संस्कृतीत नियमानेच आली आहे. उपजीविकेसाठी आदिवासी स्वतंत्रपणेे शिकारीसाठी जात नाही. जंगलात जाताना त्याला वाटेत एखादा ससा, घोरपड मिळाली तर त्याला शिकार मानलं जात नाही.  
शिकार करण्यासोबतच शिकारीच्या वाटपाचेही आदिवासींचे नियम आहेत. जेवढे सदस्य शिकारीसाठी गेलेले असतात त्यांना शिकारीचा समान वाटा मिळतो. मात्र, ज्याच्या जाळीत शिकार पडली आणि ज्याच्या भाल्याने शिकार झाली त्याला प्राण्याची तंगडी दिली जाते. त्यानंतर शिकारीत गरोदर महिला सहभागी झाली असेल तर तिला दोन हिस्से दिले जातात. जंगलातून ही शिकार गावाजवळच्या कारप्यात आणली जाते. त्याठिकाणी ते कापणे, त्याचे वाटे पाडणे हे काम केलं जातं. वर्षानुवर्ष कारप्याची जागा निश्चित ठरलेली असते. पेरम्याच्या संमतीशिवाय त्यात बदल करण्यात येत नाहीत. गोटूलप्रमाणे कारप्यातही महिलांना जाण्याची संमती नाही. एखाद्याच्या पत्नीस मासिक पाळी आली असेल तर तो देखील कारप्यात जात नाही. अशाप्रकारच्या अंधश्रद्धांमध्ये बदल करण्याचे आह्वान आदिवासी समाजापुढे आहे. आदिवासी समाजात शिकार हा त्यांच्या जगण्याचा, संस्कृतीचा अविभाज्य घटक असताना, कायद्याने मात्र त्यास सर्रास गुन्हा ठरवला आहे. खरं तर प्रत्येक घरासमोर तुम्हाला शिकारीसाठीचे भाले, जाळी, सापळे बघायला मिळतात. लोकं गावात जाहीरपणे जमतात आणि एकत्रितपणे शिकारीसाठी जातात. अनेक गावात शिकार करणे हा गुन्हा आहे हे देखील लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. ते उत्सवांचा भाग म्हणून शिकार करतात आणि कायद्याच्या कचाट्यात सापडतात. काही ठिकाणी मादी प्राण्यांची आणि पिलांची शिकार करायची नाही असे नियम स्थानिक नेत्यांनी घालून दिले आहेत. अशा प्रकारच्या नियमांची सांगड घालून कायद्यात लवचिकता आणून आदिवासींमधील शिकारीचे सांस्कृतीक संवर्धन करणे शक्य आहे. शिकार हे आदिवासींच्या खाद्यान्नातील महत्त्वाचे प्रथिनं आहे. त्यामुळे संयत शिकार हे आदिवासींमधील कुपोषण निर्मूलनात महत्त्वाची कामगिरी बजावू शकते. दुसरीकडे बदलत्या काळानुसार आदिवासींनीही काही बदल करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ शेकरूची शिकार. प्रत्येक गावाने दरवर्षी एका शेकरुची शिकार करण्याची इथे परंपरा आहे. मुळात शेकरुंची संख्या कमी होत चालली आहे. एकट्या भामरागड तालुक्यात १२३ गावं आहेत, म्हणजे दरवर्षी १२३ शेकरू नष्ट होणार. त्यामुळे शेकरूंच्या शिकारीवर बंदी घालण्याचे निर्णय गोटूल समित्या घेऊ शकतात. दुसरीकडे आत्ता शिकार केली तर गुन्हेगारीचा शिक्का लागणाऱ्या आदिवासींवर त्यांच्या परंपरा आणि संस्कृती याचा विचार करून कायद्यात बदल करण्याचीही गरज आहे. त्यांच्या सांस्कृतिक हक्कांबद्दल बोललं जातं. थोडं आदिवासींनी बदलावं, थोडं कायद्याने. तरच आदिवासी आणि जंगल यांच्यातलं नात्यातील समृद्धी टिकून राहील आणि त्यात संयत शिकार हे महत्त्वाची भूमिका पार पाडेल. 


शब्दांकन : दीप्ती राऊत
लेखकाचा संपर्क : ९४०५१३०
५३०

बातम्या आणखी आहेत...