आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईव्हीएम हॅकिंगची जनक काँग्रेसच; पण ते पाडण्यासाठी वापर करायचे, भाजप मात्र निवडून येण्यासाठी करताेय - वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा आराेप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ईव्हीएम हॅकिंगचे जनक भाजप नव्हे, तर काँग्रेसच आहे. पण, त्यांचे हॅकिंग मर्यादित होते. ज्यांना संसदेत निवडून येऊ द्यायचे नाही, त्यांना पाडण्यासाठीच काँग्रेस या ‘कले’चा वापर करत असे. भाजपवाले त्यांच्याकडून शिकले, मात्र हे आता निवडून येण्यासाठी ईव्हीएम हॅक करतात,’ असा आराेप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. दैनिक दिव्य मराठीच्या आैरंगाबाद कार्यालयातील संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधताना अॅड. आंबेडकर यांनी अनेक प्रश्नांना  उत्तरे दिली.  

प्रश्न : उमेदवारीसाठी सर्वाधिक गर्दी ‘वंचित’कडे हाेती?
अॅड. आंबेडकर : वंचित मराठा समाजालाही थाेडाफार बदल हवा हाेता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आता काही उरलेले नाही, हे त्यांना कळून चुकले. इतर पक्षांकडे त्यांच्यासाठीची स्वीकारार्हता संपलेली होती. शिवाय अोबीसीमधील सूक्ष्म जातींनाही थोडाफार बदल हवा होता. ‘वंचित’ने हा सामाजिक बदल आणला. त्यामुळे वंचित मराठा आणि अोबीसींनी आमच्याकडे उमेदवारी मागितली. कारण हा मतदारदेखील आमच्याकडे शिफ्ट झालाय. शिफ्टएेवजी त्याला रिफ्ट (दरी) म्हणूयात. म्हणून आमच्याकडे उमेदवारीसाठी गर्दी वाढली. 

प्रश्न : रायगडावरून प्रचाराचा शुभारंभ हा निर्णय त्यांच्यासाठीच हाेता का? मग ते झाले का नाही?
अॅड. आंबेडकर : होय. त्यासाठीच आम्ही रायगडावरून प्रचाराची सुरुवात करणार होतो. पण, दुर्दैवाने आमचे विमान बिघडले (की बिघडवले?). रायगडाच्या शेजारील आणि एमआयडीसीच्या विमानतळावर दोन्ही ठिकाणी लँडिंग करणे धाेक्याचे होते, म्हणून आम्हीच ते टाळले. 

प्रश्न : रायगडावरून प्रचाराच्या निर्णयावरून पक्षात मतभिन्नता निर्माण झालीय म्हणे?
अॅड. आंबेडकर : तसे काहीच नाही.

प्रश्न : खासदार इम्तियाज जलील यांच्यावरच टीका का?
अॅड. आंबेडकर : माझ्यावर लक्ष केंद्रित केले म्हणूनच इम्तियाज खासदार झाले. पण, नंतर त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मदत केली. 

प्रश्न : काँग्रेस म्हणते वंचितलाच आघाडी नकाे हाेती? अॅड. आंबेडकर : आम्ही काँग्रेसकडे त्यांनी हरलेल्या जागा मागितल्या हाेत्या. त्याही त्यांनी दिल्या नाहीत. आमचे सहकारी बाेलणी करत हाेते. मात्र, नंतर असे लक्षात आले की, काँग्रेस पक्ष फक्त आमचा वापर करून घेत आहे. त्यामुळे आम्ही बोलणी थांबवली.

प्रश्न : संघाला कायद्याच्या चौकटीत आणा म्हणजे काय?
अॅड. आंबेडकर : आंध्र प्रदेशातील एका संशयिताने मान्य केले होते की, ‘मोहन भागवत यांच्यासाेबत त्याने बाॅम्बस्फोट घडवले.’ पण, त्याची मुलाखत कुणीही प्रसिद्ध केली नाही. जर संघ बाॅम्बस्फोट घडवत असेल आणि त्यांना काहीही हाेत नसेल तर मला सांगा, कुठंय संघ कायद्याच्या कचाट्यात?

प्रश्न : काँग्रेस गलितगात्र आहे, तरीही त्यांच्याकडून अपेक्षा का आहेत?
अॅड. आंबेडकर : काँग्रेसने जर आमची ती अट मान्य केली असती तर लोकसभा निवडणुकीनंतर मोदींचे सरकार आलेच नसते. काँग्रेसचे सरकार आले असते, त्यानंतर आम्ही त्यांच्याकडून तशी अपेक्षा ठेवून मागणी केली होती.

प्रश्न : शरद पवारांवर तुमचा राग का? 
अॅड. आंबेडकर : वैयक्तिक राग नाहीच. 

प्रश्न : पवार मुख्यमंत्री असताना तुम्ही त्यांना ‘राजगृहा’वरून परत पाठवले हाेते म्हणे?
अॅड. आंबेडकर : तेव्हा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सीताराम केसरी होते. केसरी आणि माझे आघाडीसंदर्भात आधीच ठरलेले होते. त्यानंतर पवार माझ्या घरी आले. त्या वेळी त्यांना मी एवढेच म्हणालो होतो की, ‘तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे आणि माझे आधीच ठरले आहे. मग, आता तुमच्याशी मी काय बोलू?’ असा तो प्रसंग होता. 

प्रश्न : पण, मग पवारांना तुमचा राग यायला हवा हाेता? तुम्हाला का ते आवडत नाहीत?
अॅड. आंबेडकर : त्याची अनेक कारणे आहेत. योग्य वेळ आल्यावर सांगेन.

प्रश्न : शरद पवारांचे ‘ईडी’त नाव आल्यावर मात्र तुम्ही त्यांची बाजू घेतलीत?
अॅड. आंबेडकर : होय, कारण शिखर बँकेचे पवार कधीही संचालक नव्हते, तरी त्यांची चाैकशी कशी? असा मुद्दा होता.  

प्रश्न : पडळकर, माने, कोळसे तुम्हाला का सोडून गेले?
अॅड. आंबेडकर : कोळसे आमचे कधीच नव्हते. ते जनता दल सेक्युलरचे होते. त्यांना मी औरंगाबादची उमेदवारी जरूर जाहीर केली हाेती, मात्र त्यासाठी एमआयएमशी बाेलणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच दिली हाेती. 

प्रश्न : गोपीचंद पडळकरांच्या विरोधात तुम्ही बारामतीमध्ये धनगर उमेदवार दिलाय?
अॅड. आंबेडकर : तिथे गाेफणेंची उमेदवारी पडळकर वंचितमध्ये असतानाच ठरली हाेती. बारामतीत गाेफणेंनी आराेग्य सेवेत चांगले काम केले आहे. 

प्रश्न : ईव्हीएमबद्दलची काय तक्रार आहे?
अॅड. आंबेडकर : मी २००४ मध्ये अकाेल्यातून हरलाे ताेच मुळी ईव्हीएममुळे. तेव्हापासून मी या विषयावर बाेलताेय, पण आम्ही हरलेलाे त्यामुळे आमचे कुणी एेकत नाही. 

प्रश्न : काँग्रेसही तीव्र विराेध करत नाही?
अॅड. आंबेडकर : खरे तर ईव्हीएम हॅकिंगच्या तंत्राची जनक काँग्रेसच आहे. ज्यांना संसदेत येऊ द्यायचे नाही, अशांसाठी त्यांनी हे तंत्र वापरले. भाजप मात्र आता जिंकण्यासाठी वापरत आहे.
 

‘त्या’ दाेन हजार युवकांमुळे इम्तियाज जिंकले
‘ईव्हीएम’मध्ये जर दाेष आहे तर आैरंगाबादेतून इम्तियाज जलील कसे जिंकले?’ या प्रश्नावर अॅड. आंबेडकर म्हणाले, ‘दोन हजार युवकांचे जथ्थे मतदान केंद्रात घुसले होते. अखेरच्या अर्ध्या तासातच हे सर्व घडले. अन्यथा इम्तियाज पाच हजार मतांनी पराभूत झाले असते. यात मला अजिबात शंका नाही.’

शब्दांकन : शेखर मगर, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...