आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरीसाठी एरोनॉटिकल इंजिनिअर सरपंच गुजरातेत; ग्रामस्थ टॉवरवर! 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव- एरोनॉटिकल इंजिनिअर असलेली तरुणी गावची सरपंच झाली. उच्च शिक्षित तरुणीच्या हाती गावकऱ्यांनी मोठ्या आशेने विकासाची धुरा सोपवली. या निवडीचे राज्यभरात कौतुकही झाले. माध्यमांतून बातम्याही आल्या. पण प्रत्यक्षात इंजिनिअर सरपंच गावचा विकास सोडून गुजरातेत नोकरीला गेल्या अन् ग्रामस्थांचा अपेक्षाभंग झाला. समस्यांनी त्रस्त ग्रामस्थांनी सोमवारी थेट मोबाइल टॉवरवर चढून साडेतीन तास ग्रामपंचायतीविरोधात आंदोलन केले. केलेल्या कामांच्या चौकशीची मागणी केली. अखेर अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलक खाली उतरले. 

 

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर माजलगाव तालुक्यातील मंजरथ गाव राज्यभरात प्रकाशझोतात आले. त्याचे कारणही तसेच होते एरोनॉटिकल इंजिनिअर असलेल्या ऋतुजा आनंदगावकर या तरुणीला पहिल्यांदाच जनतेतून सरपंच होण्याचा मान मिळाला होता. उच्च शिक्षित तरुणी गावच्या विकासाच्या ओढीने राजकारणात उतरल्याने नागरिकांनीही तिला भरभरून मतदान करून निवडून दिले. याचे राज्यभरात कौतुक झाले. पण हा कौतुक सोहळा क्षणभंगुरच ठरला. कारण सरपंचपदी निवड झाल्यानंतर काहीच दिवसांत ऋतुजा आनंदगावकर यांनी नोकरीच्या निमित्ताने थेट गुजरात गाठले. हल्ली त्या नोकरीसाठी तिकडेच असतात. त्यामुळे गावच्या विकासाला मात्र खीळ बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शिवाय, सरपंचच गावात नसल्याने ग्रामसेकविकाही गावात येत नाहीत. सामान्यांची कामे यामुळे खोळंबतात. अनेकदा विनंती करूनही स्थिती सुधारत नसल्याने सोमवारी भागवत वाघमारे, भीमराव कदम, संतोष वाघमारे, तुकाराम चोरमले, सोपान ठाकरे, सिद्धार्थ पाडमुख, काशीनाथ थोरात, नवनाथ चुंबळे, शेख नसीर, सचिन पाडमुख हे आंदोलक थेट गावातील मोबाइल टॉवरवर चढले. ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या चौकशीची मागणी त्यांनी केली. साडेतीन तास हे आंदोलक टॉवरवरच होते. 

 

लेखी आश्वासनानंतर माघार : 
आंदोलनाची माहिती मिळताच गटविकास अधिकारी बी. टी. चव्हाण हे मंजरथमध्ये आले. त्यांनी आंदाेलकांची समजूत काढली. ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी आणि ग्रामसेविकेची बदली करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलक टॉवरवरून खाली उतरले. 

 

नव्या ग्रामसेवकाची नियुक्ती : 
आंदोलक ग्रामसेविकेच्या विरोधात आक्रमक झाले होते. आधी नव्या ग्रामसेवकाच्या नियुक्तीचे आदेश मगच आंदोलन मागे घेणार, असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यानंतर बीडीओ चव्हाण यांनी राम यादव या ग्रामसेवकाची मंजरथमध्ये नियुक्ती केली. यानंतर आंदोलकांनी माघार घेतली 
 

बातम्या आणखी आहेत...