आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिलाशी जुळले ऋणानुबंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुख्यालयी राहावे म्हणून नोकरीच्या गावाला राहत होतो. आमच्या फारशा बदल्या होत नसत म्हणून तिथेच घर केले. वस्ती नवीन असल्याने जरा विरळच घरे होती. या भागात ब-याच चो-या व्हायच्या. चोरट्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून ‘एखादा कुत्रा पाळा’ असा सल्ला माझ्या एका मित्राने दिला. घरात मुलांनीही हा विषय लावून धरला. मागे लकडाच लावला म्हणा ना. आम्हा उभयतांना कुत्री-मांजरं कधीच आवडत नव्हती. मात्र पोरं ऐकायलाच तयार नव्हती. आम्ही कुत्र्याचे सगळे पालनपोषण करू असे सांगू लागली. माझ्या पुतण्याने एक गावठी कुत्र्याचे पिलू कोठून तरी आणले. पोरांनी त्याचे नाव ठेवले, ‘मोती.’ (बहुधा सगळ्याच कुत्र्यांना त्याचे मालक मोतीच म्हणत असावेत).त्याला दररोज दूध-पोळी खाऊ घालण्याचे काम मुले इमानेइतबारे करू लागली.

वेळप्रसंगी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून आपला वेळ त्या पिलाच्या संगतीत काढत होती.या पिलाशी खेळण्यातच त्यांचा वेळ जायचा. थोड्याच दिवसांत तो चांगला गुटगुटीत दिसू लागला. रस्त्यावरच्या येणा-या - जाणा-यावर गुरकावू लागला. भाकरीपुरते काम केल्याचे समाधान जणू त्याच्या चेह-यावर चमकत असेल. आवाज देताच शेपटी हलवून जिव्हाळा दाखवायचा. पुतण्या सुनीलला तर त्याचा लळाच लागला होता. तो त्याला दुधात पोळी कुस्करून त्याला खाऊ घालायचा. त्याचे सगळे लाड तो पुरवत होता. दरम्यान, सुनील काही कामानिमित्त गावाकडे गेला. काही दिवस गेले, पुढे मोती आजारी पडला. त्याच्यावर दवाखान्यात उपचार केले. पण मोती खंगत चालला. आम्ही सुनीलला निरोप पाठवला : मोती आजारी आहे, त्याने खाणे-पिणे सोडले आहे. सुनील तातडीने आला. त्याने जोरात आवाज दिला, ‘मोती.’ त्याने आपले डोळे किलकिले करून त्याच्याकडे पाहिले. सुनीलने त्याला मांडीवर घेतले अन् आम्ही आशेने ते दृश्य पाहू लागलो. पण मोतीने मान टाकली.जणू तो सुनीलचीच वाट पाहत होता.