आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधवेने अवघ्या 6 वर्षांच्या मुलीचा केला सौदा; म्हणाली, तिला विकून कुटुंबाला पोटभर जेवण तरी मिळेल...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबूल - युद्धग्रस्त अफगाणिस्तानात सामान्य लोक किती हलाखीचे आयुष्य जगत आहेत याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. येथील एका विधवेने आपल्या पोटच्या 6 वर्षीय चिमुकलीला विकण्याचा निर्णय घेतला. अमेरिकन माध्यम सीएएनच्या वृत्तातून हा धक्कादायक खुलासा झाला. यात पत्रकारांनी हेरत प्रांतातील एका शरणार्थी शिबीराचा आढावा घेतला. त्याच ठिकाणी हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. येथील एका विधवेने आपल्या चिमुकलीचा सौदा का केला याची हकीगत मांडली आहे. 


- प्लास्टिक शीटने बनलेल्या शरणार्थी शिबीरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांना नरकासारखे आयुष्य जगावे लागत आहे. त्यांच्याकडे प्लास्टिकचे शेड तर आहेत पण, त्यामध्ये खाण्यासाठी काहीच नाही. अनेक शेड्समध्ये फक्त महिला आणि त्यांची लहान मुले-मुली राहतात. पैसेच नसल्याने त्यांना उपाशी राहावे लागते. अशात किमान मुलीचे आणि काही दिवसांसाठी कुटुंबाचे पोट भरता येईल, या अपेक्षेने तिने आपल्या मुलीचा सौदा केला. 
- ममरीन नावाच्या या विधवा महिलेने सांगितल्याप्रमाणे, त्यांच्याकडे स्वतःचे घर सुरुवातीपासूनच नाही. शेतमजुरी आणि इतर कामे करून ती आपल्या पतीसोबत राहत होती. परंतु, युद्धात तिच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर आता त्यांचा सांभाळ करणारा कुणीच राहिलेला नाही. गावातही दुष्काळ असल्याने काम नाही. त्यामुळे, ती काही वर्षांपूर्वी या कॅम्पमध्ये आली होती. परंतु, येथे सुद्धा परिस्थिती त्याहून वाइट असल्याचे तिने सांगितले. 
- ममरीन सांगते, की तिने आपल्या सहा वर्षांच्या मुलीचा सौदा अवघ्य्या तीन हजार अमेरिकन डॉलरमध्ये केला. ठरल्याप्रमाणे तिला जवळपास दोन लाख भारतीय रुपये मिळणे अपेक्षित होते. परंतु, आतापर्यंत केवळ 5 हजार रुपये आले आहेत. त्यातही वाइट म्हणजे, तिची मुलगी अकीला हिला आपली विक्री झाल्याची काहीच माहिती नाही. किमान तेथे जाऊन या मुलीला पोटभर जेवण मिळेल अशी या आईची अपेक्षा आहे.


विकत घेणारा म्हणतो...
अकीलाला निझामुद्दीन नावाच्या या व्यक्तीने विकत घेतले आहे. त्याने या मुलीचा विवाह आपल्या 10 वर्षांच्या मुलासोबत करण्याचे आश्वासन ममरीनला दिले आहे. ममरीनची आर्थिक परिस्थिती खूप वाइट आहे. तिच्याकडे खाण्या-पिण्याचे पैसे सुद्धा नाहीत. आपण हा निर्णय ममरीनच्या कुटुंबावर दया करून घेतला असे त्याने सांगितले. विशेष म्हणजे, निझामुद्दीन सुद्धा एक गरीब असून त्याच शिबीरात राहतो. परंतु, त्याची झोपडी थोडेसे पैसे असलेल्या लोकांच्या वस्तीत आहे. सौदा करताना 2 लाख रुपये देणार असे निझामुद्दीनने आश्वासन दिले होते. परंतु, आता त्याच्याकडे तेवढे पैसे नसल्याने तो देखील मजबूर आहे. शेवटी, ममरीन आणि निझामुद्दीनने चर्चा करून पैसे 3 वर्षांत फेडण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानात अवघ्या 5-10 वर्षांच्या मुला-मुलींचेही लग्न लावून दिले जातात. एवढेच नव्हे, तर अल्पवयीन मुलींसोबत वृद्धांनी सुद्धा विवाह करणे येथे नवीन नाही.

बातम्या आणखी आहेत...